वनिता पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सचिनचा विक्रम मोडून स्वतःचा विक्रम प्रस्थापित करताना विराट कोहलीने त्याच्या बायकोला, अनुष्का शर्माला देखील आपल्या विजयाचं श्रेय दिलं आणि एक वर्तुळ पूर्ण झालं.

कोविड नंतरच्या काळात सगळं जगच डिप्रेशनमध्ये असताना कुठल्या तरी सामन्यांमध्ये विराट कोहलीला सूर सापडत नव्हता. कोणत्याही खेळाडूच्या बाबतीत ही खरं तर अगदी सामान्य गोष्ट, पण विराटला फॉर्म सापडत नव्हता याच अपश्रेय दिलं गेलं त्याच्या बायकोला, अनुष्का शर्माला…
का?

कारण आपली भारतीय मनोवृत्ती. पुरुषाच्या आयुष्यात चांगलं झालं तर ते त्याचं कर्तृत्व आणि वाईट काही घडलं तर कारणीभूत मात्र बायको. ती अपशकुनी, पांढऱ्या पायाची.

अगदी जूनमधल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपण हरलो तेव्हा अनुष्काला ट्रोल केलं गेलं होतं. कोविड काळात अनुष्काच्या बॉलिंगवर विराटने प्रॅक्टिस केली म्हणून म्हणे त्याची प्रॅक्टिस नीट झाली नाही. आणि त्याचा फॉर्म गेला. अगदी सुनिल गावसकर यांच्यासारख्या दिग्गजालादेखील अशी टिप्पणी करण्याचा मोह आवरला नव्हता.

मग आता विराटच्या विक्रमाचं, त्याच्या फॉर्मचं थोडं तरी श्रेय अनुष्काला देणार की नाही?

हेही वाचा… स्त्रीनं तिचं मत मांडलं की ती ‘पुरुषी’? अभिनेत्री बिदिता बागनं सांगितला तिचा अनुभव

अनुष्का शर्मा असो की आणखी कुणी, ती नुसती नावापुरती थोडीच असते त्याच्या बरोबर? त्याच्या प्रत्येक गोष्टीत ती आपला जीव पाखडत असते. त्याच्या प्रत्येक पावलाबरोबर तिचा जीव घुटमळत असतो. त्याच्या प्रत्येक यशाबरोबर तिचा जीव आभाळभर होतो आणि त्याच्या प्रत्येक अपयशाबरोबर तिचाही जीव त्याच्यातून जास्त जळतो. त्याला हवं ते सगळं मिळावं म्हणून आपलं काळीज पांघरत राहते ती त्याच्या प्रत्येक वाटेवर. कासावीस होत राहते त्याच्या प्रत्येक चिंतेवर.

त्याचंही असंच होतं की नाही, याची पर्वा नसतेच तिला. आपल्या बरोबर असलेल्या ‘मर्दा’मधून एक माणूस कोरून काढण्याची, त्याला अधिकाधिक पूर्ण करत जायची तिची धडपड असते.

ही धडपड ज्याला कळते, तो विराट कोहली होतो.

एका रांगड्या पंजाबी मुंड्यामधून जन्माला येतो एक सच्चा प्रियकर. १०० कोटी भारतीयांसमोर निधड्या छातीने उभा राहतो आणि सांगतो, हे सारं श्रेय तिचंच आहे. तुम्ही तिच्या पदरात माझ्या अपयशाचं माप टाकलंत, तेव्हा मी काही बोललो नाही. पण आता माझ्या यशाची भागीदारही तीच आहे.

अनुष्का, हे श्रेय तुझंच आहे…

एकदा नाही, अनेकदा तो हेच बोलून दाखवतो की तिने मला पूर्ण बदलवून टाकलंय. माझ्या मर्यादा घालवून माझ्यामधून एक चांगला माणूस घडवला आहे.

ती माझं लेडी लक आहे…

हे ऐकताना पाणावतात प्रत्येक भारतीय स्त्रीचे डोळे…

कारण तिलाही हवी असते पोचपावती…

तिने तिच्या त्याच्यासाठी रांधलेल्या स्वयंपाकासाठी, घासलेल्या भांड्यांसाठी, धुतलेल्या कपड्यांसाठी, आजारपणात जागवलेल्या रात्रींसाठी… त्याच्यासाठी तळमळलेल्या प्रत्येक क्षणासाठी.

तिलाही हवा असतो कौतुकाचा एक शब्द तिच्यासाठी…

पण अजूनही तिच्या ‘मर्दा’मधून प्रियकर कोरून काढणं तिला जमलेलं नाही.

अनुष्का शर्माला मात्र ते जमलंय.

ते श्रेय तिचंच…