-अपर्णा देशपांडे
मी इशिता. वय वर्ष चोवीस. आज इथे माझ्याबाबतीत घडलेला वाईट प्रसंग आणि त्याचा मी केलेला सामना याविषयी बोलणार आहे. माझं एम.कॉम झालं आणि मी एका खासगी कंपनीत कामाला लागले. तिथे माझी ओळख संदीपशी झाली. तो तिथल्या तीन चार कंपन्यांसाठी कॅन्टीन चालवायचा.
देखणा, उंचापुरा संदीप, त्याची बोलण्याची स्टाईल, आणि एकूण व्यक्तिमत्वाची मला भुरळ पडली. आम्ही कॉफीसाठी, कधी डिनरसाठी बाहेर भेटू लागलो. काही महिन्यांतच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. तोपर्यंत घरात माझ्या लग्नाचा विषय सुरू झाला होता. मी घरच्यांना संदीपशी ओळख करून दिली. माझ्या आईबाबांना तो फारसा पसंत पडला नाही कारण त्याच्या घरच्यांबद्दल त्यानं नीट माहिती दिली नाही. आई वडिलांना भेटायचं म्हटल्यावर गुळमुळीत उत्तर दिलं. माझे आई-वडील मला स्पष्ट म्हणाले, की त्याच्या घरच्यांची भेट घेतल्याशिवाय ते कुठलंही मत देणार नाहीत.
संदीप म्हणाला, की दोन आठवड्यात आईवडिलांना घेऊन येतो, पण काही ना काही कारण काढून तो ती भेट टाळू लागला. फोन नंबर द्यायला देखील टाळाटाळ केली. माझ्या आईनं मला सांगितलं, “हे बघ इशिता, हा मुलगा मला योग्य वाटत नाही. तू याचा नाद सोड.” पण मी प्रेमात आंधळी झाले होते. दरम्यान, संदीप मला वेगवेगळ्या भेटवस्तू देऊन आणखी छाप पाडू लागला.
आणखी वाचा- फौजदारी प्रकरणातील समझोता म्हणजे घटस्फोट नव्हे!
माझे वडील म्हणाले, “आपल्याला सरळ त्याच्या घरी जाऊन नीट चौकशी करावी लागेल. तू कुठलेही चुकीचे पाऊल उचलू नकोस. पुढे मनस्ताप होईल, असं वागू नकोस.” मी त्यांचं ऐकायला हवं होतं. नेमकं तिथेच मी चुकले. ”
एक दिवस संदीप म्हणाला, “त्याच्या बहिणीचं लग्न ठरलं आहे आणि आई-वडील त्यात बिझी असल्याने आत्ता पर्यंत इथे येऊ शकले नाहीत. तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मग त्यानं व्हिडिओ कॉल करून पहिल्यांदा माझं बोलणं त्यांच्याशी करून दिलं. ते माझ्याशी खूप छान बोलले. लग्नाला आवर्जून येण्याचा आग्रह केला. मी तर आनंदाने वेडी झाले. मनातील शंका दूर झाल्या.
माझा विश्वास जिंकल्यानंतर तो म्हणाला, “इशू, आता तू आणि मी काही वेगळे नाही आहोत. माझी एक इच्छा पूर्ण करायला तुझी मदत हवी आहे.” असं म्हणून त्यानं बहिणीच्या लग्नासाठी माझ्याकडून पाच लाख रुपये मागितले. प्लीज घरी सांगू नकोस, असंही म्हणाला.
माझे आईवडील माझ्या पगारातून पैसे घेत नसत. त्यांनी ती रक्कम माझ्यासाठीच वेगळी ठेवली होती. मला इतकी भुरळ कशी पडली माहीत नाही आणि मी चक्क त्याला तितके पैसे दिले. त्यानं चेक नको म्हणत दोन टप्प्यात कॅश मागितली. मी तेव्हा तरी सावध व्हायला हवं होतं, पण माहीत नाही कशी काय चूक करून बसले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला न सांगता तो गायब झाला.
मी वारंवार फोन केले, पण त्याचा फोन बंद होता. मी त्याच्या कॅन्टीनमध्ये गेले. तिथे त्याचा पार्टनर होता. तो म्हणाला, की तीन महिन्यापूर्वीच त्यानं कॅन्टीनची नोकरी सोडली होती. मी पुरती फसवले गेले आहे, हे माझ्या लक्षात आलं. मला आई- वडिलांच्या सावध इशाऱ्याचं महत्व समजलं. मग मला लक्षात आलं की त्यानं अनेक वेळा मला त्याच्या रूमवर रात्री येण्यासाठी किंवा हॉटेलवर एक रात्र मुक्कामी जाण्यासाठी सुचवलं होतं अनेकदा शारीरिक संबंध ठेवण्याची आडून आडून मागणी केली होती. नशीब मी त्यावेळी भुलले नाही. हे सगळं झाल्यावर मी सरळ आई बाबांकडे गेले. कारण काहीही झालं तरी शेवटी तेच आपल्याला संकटातून सोडवत असतात. त्यांच्याशी काय असेल ते खरं बोलण्याची गरज असते.
बाबा आधी चिडले, पण नंतर मला समजावून घेतलं. आम्ही पोलीसात तक्रार केली, पण पोलीस म्हणाले, मी त्याला रोख पैसे दिले ही मोठी चूक केली होती. तो सापडेल की नाही माहीत नाही, पण मला मात्र आयुष्य भराचा धडा मिळाला.
माझ्या बाबतीत जे घडलं ते तुमच्या बाबतीत घडू नये म्हणून हे सगळं सांगितलं. प्रेमात पडताना तुमचं हृदय काहीही म्हणो, मेंदू सतत सावध ठेवायला हवा मैत्रिणींनो. डोळे झाकून वागलात तर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. जे झालं ते झालं, आता इथून पुढे खूप खूप सावध राहायचं. कुणीही येऱ्यागेऱ्या माणसानं आपला फायदा घेऊन आपल्याला फसवावं इतकं लेचंपेचं मुळीच राहायचं नाही.
adaparnadeshpande@gmail.com