सिद्धी शिंदे
Women Parade Naked And Politics: आंधळा राजा, दिशाहीन प्रजा असं काहीसं वातावरण गेल्या काही महिन्यांपासून देशात दिसतंय. अमुक पक्षाचा नेता, तमुक पक्षाला पाठिंबा देणारे गुन्हेगार, पोलिसांच्या समोर मारहाण, आणि मग राजीनामा सत्र. या सगळ्यात ‘माणुसकी’चा मागमूस तरी या देशात राहिलाय का असा प्रश्न पडतो. गेल्या काही महिन्यात सातत्याने गुन्ह्यांचे जे काही प्रकार समोर आले, त्याचा चढता आलेख पाहिला तर प्रत्येक गुन्हा हा आधीच्या गुन्ह्याहून १० पट वरच्या स्तरावर पोहोचताना दिसतोय. जणू काही प्रत्येकाने एकमेकांशी कोण, किती निर्दयी होऊ शकतं याची शर्यतच लावली आहे. एकीकडे गुन्हेगारांची ही शर्यत आणि दुसरीकडे राजकारण्यांमध्ये रोज उठून कोण किती लाज सोडून बोलू शकतं यासाठी चढाओढ!
मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ समोर येऊनही अगदी पंतप्रधानांपासून ते गल्लीत ‘युवा’ नेता म्हणून फिरणाऱ्या पिंट्यापर्यंत सगळेच थंड होते, अर्थात म्हणायला सगळ्यांनी सोशल मीडियावर निषेध नोंदवला; पण त्याचा प्रभाव कमेंट बॉक्सच्या पुढे पोहोचला नाहीच, हे दुर्दैव. शेवटी जबाबदारी घेऊन सुप्रीम कोर्टाने केंद्राला ताकीद दिली. तर यावरही आपल्या अकलेचे तारे तोडून भाजपच्या नेत्याने, “सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा. कशाला हव्यात निवडणुका आणि संसद? खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल.” अशी प्रतिक्रिया दिली.
खरंच, आमदार साहेब तुमच्या या अत्यंत भावपूर्ण विधानातून तुमच्या काळजातील माणुसकीचा झरा कसा ओसंडून वाहतोय हे दिसून आलं. मुळातच आपल्या कामाची (जे आपल्याकडून झालेलं नाही) याची कोणीतरी जाणीव करून देतंय, यावर तुम्ही अहंकार न दाखवता ते मान्य केलत. वर इतक्या त्याग भावनेने समोरच्याला तुमच्या कामाचं जबाबदारी वजा ओझं देऊ केलंत ही एखाद्या साधुचीच वृत्ती म्हणता येईल. भविष्यात खरोखरच “कशाला हव्यात निवडणुका आणि संसद?” या विधानाचा तुमच्या मतदारसंघातील लोकंही विचार करतील अशी अपेक्षा. तरच तुमचे हे उदात्त विचाराचे ट्वीट सार्थकी लागले, असे म्हणता येईल.
या एकाच नेत्याला टार्गेट करतोय असा प्रकार नाही, कारण वर म्हटल्याप्रमाणे, हे सगळे एकाच माळेचे मणी आपल्या काळवंडलेल्या लहान- मोठ्या मोत्यासारख्या विचारांतून आपला निर्लज्जपणा सिद्ध करत असतात. तसंच लगेच दोन दिवसात अशाच एका भाजप कार्यकर्त्याने पश्चिम बंगालमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून महिलांकडूनच मारहाण होत असल्याचा व्हिडीओ ट्वीट केला. खरंतर हा व्हिडीओ समोर आणून या महिलांना न्याय मिळवून द्यावा, पीडितांवरील अन्यायाला वाचा फोडावी असा कुठलाच भाव यामध्ये दिसला नाही. कारण तुम्ही संपूर्ण ट्वीट वाचलं तर त्यात, “बघा बाई कसा स्वतः नागडं होऊन फिरताना आमच्या फाटक्या कपड्यांना नावं ठेवतायत” असा सूर ऐकू येतो.
“पश्चिम बंगालच्या ममता दीदी मणिपूरबाबत बोलतात आणि स्वतःच्या राज्यात काय चाललंय हे बघत नाहीत” हे म्हणताना संबंधित व्यक्तीने एकदा तरी त्या बाईला न्याय मिळवून देण्याची विनंती केली असती तर तेवढंच पापात पुण्य लाभलं असतं. पण नाही, एखाद्या लहान मुलाला कसं शाळेत परीक्षेत कमी मार्क मिळाले तर तो “आई अगं वर्गातल्या सगळ्या मुलांना कमी मार्क आहेत, मग मला कसे चांगले मिळतील” असं सांगतो तसं या नेत्यांना स्वतःचं उघडेपण झाकायला दुसऱ्याचं नागडेपणच दाखवायची सवय झालीये.
हे ही वाचा<< म्हणे, बलात्कार झालाच नाही, फक्त विनयभंग! असं म्हणताना जीभ कशी झडत नाही?
ही सत्ताधाऱ्यांची बाजू झाली. पण समोरच्या बाकावर बसलेले सुद्धा काही धुतल्या तांदळाची साजूक तुपातील खिचडी नाहीत. त्यांचाही प्रत्येक गुन्ह्याचा निषेध हा ‘राजीनामा द्या’ इथवर येऊन थांबतो. ट्रेनचा अपघात झाला, प्रवासी मृत्यूमुखी पडले, रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्या. महिलांची नग्न धिंड काढली, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या, तरुणीचा खून झाला मुख्यमंत्री- गृहमंत्री सगळ्यांनी पदत्याग करा. या सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांनी एकदा तरी समोरच्या मंत्र्यांना “तुमच्याकडून दुर्लक्ष झाल्याने गुन्हा झाला आहे तर आधी तुमची चूक सुधारा, त्या पीडितांना न्याय मिळवून द्या, त्यांचे अश्रू पुसा, गुन्हेगारांना जन्माची अद्दल घडवा” अशी विनंती सोडा ताकीद तरी दिली आहे का. नाहीच देणार, कारण समाजात सुधारणा व्हावी, समाज पुढे जावा हा कोणाचाच हेतू नाही, हा समाज पुढे जाण्यासाठी चाबूक कोणाच्या हातात असावा याचीच प्रत्येकाला काळजी आहे.
हे ही वाचा<< किरण पावसकरांना खुलं पत्र; साहेबांना ‘बायकी धंदे’ करायला सांगाच, कारण…
अशावेळी अटल बिहारी वाजपेयीचं एक वाक्य आठवतं, “सरकारे आयेगी जायेगी, देश टिकना चाहिए”. आणि जर आता देश टिकवायचा असेल तर, सत्ताधारी, विरोधक, पीडित, अत्याचारी, या सगळ्यांमधील ‘माणूस’ टिकणं गरजेचं आहे!