स्मिता देवदत्त जोगळेकर
ज्या जोडीदाराबरोबर आयुष्यातली महत्त्वाची तीस-चाळीस वर्षं जगलो त्या साथीदाराचं सोडून जाणं स्वीकारणं, हे कोणाही संवेदनक्षम माणसासाठी अतिशय अवघड काम असतं. मग जोडप्यातली मागे राहिलेली व्यक्ती स्त्री/ पुरूष, कुणीही असो. मुळात वैधव्य किंवा विधुरत्व कोणाच्या हातात नसतं. मान्य आहे, की जीवनसाथी गमावल्यानंतर कसं आयुष्य जगावं हे कोणी शंभर टक्के ठरवू शकत नाही आणि ठरवलंच तरी पूर्णपणे प्रत्यक्षात कदाचित आणू शकत नाही. तरीही ज्याप्रमाणे आपण आपल्या भविष्याची आर्थिक तरतूद करून ठेवतो, त्याचप्रमाणे नवरा-बायकोमधलं कोणीतरी एक आधी जाणार, हे वास्तव स्वीकारून, त्यानंतरच्या एकटं राहणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्याबाबत विचार करून ठेवणं, आर्थिक नियोजनाएवढंच महत्त्वाचं आहे. खरंतर वयाच्या पन्नाशीपासूनच नवरा-बायकोंनी ‘जर-तर’च्या सगळ्या शक्यतांवर मोकळेपणी आणि स्पष्ट बोलणं आवश्यक आहे.
रिटायरमेंटचा पैसा हाती आलेली मंडळी हल्ली बरेचदा ‘स्वतःसाठी जगणं’ या संकल्पनेला पुरेपूर जागत आयुष्य एन्जॉय करताना दिसतात. मात्र छान लयीत चालणाऱ्या गाडीच्या रुळांचा खडखडाट होतो. गाडीचं एक चाक निखळतं आणि पुढचा सगळा प्रवास विस्कटून जातो. अर्थात हे कधीतरी होणारच आहे हे सत्य कठोरपणे स्वीकारणाऱ्या व्यक्ती हा बिघडलेला प्रवास काही अंशी तरी रुळावर आणू शकतात. यात साथीदार जाण्यापूर्वी दोघांनी मिळून केलेलं नियोजन कामी येतं. बरेचदा आसपासची मंडळी, नातेवाईक, मित्र वगैरे सर्वतोपरी मदत करायला तयार असतात; मात्र साथीदार गमावलेली व्यक्ती मनानं एवढी खचलेली असते, की ही प्रस्तावित मदतसुद्धा ती योग्य तऱ्हेने स्वीकारू शकत नाही. म्हणूनच पन्नाशीनंतर किंवा साठीनंतर तर नक्कीच या एकटेपणावर ठोस उपाय शोधला गेला पाहिजे आणि एकटेपणीच्या आयुष्यातल्या दैनंदिन जगण्यातल्या प्रश्नांवर खोल विचार झाला पाहिजे.
यात मुख्यत्वे एकटं राहणाऱ्या व्यक्तीनं शारीरिक- मानसिक- भावनिक- कौटुंबिक- सामाजिक आणि आर्थिक अशा सर्व पातळ्यांवर स्वतःचा विचार केला पाहिजे. आपला साथीदार असतानाच परस्परांचे व्यवहार/ जबाबदाऱ्या/ दैनंदिन कामं समजून घेतली पाहिजेत. आणि शक्य असल्यास अधूनमधून ही कामं आपणहून केलीही पाहिजेत. कुटुंबाचे आर्थिक व्यवहार, बँक व्यवहार, आयुर्विमा, करभरणा, गुंतवणुका, अन्य देवाणघेवाण, मुख्य म्हणजे दोघांचे (असल्यास) काही आजार आणि त्यावरची औषधं हे सगळं नवरा-बायको दोघांना ठाऊक असायलाच हवं. इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र योग्य वयात करायलाच हवं.
हेही वाचा… ग्राहकराणी: प्लॉट खरेदी करताय? सावधान
असं म्हणतात, की स्त्रिया जात्याच कणखर असतात आणि कोणत्याही परिस्थितीतून सावरण्याची त्यांची क्षमता अधिक असते. त्यामुळे विधवा स्त्री तुलनेनं पटकन सावरते, स्वतःला उभं करते. दुसरीकडे बायको गेल्यावर नवरा खचून जाण्याची खूप जास्त उदाहरणं आपल्या नजरेसमोर येऊन जातात. पण हे टाळता येऊ शकतं.
बऱ्याचदा घरातील स्त्री आपल्या घराबद्दल, विशेषतः स्वयंपाकघराबद्दल खूप जास्त ‘पझेसिव्ह’ असते. घरातील तिच्या अखत्यारीत असलेल्या गोष्टींवर फक्त तिचा एकटीचा हक्क असल्यागत अनेक गोष्टी ती ‘सिक्रेट’ ठेवते. खरंतर घरातल्या छोट्यामोठ्या कामांमध्ये नवऱ्याला सहभागी करून घेतल्यास स्त्रीला मदत मिळू शकते आणि या गोष्टी नवऱ्याला नीट कळू शकतात. अगदी साधी गोष्ट म्हणजे बेसिक स्वयंपाक, कुकर लावणं, भाजी-आमटी करणं, हे ती नवऱ्याला नक्कीच शिकवून ठेवू शकते. घरातल्या महत्त्वाच्या गोष्टी, फाईल्स, सोनंनाणं (लॉकर ऑपरेशन) हे दोघांना माहित असणं गरजेचं आहे. नवऱ्याला लागणारी औषधं कौतुकानं अगदी त्याच्या हातात काढून देणं म्हणजे नवऱ्यावरचं प्रेम नव्हे तर नवऱ्याला पंगू करणं होय!
‘माझ्यावाचून यांचं पानही हलत नाही’ हे म्हणण्यात काही स्त्रियांना धन्यता वाटते. वास्तविक नवरा-बायको दोघांचे हातपाय धड असताना बायकोनं सहा-आठ महिन्यात एकदा तरी चार दिवसांसाठी नातेवाईक किंवा मित्र/ मैत्रिणींकडे अथवा चक्क सहलीला जायला हवं! म्हणजे या चार दिवसात ‘एकटं राहणं म्हणजे काय’ याची नवऱ्याला जाणीव होऊ शकते. पुढे खरोखर एकटं राहायची वेळ आल्यावर हीच गोष्ट मदतरूप होऊ शकते आणि ‘माझ्यावाचूनही माझा नवरा व्यवस्थित सगळं मॅनेज करू शकतो’ हे समाधान स्त्रीला जिवंतपणी मिळू शकतं. वास्तविक एकटं राहणाऱ्या प्रौढ/ वयस्कर जोडप्यानं आपले व्यवहार शक्यतो स्वतःच करावे, शक्यतोवर कोणत्याच गोष्टीसाठी मुलांवर किंवा अन्य कोणावर अवलंबून राहू नये.
आपला आहार विहार, आरोग्य, व्यायाम, छंद, पर्यटन, बागकाम, मित्रमैत्रिणींशी/ नातेवाईकांशी भेटीगाठी या सगळ्याचा समतोल; साथीदार जिवंत असल्यापासूनच राखला, तर रूळ बदलताना काही काळ खडखड होईल, पण गाडी रुळावरून अगदीच घसरणार नाही एवढं नक्की. खरंतर नोकरीतून रिटायर झालेल्या पुरुषाला वेळ खायला उठतो असं म्हणतात. (काही सन्माननीय अपवाद वगळूया). मात्र नोकरी करणारी स्त्री नोकरीतून निवृत्त झाली तरी पहिले काही दिवस सोडता ती घरातल्या कामांमध्ये स्वतःला असं काही गुंतवून टाकते, की रिकामपण असं तिला मिळतच नाही. वास्तविक अति ताणाची कामं सोडता, सतत कार्यमग्न राहणं हे स्त्रीसाठी शारीरिक मानसिक आरोग्याचं वरदानच ठरतं.
हेही वाचा… गच्चीवरची बाग: झाडांचे जीवन जलसिंचन
सगळ्याचा सारांश एवढाच, की ‘तू गेल्यावर काय?’ किंवा ‘मी एकटा किंवा एकटी माझं आयुष्य कसं जगेन?’ या आणि अशा मुद्यांवर नवरा-बायकोनं धीटपणे आणि स्पष्टपणे चर्चा केली पाहिजे. उलट या अशा मोकळ्या चर्चेमुळे पुढे एकटं राहताना, कण्हत-कुथत राहण्यापेक्षा, नेमकेपणी काय करावं, याचे काही उपयुक्त सल्लेसुद्धा एकमेकांना देता-घेता येतील. अगदी वृद्धाश्रमात जाऊन राहण्याच्या पर्यायापर्यंतसुद्धा विचार करता येऊ शकतो. पूर्वीच्या वृद्धाश्रमांचं उदास रूप हल्ली बदलून गेलं आहे. हल्ली वृद्धाश्रम सर्व सुखसोयी आणि आरोग्यसुविधांनी युक्त असेसुद्धा असतात. प्रसन्न, मोकळं वातावरण, आधुनिक उपकरणं, वगैरेंची सिद्धता असल्यामुळे वृद्धाश्रम ‘अरे बापरे’ नसून काही ठिकाणी ‘अरे व्वा’सुद्धा झाले आहेत. म्हणूनच या पर्यायाचाही खुलेपणी विचार होऊ शकतो. तेव्हा ‘एवढ्यात का मी जातीये/ जातोय?’ किंवा ‘कशाला असं अभद्र बोलावं… वास्तू तथास्तु म्हणत असते!’ वगैरे ‘सो कॉल्ड’ भावनिक दिखाऊ डायलॉग न मारता, किंवा निष्कारण आधीच डोळ्यातून टिपं न गाळता, चक्क समोरासमोर बसून बोलून काही गोष्टी ठरवल्या, तर वैधव्य किंवा विधुरपणसुद्धा (आनंदाचं नाही म्हणू शकत, पण) सुसह्य, स्वीकारार्ह मात्र आपण नक्कीच करू शकतो.
साठीनंतरच्या आरोग्याची बेगमी किंवा तरतूद म्हणून वयाच्या चाळिशीपासून प्रयत्न सुरु केल्यास तब्येत शक्य तेवढी उत्तम राखता येईल. बहुतांश वेळेस नकारात्मकतेच्या मुळाशी आपलं अनारोग्य असतं. तेव्हा शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राखलं, तर बऱ्याच गोष्टी आपोआप सुरळीत होऊन जाऊ शकतात. अगदी साथीदाराचं जाणं धैर्यानं स्वीकारण्याची शक्तीसुद्धा मिळू शकते.
मुलं, नातवंडं, नातेवाईक सगळे आपल्या आयुष्यात असतातच; पण शेवटी ‘मला तू आणि तुला मी’ म्हणेस्तोवर ‘फक्त मी एकटा किंवा मी एकटी’… हे टप्पे प्रत्येकाच्या आयुष्यात यायचेच यायचे. तेव्हा कोणाहीवरचं अवलंबित्व कमी करण्याची सवय खूप आधीपासून लावून घेतल्यास हा ‘मी एकटा वा एकटी?’वाला टप्पाही सहज स्विकारता येऊ शकतो. खाली मान घालत, दयनीय स्वरात ‘बघा ना, मी बिचारा एकटा’ असं न म्हणता ‘होय, आहे मी एकटा/ एकटी… पण मजेत आहे!’ असं खणखणीतपणे सांगता येऊ शकतं. आणि हीच त्या गेलेल्या साथीदाराला प्रेमाची श्रद्धांजली होऊ शकते!
smita_dj@hotmail.com