दिवाळी म्हटलं की खरेदी, फराळ, हे तर असतंच. पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे घरातली आवरासावर! ऑफिसमध्येही हेमा आणि रेवतीच्या याबद्दलच गप्पा सुरू होत्या. “आवर-सावर म्हटलं की एकदम डोळ्यांसमोर अंधारीच येते! एरवीही रोज अर्धा तासापेक्षा जास्त वेळ स्वच्छता करूनही दिवाळीच्या आधी ‘अहो आईं’चं “हे राहिलं… ते राहिलं…” सुरू होतं. ऑफिसचं काम करून थकून घरी जाते मी. मला हे सारं सहन होत नाही!” अशी तणतण करत हेमा की-बोर्डवर दणदणाट करत टाईपिंग करत राहिली.
तिचा रेवती गेले काही दिवस बघत होती. खरं तर तर हेमा असो, वा रेवती. दोघींची अवस्था ‘एकाच नावेचे प्रवासी’ अशी होती. दोघी भरल्या घरातल्या. आजच्या भाषेत ‘जॉईंट फॅमिली’मधल्या. सासू-सासरे, मुलं, कुटुंबातले सदस्य, नातेवाईक, शेजारी… संख्या कमी अधिक. पण माणसांनी आणि सामानानं भरलेली घरं दोघींचीही. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचे ताल-तोल, ‘टीनएजर’ मुलांचे बदलत जाणारे मूड, नवऱ्याचं काम आणि त्याच्या वेळा सांभाळण्याच्या नावाखाली पत्नीच्या अंगावर टाकल्या गेलेल्या अतिरिक्त जबाबदाऱ्या… दोघींचे अनुभव जवळपास सारखे होते.
सण-उत्सव म्हटलं, की सासूबाईंच्या वेगवेगळ्या फर्माईशी सुरू व्हायच्या. हा गाडा ओढायचा सुनांनी- अर्थात हेमा आणि रेवती यांनी. कुठलाही सण धूमधडाक्यात साजरा व्हावा, सगळ्यांना आनंद लुटता यावा, यासाठी दोघी जीवाचं रान करत. घरातली सगळी मंडळी मग सणाच्या सुट्टीत धमाल करत. या सगळ्या हेमा आणि रेवती मात्र कुठेच नसायच्या. दिवाळी सुरू होणार असेल, त्याच्या आधीच्या आठवड्यात काम बघून हेमा आणि रेवती कधी सुट्टी किंवा कधी अर्धी रजा घ्यायच्या. पण दोन्ही आघाड्या सांभाळूनही त्यांना घरातल्या वरिष्ठांकडून ‘ती कुठे काय करते!’ हेच पालपुद ऐकावं लागत होतं. आजही हेमाच्या बाबतीत असंच झालं होतं. घरातली निम्मी साफसफाई संपवून हेमा आता फराळाला लागली होती. पण सासूबाई नाराज दिसल्या. “आपल्याला कुठे काय जमतं? नोकरीपुढे काही सुचतं का आपल्याला? जेव्हा पहावं तेव्हा बाहेरचं काम एके काम! वेळेवर आवरासावर नको, की पूसपास नको… आता इतक्या उशीरा यांची फराळ करायला सुरूवात!’’ अशी सासूबाईंची बडबड ऐकत हेमा यंत्रवत पुढची कामं हातावेगळी करत राहिली.
हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: श्वास
ऐकता ऐकता आपण दिवसभरात काय काय करतो, याची ती स्वत:शी उजळणी करत होती. सकाळी लवकर उठून मुलांचा, नवऱ्याचा डबा, नंतर घरातल्यांसाठी नाश्ता करणं, मग धुण्याचं मशीन लावून धुतलेले कपडे वाळत घालायचे असतात. तेवढ्यात केर-फरशी आणि भांड्यांची बाई येते. भांडी आवरून, वरची आवरासावर करून दुपारचा स्वयंपाक करायचा आणि आपला डबा भरून ऑफिसला पळायचं. संध्याकाळी ऑफिसमधून यायला हेमालाही खूपदा उशीर व्हायचा. पण आल्यावर गरमागरम एक कप चहा मिळेल तर खोटी! उलट कुटुंबीयांनी संध्याकाळी चहा पिऊन न विसळता तशाच ठेवलेल्या कप-बश्या आपल्याला आंघोळ कधी घातली जातेय, याची वाट पाहात असायच्या! रात्रीचा स्वयंपाक काय करावा हे चक्र तोवर डोळ्यात सुरू व्हायचंच. दिवस कसा जातो हे हेमा आणि रेवतीला कळायचं नाही. एवढं करूनही ‘ही कुठे काय करते!’ हेच ऐकावं लागतं… म्हणजे नेमकं आपण आणखी काय करायला हवंय?… असा प्रश्न हेमा स्वत:ला विचारत राहिली.
सासूबाईंचे टोमणे ऐकताना हेमाच्या तोंडावर आलं होतं, की या आपल्या लाडक्या लेकाला- हेमंतला का नाही कधी बोल लावत? त्याला सांगा की कधीतरी घरात मदत करायला! प्रत्येकानं घरात थोडी थोडी मदत केली, तर तुमच्या सांगण्याप्रमाणे कामं पुढे सरकतील! अर्थात आता वाद घालण्यात हेमाला रस आणि शक्ती, दोन्ही नव्हतं.
हेही वाचा… म्हातारपणी जोडीदाराची साथ सुटल्यानंतर काय?… याचंही नियोजन आवश्यक
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये चहाच्या सुट्टीच्या वेळी हेमा आणि रेवतीच्या गप्पा सुरू झाल्या. हेमानं कालचा सगळा अनुभव सांगितला. ती रेवतीला म्हणाली, “दिवाळी हा सर्वांचा सण! घरातली बाई तर या निमित्तानं घरासाठी राब राब राबते! मग आपण या सणाचा आनंद का नाही घ्यायचा? एकीकडे ऑफिस, घरातल्या बाकी जबाबदाऱ्या, दिवाळीची आवराआवर, फराळ बनवणं, यात आपली स्वत:ची दिवाळी हरवतेय. दिवाळी तोंडावर आली तरी दिवाळीचा मूडच येत नाहीये! उलट कामाचा ताणच येतोय…”
मग त्यांनी काही पर्याय शोधले. की आता बास! ‘आपणही दिवाळीच्या मूडमध्ये शिरूया आता. दिवाळीची उरलेली आवरासावर करायला मदतनीस घेऊ या हाताशी. थोडे अधिक पैसे देऊन तो प्रश्न निकालात काढू या. यंदा उरलेला फराळही विकत आणू या. अर्थात चांगल्या दर्जाचे, साजूक तुपातले किंवा चांगल्या रिफाईंड तेलातले पदार्थ निवडून ऑर्डर करू. ते लगेच मिळतात हल्ली. बासनात पडलेली पैठणी, अंगभर दागिने असा नट्टापट्टा यंदा दिवाळीला आपणही करू. आकाशकंदिल, पणत्यांसह ‘सेल्फी’ काढू आणि सर्वांच्या नाकावर टिच्चून ‘स्टेटस’ ठेवू!’ पण त्याआधी पार्लरवालीची अपाईंटमेंट घ्यायला हवी होती!
असे मनोरथ त्या करत राहिल्या. ‘म्हणूदेत घरात कुणाला काय म्हणायचंय ते! ‘खर्चाची उधळपट्टी होतेय’ असं कुणी मुद्दाम म्हटलंच, तर आपला बोनस हातात टेकवायचा! ‘बुरा न मानो दिवाळी हैं’ म्हणत एखादा ॲटमबॉम्ब, नाहीतर गेलाबाजार लवंगी तरी फोडायची!’ असं म्हणत दोघींनी मनमुराद हसल्या आणि चहा संपवून ऑफिसच्या कामाकडे वळल्या.
lokwomen.online@gmail.com