लहान मुलांना वाढवताना आपल्या इच्छा अपेक्षा त्यांच्यावर लादणं मुलांवर अन्याय कारक ठरतं. आणि या लादण्यामध्ये धाकधपटशा आला की मुलांना स्वत:च्या बाबांची भीती वाटू शकते? म्हणून पालकत्व सांभाळून निभावायला हवं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मावशी, बाबा इथं येणार आहे, हे तू मला का नाही सांगितलंस? मला इथून आत्ताच्या आत्ता जायचं आहे. मला बाबाची भीती वाटते. तो खूप दुष्ट आहे. मी अजिबात त्याच्याशी बोलणार नाही.”.

“अनिष बेटा, तू मावशीचं ऐकणार नाहीस का? तू काहीही बोलू नकोस, पण बाबा काय म्हणतो ते ऐकून तर घे.” शिवानी, त्याची मावशी त्याची समजूत घालत होती.

शलाका आणि अमित मागील एक वर्षांपासून विभक्त राहात होते. शलाका निर्धाराने घर सोडून अनिषला घेऊन माहेरी निघून आली होती. आता पुन्हा त्यांच्याकडं जायचं नाही असं तिनं ठरवलं होतं. अमितलाही ती तिच्या घरी येऊ देत नव्हती त्यामुळं मागील एक वर्षांपासून अमित अनिषला भेटला नव्हता. त्या दोघांमध्ये काहीही वाद असले तरी मुलाची भेट त्याला मिळावी म्हणून शिवानीनं शलाका आणि अनिषला तिच्या घरी बोलावलं होतं. तेव्हा तिनं अमितला बोलावून घेतलं, पण अनिष बाबाला भेटायला, त्याच्याशी बोलायला तयार नव्हता.

हेही वाचा : विसाव्या वर्षी मिळवला अध्यक्षपदाचा मान

तो अंग चोरून उभा होता. अमित त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत होता, पण अनिष त्याचा हलकासा स्पर्शही सहन करू शकत नव्हता. बाबांनी आणलेल्या गिफ्टकडे त्याने ढुंकूनही पाहिलं नाही. त्याचा राग त्याच्या डोळ्यातून दिसत होता. अमित त्याच्याशी बोलत होता, “अनिष बेटा, बाबा तुझ्यावर खूप प्रेम करतो. किती दिवस झाले तू मला भेटलेला नाहीस. तू फोनवरही माझ्याशी बोलत नाहीस. मला तुझी खुप आठवण येते रे. प्लीज माझ्याजवळ ये, प्लीज प्लीज मला तुझी एक पापी घेऊ देत.”

“नाही, तू माझ्याजवळ येऊ नकोस. मी मम्माकडेच राहणार आहे. तुझ्याकडे कधी सुद्धा येणार नाही.” असं म्हणून तो तोंड फिरवून बसला. तो अमितकडं बघतही नव्हता आणि अमित तोंड लपवून आपल्या डोळ्यातील अश्रू मागे सारण्याचा प्रयत्न करत होता.

अनिष अत्यंत हुशार मुलगा. कोणतीही गोष्ट शिकवली की तो लगेच अवगत करायचा. अमितने त्याला बुद्धिबळ शिकवायचं ठरवलं. त्याला कोचिंग क्लास लावले. तो स्वतःही त्याच्यासाठी खूप वेळ देत होता. बुद्धिबळाच्या एखाद्या टूर्नामेंट मध्ये तो कमी पडला तर पुढच्या स्पर्धेसाठी अमित त्याची खूप तयारी करून घ्यायचा,पण त्याच्या बालवयामुळं त्याला कधी कधी त्या खेळाचा आणि स्पर्धेचाही कंटाळा यायचा. त्याला मनमोकळं, आनंदाने खेळता येत नाही ‘स्पर्धेत जिंकायचंच’ हा अमितचा अट्टहास त्याच्यावर मानसिक आणि भावनिक दडपण आणायचा. अनिषनं कधी ऐकलं नाही तर अमितची खूप चिडचिड व्हायची. अनिषला तो कठोर शिक्षाही करायचा. एका स्पर्धेत तो नीट खेळला नाही, थोडक्यात त्याचं मेडल हुकलं म्हणून अमितला त्याचा खूप राग आला. त्यादिवशी त्यानं अनिषला कोंडून ठेवलं होतं. शलाकाला अमितचं वागणं अजिबातच आवडत नव्हतं. तिनं कितीतरी वेळा अमितला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यानं ऐकलं नाही. शेवटी शलाका अनिषला घेऊन माहेरी आली होती.

हेही वाचा : स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?

शलाकानं माहेरी आल्यानंतर घरात सर्वांना अमितच्या वागण्याबद्दल जे काही सांगितले ते सर्व अनिष ऐकत होता. त्या दोघांमधील वाद त्यानं पाहिले होते, म्हणूनच त्याला त्याचा बाबा दुष्ट वाटायला लागला होता. शलाकाचं म्हणणं होतं, नवरा म्हणून अमितचं कोणतंही स्थान तिच्या मनात आता राहिलं नाही. ती त्याच्याशी बोलायलाही तयार नव्हती. मात्र या दोघांमध्ये कितीही वाद असले तरी अनिषच्या मनात ‘बाप’ ही प्रतिमा वाईट व्हायला नको या दृष्टीनं शिवानीचा प्रयत्न चालू होता. अनिषला बाहेर खेळायला पाठवून त्या दोघांशी ती बोलू लागली.

“अमित आणि शलाका, तुमच्या दोघांच्या स्वभावात विचारसरणीत भिन्नता आहे, यापुढं एकत्र रहायचे की नाही हे तुम्ही दोघजण ठरवा, परंतु कदाचित तुमच्यातील पती-पत्नी हे नातं संपलं तरीही आयुष्यभरासाठी तुम्ही अनिषचे आई बाबा असणार आहात. त्याला दोघांचं प्रेम,सहवास मिळणं आवश्यक आहे. आई किंवा वडील या नात्याबाबतची कोणतीही कटुता त्याच्या मनात राहायला नको. अमित, तुझा अनिषला वाढवताना, त्याच्या करिअरसाठी प्रयत्न करताना हेतू बरोबर असला तरी मार्ग अत्यंत चुकीचा होता आणि त्याचे परिणाम तू बघतो आहेस.

हेही वाचा : निसर्गलिपी : फुलांच्या वार्षिक प्रदर्शनांना जाच!

शलाका, अमित तुझ्या दृष्टीनं कितीही वाईट वागला असला तरी मुलांच्या मनातील ‘बाप’वाईट होतो तेव्हा त्यांच्या मानसिकतेवर खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळं अनिषच्या मनातील वडिलांबाबतच्या दुष्टपणाची जी भावना निर्माण झाली आहे, ती काढण्यासाठी तुलाही प्रयत्न करायला हवेत. अनिषचं निरागस बालपण कोमेजू देऊ नका, त्याची वाढ निकोप होण्यासाठी तुमच्यातील वाद सामंजस्यानं मिटवण्याचा प्रयत्न करा.”

शिवानी बराच वेळ दोघांशी बोलत होती. दोघांनाही आपल्या चुका समजल्या होत्या. आपल्या अतिरेकी आणि शीघ्रकोपी स्वभावाचा अनिषवर केवढा मोठा परिणाम झाला आहे याची जाणीव अमितला झाली आणि त्याला वडिलांचीही गरज आहेच हे शलाकालाही पटलं. दोघांनी एकत्र बोलण्याची तरी तयारी दाखवली हे पाहून शलाकाला हायसं वाटलं.
(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smita joshi606@gmail.com)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What to do if children afraid of father parenting tips article chatura css