डॉक्टर शारदा महांडुळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

—–

जगभरामध्ये तांदळाच्या खालोखाल गहू हे धान्य खाद्यान्न म्हणून वापरले जाते. सुमारे ५०% लोकांच्या आहारामध्ये गहू वापरला जातो. गहू जगभर पिकवला जातो. ख्रिस्तपूर्व काळात हे धान्य भारतात आले. गहू पिकविण्यामध्ये भारताचा संपूर्ण जगात चौथा क्रमांक आहे. विशेषत: पंजाब, उत्तरप्रदेश या ठिकाणी गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गव्हाचे रोप साधारणपणे दीड ते दोन हात उंचीचे असून, ते पोकळ असते. या रोपाला ओंब्या येतात. या ओंब्यांमधूनच गव्हाचे दाणे तयार होतात. हेच दाणे गहू म्हणून वापरले जातात. याचे दोन प्रकार आहेत. लाल गहू व पांढरा गहू. गव्हाला हिंदीमध्ये ‘गेहूँ’, संस्कृतमध्ये ‘गोधूम’, इंग्रजीत ‘व्हीट’, तर शास्त्रीय भाषेत ‘ट्रिटिकम एस्टीव्हम’ (Triticum Aestivum) म्हणून ओळखला जाणारा गहू ‘पोएसी’ कुळातील आहे. सर्व अन्नधान्यांत गहू अत्यंत श्रेष्ठ गुणवत्तेचा असल्यामुळे त्याला धान्यांचा राजा समजले जाते.

वृष्यः शीतो गुरुः स्निग्धो जीवनो वातपित्तहा । संधानकारी मधुरो गोधूमः स्थैर्यकृत्सरः ॥

अष्टांग संग्रह औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : गहू मधुर गुणात्मक, शीत, रुचकर, पाचक, कफकारक, पित्तनाशक, स्निग्ध, अस्थिभंग साधणारा, बलकारक, पुष्टिकारक, वीर्यवर्धक, धातुवर्धक आहे.

आधुनिक शास्त्रानुसार :

गव्हामध्ये पिष्टमय पदार्थांचा साठा सर्वात जास्त असतो. त्याचबरोबर प्रथिने, खनिजे, स्निग्ध पदार्थ, ‘ब’ व ‘ई’ जीवनसत्त्व, सेल्युलोज हे पौष्टिक घटकही असतात.

हेही वाचा >>> आहारवेद : शेवगा

गहू जात्यावर दळला, तर त्यातील शरीरास आवश्यक असणारे औषधी घटक कायम टिकून राहतात. कारण जात्यावर दळताना दळण्याचा वेग हा कमी असतो, तसेच गिरणीइतकी उष्णताही निर्माण होत नाही. पर्यायाने अन्न व औषधी घटक जळून जात नाहीत व अशा पिठालाच आरोग्यपूर्ण गव्हाचे पीठ म्हणतात (whole healthy wheat flour). गुजरात प्रदेशामध्ये गव्हापासून अतिशय पातळ फुलके बनविले जातात. हे फुलके फुगण्यासाठी एकदम उष्णतेच्या निखाऱ्यावर भाजतात. परंतु असे केल्याने उष्णतेमुळे फुलक्यांमधील जीवनसत्त्वे व शरीरास उपयुक्त पोषक घटक लवकर नष्ट होतात व त्यामुळे असे फुलके खाणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह नसते. म्हणून सहसा महाराष्ट्रातील ‘पोळी’ तसेच अन्यत्र असणारा जाड पराठा / बाटी खाणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह असते.

उपयोग :

१) गव्हाच्या पिठात साखर आणि दूध घालून प्यायल्याने उष्णतेमुळे घुळणा फुटून नाकातून वाहणारे रक्त बंद होते.

२) गव्हाच्या पिठात दूध व गायीचे साजूक तूप घालून ते पीठ चांगले मळून त्याचा पराठा / बाटी बनवावी. ही बाटी बलदायक, धातुवर्धक, वायुहारक, जड व कफकारक असल्याने जठराग्नी प्रदीप्त असणाऱ्यांसाठी अत्यंत उत्तम आहार आहे.

३) गव्हाची पोळी कोंड्यासह बनवावी, कारण कोंडा हा पिठापेक्षाही शरीराला उपकारक व पोषक असतो. तसेच उत्तम सारक असतो. या कोंड्यामुळे आतड्यांच्या व मलाशयाच्या हालचाली वाढतात, त्यामुळे आतड्यांतील घट्ट मल पुढे सरकला जातो व शौचास सहज साफ होते. त्याचबरोबर कोंड्यामध्ये असणारे लोह व कॅल्शिअम घटक सहजरीत्या मिळतात.

हेही वाचा >>> आहारवेद : रक्तवर्धक बीट

४) गहू उगवून त्यापासून गव्हांकुर तयार केले जातात व या अंकुरातील ‘क्लोरोफिल’चा शरीरातील विष (Toxins) बाहेर काढून शरीर शुद्ध करण्यासाठी, तसेच स्नायूंची बांधणी चांगली करण्यासाठी उपयोग होतो. म्हणून गव्हांकुर रस १०० मि.लि. एक आठवडाभर रोज प्यावा.

५) गव्हांकुरातील क्लोरोफिलमुळे हृदय व फुप्फुसे कार्यक्षम होतात. त्याचबरोबर रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत चालते. रक्तामधील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढल्यामुळे फुप्फुसांना अधिक चालना मिळून ऑक्सिजन घेण्याचे प्रमाण वाढते व पर्यायाने संपूर्ण शरीराचेच कार्य सुरळीत चालते.

६) गव्हांकुराचा उपयोग त्वचारोगावरही चांगला होतो. त्वचा भाजणे, जखम होणे, दाह जाणवणे, चेहऱ्यावर काळे वांग येणे, चेहरा काळवंडणे, सुरकुत्या येणे या सर्व विकारांवर गव्हांकुराचा रस त्वचेवर लावल्यास वरील सर्व विकार दूर होतात..

७) गव्हांकुराचा उपयोग कान, डोळे, दात यांच्या सर्व विकारांवर, सांधेदुखी, मेंदूविकार, स्त्रियांमधील मासिक पाळीसंदर्भातील विकार, हॉर्मोन्सचे असंतुलन या सर्व विकारांवर होतो. तसेच थॅलेसिमिया, कॅन्सर या विकारांवरही गव्हांकुराचा उपयोग होतो. या विषयीचे संशोधन सध्या सुरू आहे. अनेक मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये कॅन्सर व थॅलेसिमिया असणाऱ्या रुग्णांवर गव्हांकुराचा उपयोग केला जातो.

हेही वाचा >>> आहारवेद : भाज्यांचा राजा बटाटा

८) चेहऱ्यावर सुरकुत्या येऊन काळे वांग निर्माण झाले असतील, तर अशा वेळी गव्हांकुराचा कल्क चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळावा. यामध्ये असणाऱ्या ‘ई’ जीवनसत्त्वामुळे त्वचा कांतियुक्त होऊन काळे वांग नष्ट होतात.

९) गव्हाच्या पिठापासून पोळी, पुरणपोळी, पुरी, केक, बिस्किटे, ब्रेड, पाव, शिरा, शेवया, पराठा असे अनेक खाद्यपदार्थ बनविता येतात. हे सर्व पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक असतात. फक्त हे पदार्थ सहसा घरी बनविलेले खावेत. पदार्थ तयार करताना गव्हाचे पीठ चाळून न घेता कोंड्यासह वापरावे.

गव्हांकुर बनविण्याची पद्धत :

गहू आठ ते दहा तास भिजत घालून त्यातील पाणी काढून टाकावे व सात कुंड्या घेऊन त्यात माती टाकून रोज एका कुंडीत गहू पेरावे. असे सलग सात दिवस करावे. आठव्या दिवशी पहिल्या कुंडीत उगवलेले गव्हांकुर स्वच्छ धुऊन त्याचा रस काढून प्यावा. रस करताना त्यात थोडे पाणी घालावे. हा रस बनविल्यानंतर लगेचच प्यावा. साधारणतः हा रस १०० ते १५० मि.लि. इतक्या प्रमाणात आठवडाभर प्यावा. शक्यतो रस जेवणापूर्वी तासभर व जेवणानंतर दोन ते तीन तासांनी प्यावा व पिताना त्याचे घोट हे हळूहळू गिळावे. एकदम घाईघाईने पिऊ नये.

सावधानता :

गव्हाचा मैदा हा पचण्यास जड, निःसत्त्व व चिकट असतो. म्हणून आहारात मैद्याचा वापर करू नये. त्याऐवजी कोंड्यासह गव्हाच्या पिठाचा वापर करावा.

Dr.sharda.mahandule@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wheat benefits multi purpose wheat health benefits of wheat zws
Show comments