भारतात पुरुषप्रधान संस्कृतीमुळे नेहमी महिलांना दुय्यम वागणूक मिळाली. तिने वर्षानुवर्षे अनेक गोष्टी सहन केल्या. आज परिस्थिती बदलली आहे. स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने वावरत आहेत. देश खूप पुढे गेला आहे, पण तरीसुद्धा महिलांविरुद्ध अत्याचार कमी झालेला नाही. आजही देशात लाखो स्त्रिया घरगुती हिंसाचाराच्या शिकार होतात.
या संदर्भात नुकताच मुंबईतील एक अहवाल समोर आला आहे. या अहवालात मुंबईत हुंड्याव्यतिरिक्त इतर कारणांमुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाचपटींनी वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांमध्ये घरखर्च, पती-पत्नीमधील मतभेद, अनैतिक संबंध आणि क्षुल्लक कारणांमुळेही त्रास दिल्याच्या तक्रारी येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर आपण महिला सक्षमीकरणाचे नारे देतो तर कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाचपटींची वाढ कशी काय? आणि ते सुद्धा राज्याच्या राजधानीत? मग बाकी जिल्हे किंवा शहरे सोडून द्या. जर मुंबईसारख्या सुशिक्षित शहरामध्ये ही परिस्थिती असेल तर गाव खेड्यात काय परिस्थिती असावी? तिथे कौटुंबिक हिंसाचार होत नसेल का? खरंच याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

हेही वाचा : IND vs NZ : विराटच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिलेली अनुष्का; पतीच्या यशासाठी पत्नीचा सहभाग किती मोलाचा?

अत्याचाराचा स्त्री वर्षानुवर्षांपासून सामना करत आहे. पूर्वी महिला अत्याचाराविरुद्ध तक्रार करणे टाळायच्या, पण आता असे होत नाही. आता अनेक महिला अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतात, बोलतात आणि लढतात. महिला अत्याचारांविरुद्ध जागरुकता आणि शिक्षणाचं प्रमाण वाढल्याने अन्यायाविरोधात तक्रार करण्याऱ्या महिलांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. त्यामुळे कदाचित मुंबईचा आकडा इतका स्पष्टपणे दिसतोय.

ज्या शहरांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये महिला अत्याचाराविरुद्ध तक्रार नोंदवल्या नाही तिथे महिला अत्याचार शुन्य आहे, असे गृहीत धरणे सुद्धा चुकीचे आहे. हे प्रमाण गाव खेड्यात जास्त प्रमाणात दिसून येते. मानहानी होऊ नये, म्हणून अनेक महिला तक्रार नोंदवणे टाळतात आणि अत्याचाराचे शिकार होतात पण याविषयी जागरुकता पसरवणे, खूप जास्त गरजेचे आहे.

महिलांनो, तुम्ही शिका, स्वत:च्या पायावर उभे व्हा. अत्याचाराविरुद्ध आवाज उठवा. आज तु्म्ही शांत बसाल तर तुम्हाला पाहून तुमच्या येणाऱ्या पिढ्याही शांत बसतील. एक महिलाच एका महिलेची ताकद असते. तुमच्या आजुबाजूला होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यास महिलांना प्रेरित करा. त्यांना मदत करा. स्त्री सक्षमीकरण ही एक दिशा आहे. या मार्गावर जायचं असेल तर वाटेवर येणाऱ्या अत्याचाराचा महिलांना ताकदीने सामना करावा लागेल तरच महिलांविरुद्ध अत्याचार थांबतील.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When will stop violence against women as awareness spread increase in the number of complaints against atrocities ndj