‘हाय! मी आहे आर.जे. ढिंच्याक, आणि तुम्ही ऐकत आहात तुमचा लाडका कार्यक्रम ‘चील मार’! आज आपण बोलणार आहोत, कमावत्या मुली आणि त्यांच्या पगारावरचा त्यांचा हक्क. आपण मुली मेहनत करून पैसे कमावतो, त्यासाठी अपार कष्ट घेतो. त्या पगारावर आपला किती अधिकार असतो? त्याचं नियोजन स्वातंत्र्य आपल्याकडे असतं का? हे नेमकं काय समीकरण आहे, यावर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आली आहे, आपली मैत्रीण मान्यता.

“मान्यता, तुझं काय मत आहे? लग्नानंतर मुलींना त्यांच्या कमाईवर कितपत अधिकार दाखवता येतो?” “इथे अधिकार हा शब्द वापरण्याऐवजी आर्थिक स्वातंत्र्य म्हणू या आपण. स्त्री, तिचा जोडीदार, आणि घरातील इतर मंडळी यांचं एकमेकांशी कसं नातं आहे, किती सामंजस्य आहे यावर सगळं अवलंबून आहे. काही घरात तिच्या पगारावर तिचा अजिबात हक्क नसतो. नवरा, सासू-सासरे हे ठरवतात, की तिची कमाई कशी आणि कुठे खर्च करायची. पण सगळीकडे असं चित्र नसतं. माझा वैयक्तिक अनुभव सांगायचा तर, मी एका कंपनीत मॅनेजर आहे. पगार चांगला आहे. माझे आणि माझ्या पतीचे संबंध अतिशय उत्तम आहेत. त्याचा आणि माझा पैसा एकच आहे. माझं तुझं असं होत नाही. तरीही आम्ही आमच्या कमाईची विभागणी करतो. दोघांच्या सामाईक खात्यातून घरातले महत्त्वाचे खर्च होतात. शिवाय वैयक्तिक खात्यात शिल्लक ठेवली जाते. आपापसांत समजूतदारपणा असल्याने काही अडचण येत नाही.”

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

“तुझ्या माहेरच्यांसाठी खर्च करताना पतीचा हस्तक्षेप असतो का?”

“नाही. तो अजिबात हस्तक्षेप करत नाही. इथे एकमेकांवर विश्वास असणं फार गरजेचं आहे. दोन्ही बाजूचे लोक शेवटी आमचेच आहेत ना? मी सासरच्या लोकांसाठी देखील भरपूर खर्च करत असते, माझ्या वैयक्तिक मिळकतीतून. ती जर माझी जबाबदारी आहे तर माझे आईवडील आणि भाऊ-बहीण यांच्याप्रतिही माझी काही जबाबदारी आहे याची त्याला जाणीव आहे. दिराच्या आजारपणात जर मी आर्थिक मदत करते, तर बहिणीच्या घरासाठीही मदत करूच शकते.”

“तुझ्या बहिणीचा अनुभवही असाच आहे का?”

“दुर्दैवाने नाही. तिच्या बँकखात्याचे सगळे व्यवहार तिचा नवराच बघतो. तिला रोजच्या जाण्या येण्याचे पैसे मिळतात. बसऐवजी कधी रिक्षा किंवा कॅब करावी लागली तर लगेच त्या खर्चाचा हिशेब मागितला जातो. तिच्या वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी देखील तिला नवऱ्याकडून पैसे मागावे लागतातच वर सफाई द्यावी लागते. आणि गंमत सांगू, तिला नवऱ्यापेक्षा जास्त पगार आहे. तरीही ही अशी गत आहे.”

“पण ती हे का सहन करते? आपल्याला स्वातंत्र्य हवं असं तिला वाटत नाही का?”

“वाटतं ना. ऑफिसची ट्रीप जाते, कधी पार्टी असते, कधी कुणाचा वाढदिवस असतो, भेटवस्तू द्यावी लागते. हे सगळं करताना तिला कारण सांगून पैसे मागावे लागतात. तिनं परस्पर कार्ड वापरलं की घरी वाद झालाच समजा. तिला तो वाद अजिबात नको असतो म्हणून ती त्याचं हे असलं वर्चस्व सहन करते. तिचं म्हणणं असं आहे, की बाकी वागण्यात तो अगदी चांगला आहे. खूप काळजी घेतो, फक्त तिच्या पगारावर त्याला अधिकार गाजवायचा असतो. मी दुर्लक्ष करते. का, कसं तिला जमतं माहीत नाही. मला मात्र असं अजिबात नाही जमणार.”

“उद्या तुझं पूर्ण घर तुलाच चालवण्याची वेळ आली तर?”

“आयुष्य आपल्यावर कोणती वेळ आणेल हे काही सांगता येत नाही. उद्या तशी वेळ आलीच तर मी त्यासाठी तयार आहे. आपण नोकरी का करतो? आर्थिक बाजू भक्कम असली की आपलं आयुष्य सुखकर होतं म्हणून. मग ते जर फक्त माझ्या कमाईतून होणार असेल तर त्याला माझी काहीच हरकत नाही.”

“आपल्या मैत्रिणींना काय सांगशील?”

“मैत्रिणींनो, आपण आपल्या माणसांसाठीच कष्ट करत असतो. त्यांच्यासाठी खर्च करतो, पण एक मात्र नक्की. आपल्या कमाईचा कितीही मोठा हिस्सा घरासाठी वापरला तरी थोडा भाग स्वतःसाठी, आपल्या आरोग्यासाठी राखून ठेवा. आपल्या निरोगी म्हातारपणाची तरतूद करणं फार आवश्यक आहे. आपलं आणि आपल्या कमाईचं नातं त्या बाबतीत कायम अतूट असू देत. भक्कम साथ, उत्तम आरोग्य आणि गाठीला पैसा ही यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.”

adaparnadeshpande@gmail.com