सुधीर करंदीकर
नवरात्रीच्या निमित्तानं मी ठरवलं होतं, की रोज सकाळी ऑफीसला जाण्यापूर्वी देवीच्या देवळात जाऊन यायचं. मुलगी यायला तयार झाली, तर तिला पण घेऊन जायचं. ‘ह्यां’ना विचारण्यात काहीच पॉईन्ट नव्हता. एकदम नास्तिक माणूस आहे! माझ्या जाण्यातपण त्यांनी ‘खो’ घातला असता!
आज मुद्दामच सकाळी लवकरच उठले. सगळ्या चपला, सॅन्ड्ल्स उचलून पहिल्याच दिवशी मोठ्या बॅगेत भरून ठेवल्या होत्या. उगीच घालायचा मोह व्हायला नको. कारण सध्या ‘नो फूटवेअर फॉर नाईन डेज्. नो स्लीपर्स ऑलसो!’
पेपरात आजचा रंग बघितला. लाल. साडी/ मॅचिंग ब्लाउज/ मॅचिंग पर्स/ मॅचिंग गळ्यातले-कानातले घालून मी तयार झाले. इतर वेळ असती, तर मॅचिंग सॅन्डल्स पण घातले असते. असो! मुलीला ‘आज येतेस का देवळात?’ विचारलं, तर चक्क ‘हो’ म्हणाली.
पण म्हणाली, “आई, मी येतेय्. पण साडी-बीडी नो वे. रंगाचं बंधन नो वे. आणि मी पायात बूट घालणार. कबूल असेल, तर बोल! साडीचं फार ओझं होतं. नेहमीची पॅन्ट आणि टी शर्ट किंवा लेंगिंग-कुर्ता यांनी मोकळं वाटतं. आणि पायात काही नाही, ही तर मला कल्पनाच करवत नाही. एकतर चालायला सगळीकडे फूटपाथ नाहीत, फरश्या बरेच ठिकाणी उखडलेल्या असतात. लोक थुंकलेले असतात, कुत्र्यांनी ठिकठिकाणी शी केलेली असते. मध्ये-मध्ये दारूच्या फुटक्या बाटल्या पडलेल्या असतात. पायात काचबिच गेली म्हणजे संपलंच. आई, अनवाणी चालण्याचं म्हणजे तू पण जरा जास्तच करते आहेस!”
मी शांतपणे ऐकून घेतलं. ती येतेय हे तरी काय कमी आहे? असा विचार केला.
हेही वाचा… साडी नेसून मॅरेथॉन धावणारी १०२ वर्षांची आजी!
निघताना यांना सांगून निघालो. यांनी टोमणा टाकलाच- “देवीला जाताय, की फॅशन शो ला जाताय?!” मी स्वत:कडे बघितलं. माझं ‘मॅचिंग’ तेवढं डोळ्यावर आलेलं दिसतंय! मग मुलीकडे पाहिलं… आणि लक्षात आलं, की हिनं नेमका आज स्लीव्हलेस कुर्ता घातलाय. कशाला मुद्दाम?… देवीला आवडेल का असं?… असाही विचार मनात डोकावून गेला. दोघी बाहेर पडलो. बरेच स्त्री-पुरूष माझ्यासारखेच अनवाणी चालताना पाहून छान वाटलं. दर्शन घेऊन घरी आले. कपाटातली दुसरी लाल रंगाची साडी काढली आणि ती नेसून बाकीचं मॅचिंग करून अनवाणीच ऑफीसला गेले. आज उपासच होता. त्यामुळे डब्यात साबुदाण्याची खिचडी…
रोज सकाळी देवी दर्शन, दिवसाच्या रंगाप्रमाणे साडी, अनवाणी बाहेर पडणं आणि दिवसभर उपास, असं रूटीन सुरू होतं. जरा हटके, म्हणून २-३ दिवस छान वाटलं. नंतर मात्र उपासाचे पदार्थ आणि अनवाणी चालण्याचा त्रास व्हायला लागला. पण आता ठरवलंय तर रेटण्याशिवाय पर्यायच नव्हता.
म्हणता म्हणता नवमी उजाडली. आज मोरपंखी रंग होता. आज सुटी घेतली होती. सकाळी जरा लवकरच तयार होऊन देवळात गेले. देवळात पाठ टेकता येईल अशी जागा बघून, हात जोडून, डोळे मिटून बसले. केव्हा तंद्री लागली समजलंच नाही…
हेही वाचा… नातेसंबंध: डिझायनर बेबी मिळाली तर?
कोणीतरी डोक्यावर प्रेमानं हात फिरवतंय असा भास झाला. बघितलं, तर समोर साक्षात देवी! मी स्वत:ला चिमटा काढायला हात वर उचलला, तर देवी म्हणाली, “चिमटा काढून खात्री करण्याची गरज नाही. देवीच तुझ्यासमोर आहे! काय गं… दमलेली दिसतेस!”
“दिवसभर ऑफिसचं काम, नंतर घरचं काम… पोटात काही नाही, उपासाच्या पदार्थांमुळे ॲसिडिटी होतेय, अशक्तपणा वाटतोय… अनवाणी चालून टाचा आणि तळवा दुखतोय…” मी हक्कानं माझी तक्रार देवीला सांगितली.
ती म्हणाली, “अगं, पण हे सगळं केल्यामुळेच मी प्रसन्न होते, असं तुम्हाला कुणी सांगितलं?”
“देवीमाते, सगळेच सांगतात! व्रत केल्यानं देवी प्रसन्न होते, हवं ते प्राप्त होतं, असं सगळे सांगतात.”
“मुली, जगात असंख्य लोक आहेत, जे चप्पल विकत घेऊ शकत नाहीत. महिनोंमहिने अनवाणी चालतात. कित्येक लोकांना एक वेळचं जेवणही कसंबसं मिळतं. तुम्ही लोक आचारापूर्वी असा विचार का करत नाही? अगं निरनिराळ्या काळांमध्ये, तेव्हाचा संदर्भ लक्षात घेऊन, तेव्हाच्या संतांनी, ज्ञानी लोकांनी उपदेश केलेले असतात. काळ पुढे जातो आणि संदर्भ मागेच राहतात! पुढे काय येतं, तर ‘नवरात्रीत अनवाणी चाला, रोज उपवास करा, रोज निरनिराळ्या रंगाच्या साड्या नेसा आणि देवीला प्रसन्न करा!’ ”
देवीच पुढे म्हणाली, “तू असं बघ, की आपण नवरात्रीत एखाद्याला- जो चप्पल विकत घेऊ शकत नाही त्याला चांगली चप्पल घेऊन देऊ शकू का? एखाद्या उपाशी व्यक्तीला अन्न देऊन, त्याच्या पोटाचा उपवास मोडायला मदत केलीत तर ते मला आवडेल. आणि नवरात्रीत तुला निरनिराळ्या रंगाच्या साड्या नेसायला आवडतात, तर जरूर नेस; पण रोजच आपण प्रसन्न, आनंदी कसं राहू शकू, याकडे लक्ष दे. स्वत:च्या शारीरिक-मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष दे! सगळी कामं स्वत:वर ओढवून दगदग करून घेण्यापेक्षा घरातल्या इतरांनाही त्यात सामावून घे…”
देवीनं बोलता बोलता माझ्या डोक्यावर हात ठेवला… आणि लक्षात आलं, की शेजारचं कुणी तरी माझ्या दंडाला धरून मला हलवत होतं. डोळे मिटल्या मिटल्या माझी लागलेली तंद्री मोडली. देवीला नमस्कार करताना जाणवलं, जणू देवी मंद स्मित करत मला आशीर्वाद देते आहे. काही तरी नवीन सापडल्याच्या आनंदात मी घरी निघाले, डोक्यात पुढे काय करायचं याचे काही प्लॅन्स आखत!
srkarandikar@gmail.com