पूर्वीच्या काळी म्हणजे साधारण पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या समाजात वधुपित्याकडून सर्रास हुंडा घेतला जात असे. ठराविक रक्कम आणि सोनं न दिल्यास दोन्ही बाजूने पसंती असतानाही लग्न मोडत असत. दोन्ही बाजूने मंडळी समोरासमोर बसत आणि ‘भाव’ किंवा ‘बोली’ लावल्या सारखा हुंड्यासाठी तुंबळ वाद होत असे. त्या नंतर मात्र निदान सुशिक्षित समाजात हुंडा मागणं या प्रथेत लाक्षणिक घट झाली.
आणखी वाचा : मुलांचं जननेंद्रिय हाताळणं आणि पालकांचं रागावणं
तरुणांची आणि त्यांच्या पालकांची बदललेली सकारात्मक मानसिकता या बदलाला कारणीभूत आहे जे निश्चितच स्वागतार्ह आहे. असं असूनही आज हुंडा पद्धत शंभर टक्के पूर्णपणे संपली आहे असं आपण म्हणू शकतो का? दुर्दैवाने नाही. सरळ सरळ पैसा नाही मागितला तरी लग्नात मुलीच्या वडिलांकडून इतर किमती वस्तूंची अपेक्षा केल्या जाते. मोठी कार, किंवा फ्लॅटसाठी मदत न केल्यास बायकोला माहेरी परत पाठवणारे आजही दिसतात.
आणखी वाचा : सनटॅन? विसरून जा…
मुलगी स्वतः शिकून अर्थार्जन करणारी असली, तरीही तिच्या पित्याकडून सतत आर्थिक मदतीची अपेक्षा करणारे महाभाग आजही आहेत. मुलीचे आईवडील सधन असतील तर ते त्यांच्या मर्जीने मुलगी- जावयास आर्थिक मदत किंवा किमती वस्तू, दागिने भेट म्हणून देतातच. त्यात त्यांना आनंदही वाटत असतो, पण या मदतीची अपेक्षा जावयाने किंवा मुलीच्या सासरकडून होऊ लागली तर ते नक्कीच चुकीचे आहे.
आणखी वाचा : आपल्या मुलींनीही आजीसारख्याच चौकटी भेदाव्यात- अक्षता मूर्ती
नताशा ही एक पंचवीस वर्षांची फॅशन डिझायनर. शहराच्या मध्यवर्ती भागात ती तिचं स्वतःचं बुटिक चालवत होती. तिचं लग्न एका सीए मुलाशी ठरत असताना त्या मुलानं तिला स्पष्ट विचारलं, “तुझ्या बुटीक मधली अर्धी जागा मला ऑफिस साठी देणार असशील तर माझा होकार आहे.” तिच्या बुटीकमध्ये तशी जागा नसल्याचं जेव्हा तिनं सांगितलं, तेव्हा त्यानं अशी जागा त्याला हवीच असल्याचं ठामपणे नमूद केलं. आणि “तुझ्या बाबांकडून मला लग्नात भेट म्हणून अशीच एखादी जागा मला मिळेलच न?” असा उलट प्रश्न केला. नताशाला त्याच्या या मानसिकतेची कीव आली. “ अरे, आजच्या काळात अत्यंत सन्मानाचा आणि मिळकत देणारा व्यवसाय आहे तुझा. आणि मी देखील माझ्या व्यवसायात खूप लहान वयात स्थिर होत आहे. तू काहीही न बोलता आणि अपेक्षा न करता होकार दिला असतास तर कदाचित पुढे मी स्वतःच तुला माझी जागा देऊ केली असती. पण आत्ता हे बोलून तू खरं तर माझ्यावर उपकारच केले म्हणायचं. मला तुझ्यासारख्या लोभी माणसाशी मुळीच संबंध ठेवायचे नाहीत. तुला शुभेच्छा!” असं म्हणून ती तिथून निघून गेली.
सुचेता अत्यंत देखणी मुलगी. तिच्या रुपामुळे तिला अनेक स्थळं सांगून येत होती. त्यातील एक इंजिनअर मुलगा तिला पसंत पडला. त्यालाही ती आवडली. मुलाची आई म्हणाली, “आमच्या मुलाला त्याच्या इतकीच कमावणारी इंजिनिअर मुलगी सांगून आली होती, पण आता तुमची मुलगी त्याला आवडली. ही तर खाजगी कंपनीत साधी स्टाफ मेंबर आहे म्हणजे पगार फार नसणार. आता या दोघांनी इतक्या कमाईत कधी गाडी घ्यायची, कधी फ्लॅट घ्यायचा, कधी प्रगती करायची? तुम्हीच जर लग्नात मुलीला फ्लॅट दिलात, तर तिच्यावर नोकरीची वेळच येणार नाही.” मुलाची आई चुकीचं बोललीच, पण समोर बसलेला तो तरुण आपल्या आईचं बोलणं ऐकून गप्प होता यायचं सुचेतला जास्त नवल वाटलं. ती म्हणाली, “माझी नोकरी माझा आत्मसन्मान आहे. त्यामुळे आज मी आत्मनिर्भर आहे. खूप कष्टाने मला ती मिळाली आहे. इतरांच्या कष्टावर फुकटात आपल्या ऐश आरामाची स्वप्न बघणारा जोडीदार मला नकोय. असा आडमार्गाने हुंडा मागणाऱ्या मुलाशी मला नातंच नाही जोडायचं !”
लग्न जमवताना मुलाकडील मंडळींनी केलेल्या मागण्या पूर्ण केल्यावर त्यांची अपेक्षा आणखी वाढत जाते हा अनुभव आहे . लग्नानंतर आपली मुलगी अशा लोभी लोकांमध्ये कशी सुखी होईल हा विचार प्रत्येक आईवडील आणि स्वतः मुलीनं केला तर चुकीचे नातेसंबंध जुळवल्या जाणार नाहीत. आणि कधी चुकून लग्न मोडलं तर त्या मुलीला पुन्हा उभं राहण्यासाठी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होणं गरजेचं आहे. योग्य शिक्षण आणि वेळीच पायावर उभं राहून स्वावलंबी होणं ही आजच्या प्रत्येकाची गरज आहे, म्हणजे कुणी कुणावर अवलंबून राहाणार नाही आणि कसली मागणीही करणार नाही.
adaparnadeshpande@gmail.com