School Dropout Education : असं म्हणतात, शिक्षणाला वयाची मर्यादा नसते. तुम्ही कोणत्याही वयात शिकू शकता. आज आपल्या भारतात अशा अनेक स्त्रिया आहेत, ज्यांना इच्छा असूनही शिक्षण घेता येत नाही. कधी कुणाचे लवकर लग्न तर कधी कुणाला घराच्या जबाबदारीमुळे शिक्षणापासून मुकावे लागते, पण जिथे प्रबळ इच्छाशक्ती असते तिथे कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आज आपण अशा दोन महिलांविषयी जाणून घेणार आहोत, ज्या वयाच्या चाळिशीत शाळेमध्ये शिकताहेत. या महिलांची कहाणी ऐकून तुम्हालाही प्रेरणा मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राणी देवी

राणी ही उत्तर प्रदेशच्या हरपालपूर या छोट्या गावात जन्मलेली मुलगी. वडील लग्नसमारंभात बॅण्ड वाजवायचे, तर आई गृहिणी होती. तिने वयाच्या चौथीपर्यंत शिक्षण घेतले. गावातील मुलींचे लवकर लग्न करतात, त्यामुळे तिच्या आई-वडिलांना शिक्षणाचे महत्त्व फार कळले नाही. वयाच्या १३ व्या वर्षी १९९७ मध्ये तिचे लग्न झाले. राणी देवीचा विवाह भोपाळच्या १७ वर्षीय तरुणाबरोबर झाला. तेव्हा तिला लग्न म्हणजे नेमकं काय, हे सुद्धा समजत नव्हते. लग्न केल्यानंतर नवीन कपडे व भरपूर दागिने मिळणार, याच उत्साहाने तिने लग्न केले.

लग्नानंतर तिला दोन मुलं झाली. भोपाळमध्ये एकत्र कुटुंबात राहणे कठीण होते, म्हणून २००८ साली त्यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. तिने दोन मुलांचे संगोपन करण्यात आयुष्य घालवले. मुलांना चांगले शिकवले.

तिचा नवरा पवन भोपाळमध्ये रोजंदारी करतो, दर काही महिन्यांनी त्यांना भेटायला दिल्लीला येतो. मुलांचे शिक्षण व घरखर्च त्याच्या एकट्याच्या कमाईने करणे अशक्य होते, म्हणून राणी देवी इतरांच्या घरी घरकाम करते आणि महिन्याला १० हजार रुपये कमावते.

( Express photo by Renuka Puri)

राणी देवी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात, “कुसुमताईंकडे भांडी धुत असताना त्यांनी मला एकेदिवशी वर्तमानपत्राचा एक छोटा तुकडा दाखवला. मला वाचता येत नाही असे मी त्यांना सांगितले तेव्हा त्या मला म्हणाल्या, “राणी तू शाळेत जाऊ शकतेस”, मी कुसुमताईंकडून वर्तमानपत्राचा तो तुकडा काढून पर्समध्ये लपवला व त्या संध्याकाळी माझ्या मुलाला दाखवला. माझा मुलगा समीरने मला सांगितले की, किडवाई नगरमधील एका सरकारी शाळेबद्दल यात माहिती आहे, जिथे माझ्यासारख्या लोकांना शिकण्याची आणखी एक संधी मिळू शकते. माझ्या वयातील लोकांना विद्यार्थी म्हणून स्वीकारले जाईल, अशी शाळा अस्तित्वात आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता.”

हेही वाचा : Reliance: मुकेश अंबानींच्या रिलायन्समध्ये २१ टक्के महिला कर्मचारी, तर ‘इतक्या’ महिलांनी घेतला मॅटर्निटी लिव्हचा फायदा; नव्या कर्मचाऱ्यांमध्येही तरुणींचा सहभाग अधिक

जेव्हा राणी देवी नवरा घरी आला तेव्हा तिने याविषयी त्याला सांगितले; पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि तो तिला म्हणाला, “या वयात डॉक्टर बनणार का? या वयात कोण शाळेत जाते?” पण, राणीने शाळेत प्रवेश घेण्याचे ठरविले होते. तिचा धाकटा मुलगा समीरने तिला पाचव्या वर्गात प्रवेश करून दिला. राणी देवीचा एक मुलगा दीपक पदव्युत्तर शिक्षण घेण्यास उत्सुक आहे, तर समीर स्कूल ऑफ ओपन लर्निंगमध्ये बीएच्या प्रथम वर्षाला आहे. हे दोघेही राणीच्या शाळेत पालक मिटींगला उपस्थित राहतात. राणी देवीच्या पतीला आजवर माहिती नाही की ती शिक्षण घेत आहे. पवनला वाटते की ती घरकाम करते. राणी देवी सांगते की, माझ्या शेजार्‍यांनासुद्धा याविषयी माहिती नाही.

राणी देवीचा मुलगा समीर म्हणतो, आईने पाचव्या वर्गात ७८ टक्के गुण मिळवले. हे गुण आम्ही दोघा भावंडांना मिळालेल्या गुणांपेक्षा खूप जास्त आहेत.” तर राणी देवीची शिक्षिका बिंदू शर्मा सांगतात की, राणीदेवी खूप मेहनती आहे. या वयात शिकणे सोपे नाही, पण ती अभ्यासासाठी खूप मेहनत घेत आहे.”

सोनू आणि देवांशी

सोनू आणि देवांशी या नवव्या वर्गाच्या विद्यार्थिनी आहेत, पण यांचे नाते हे आई-मुलीचे आहे. होय, ४० वर्षीय सोनू ही तिच्या मुलीची वर्गमैत्रीण आहे. त्या दोघी नववीच्या वर्गात शिकतात.

सोनू दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगते, “झोपडपट्टीपलीकडे मला काहीही माहिती नाही. मी इथेच जन्म घेतला, इथेच वाढली, इथेच लग्न केले. २००१ मध्ये मी दहावीत असताना शाळा सोडली, त्यानंतर माझे लग्न झाले. सासरच्यांनी लग्नानंतर शाळेत पाठवण्याचे वचन दिले होते, पण मला नंतर त्यांनी शाळेत पाठवण्यास नकार दिला. २०१४ मध्ये मी या लग्नातून बाहेर पडले आणि आता मी माझ्या दोन मुलींना घेऊन वेगळी राहते. माझी आई पावलोपावली माझ्या पाठीशी होती, पण २०२२ मध्ये ती आम्हाला सोडून देवाघरी गेली.”

( Express photo by Renuka Puri)

सोनू म्हणते, “सिंगल पालक म्हणून जगणे, कमावणे आणि स्वत: शिकणे कठीण आहे. मी दिवसातून १० तासांपेक्षा जास्त काम करते. कामानंतर मी घरी येते. कारण माझ्या मुलींना झोपडपट्टीत मी एकटे सोडून जाऊ शकत नाही. अनेक ठिकाणी काम करून मी महिन्याला पाच हजार रुपये कमावते. बांधकाम साइटवर मोलमजुरी करणे, घरकाम करणे आणि बेडशीट विकणे इत्यादी कामे मी करते. मी खूप काही सहन केले आहे. आता मला फक्त माझ्या मुलींना चांगले शिक्षण द्यायचे आहे आणि स्वत:ही शिकायचे आहे.”

हेही वाचा : महिलांच्या वाटेवर अडथळ्यांची रांग! लैंगिक छळ अन् भेदभावामुळे नोकरदार महिला हतबल; अहवालातून धक्कादायक माहिती समोर

सोनूने या वर्षी शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा सीबीएसईच्या नियमांमुळे तिला १० वीत नाही तर नववीत प्रवेश घ्यावा लागला. तिची मुलगी देवांशी म्हणते, “तिला तिच्या आईबरोबर शिकण्यात आनंद मिळतो. आम्ही आमचा गृहपाठ एकत्र करतो.”

सोनू आणि राणीदेवी प्रमाणेच, जास्तीत जास्त महिलांनी आपल्या पायावर उभे राहण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे. सोनू आणि राणी देवी या अनेक महिलांसाठी प्रेरणा आहेत, ज्यांना शिकण्याची इच्छा आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When mother go to school read stories of two mother in delhi one her own daughter is her classmate other sons became parent of her school dropout education chdc ndj