साधारण दशकाहून अधिक काळ ज्या चश्म्याच्या फ्रेमने लोकांच्या विशेषतः मुलींच्या मनावर अधिराज्य गाजवले ती फ्रेम म्हणजे, ‘कॅट आय फ्रेम.’ मांजराच्या डोळ्याच्या आकारासारखी असणारी ही फ्रेम आहे. स्टायलिश लूक देणाऱ्या या फ्रेमने अनेकांच्या मनावर मोहिनी घातली. पण, ही फ्रेम कोणी निर्माण केली? या फ्रेमच्या निर्मितीमागे कारण काय होते ? अल्टिना शिनासी कोण आहेत ? हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
आजचे गुगल डूडल पाहून अनेकांना कॅट आय फ्रेम ची आठवण आली असेल. दशकाहून अधिक काळ लोकांच्या विशेषतः मुलींच्या चश्म्याच्या केसमध्ये कॅट आय फ्रेम असायचीच. आजही गॉगल, सनग्लासेस, चश्मा कॅटआय फ्रेममध्ये घेण्याचा लोकांचा कल असतो. पण, या कॅट आय चश्म्याची निर्मिती कोणी केली? अमेरिकेतील शिल्पकार, चित्रपट निर्मात्या, उद्योजक, विंडो ड्रेसर, डिझायनर आणि संशोधक अल्टिना शिनासी यांनी या फ्रेमची रचना केली. त्या ‘हार्लेक्विन चश्मा फ्रेम’ ज्याला कॅट-आय चश्मा म्हणून ओळखले जाते, या रचनेसाठी प्रसिद्ध होत्या. आज त्यांचा ११६ वा जन्मदिन आहे. यानिमित्त गुगलने खास डूडल बनवले आहे.
हेही वाचा : सिग्नलची निर्मिती कशी झाली ? लाल, पिवळा आणि हिरवा हेच रंग का वापरले जातात ?
अल्टिना शिनासी यांचा जन्म ४ ऑगस्ट, १९०७ रोजी मॅनहॅटनच्या अप्पर वेस्ट साइडवरील शिनासी मॅन्शनमध्ये झाला. त्यांचा जन्म एका खानदानी आणि समाजासाठी वाहून घेतलेल्या घरात झाला. अल्टिना यांनी होरेस मान शाळेत आणि नंतर वयाच्या बाराव्या वर्षी मॅसॅच्युसेट्सच्या वेलेस्ली येथील डाना हॉल स्कूलमध्ये प्रवेश घेतला. अल्टिना यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. त्यांच्या चित्रकलेचे शालेय स्तरावर असताना कायम कौतुक होत होते. त्यामुळे त्यांनी आर्ट स्कुलमध्ये प्रवेश घेतला. पुढे कलाक्षेत्रात काम करण्याचे त्यांनी ठरवले.
हेही वाचा : कायदा पुरुषांबाबत पक्षपाती आहे का ? महिलांना असणाऱ्या हक्क-अधिकारांचा गैरवापर होतोय ?
कथा कॅट आय फ्रेमची…
अल्टिना शिनासी यांची खास ओळख ही विंडो ड्रेसर अशी होती. खिडक्यांच्या रचना, त्यांचे डिझाईन यासंदर्भात अल्टिना यांनी काम केले. विंडो ड्रेसर, चित्रपटातील व्यवस्थापन यासंदर्भात काम करत असतानाच त्यांनी ‘हार्लेक्विन’ म्हणजे कॅट आय चश्म्याची फ्रेम तयार केली. या फ्रेमसाठी ती प्रसिद्ध झालीच, तसेच या रचनेचे तिला पेटंटही मिळाले. १९३० च्या दशकात ‘ग्लॅमरस’ लूक देणाऱ्या कॅट आय चश्म्याची रचना त्यांनी केली. एका खिडकीच्या डिझाईनसंदर्भात विचार करत असताना त्यांना या फ्रेमची रचना सुचली. त्या काळात चश्मा हा जाड फ्रेम असणारा, चेहऱ्याला न शोभणारा असा होता. रंगसंगतीच्या बाबतीतही चश्म्यामध्ये पर्याय उपलब्ध नव्हते. एखाद्या स्त्रीच्या चेहऱ्यावर चश्मा आकर्षक कसा दिसेल, चश्म्यामुळे ती छान कशी दिसेल, याचा त्या विचार करत होत्या. अल्टिना यांना हार्लेक्विन मास्क दिसला. या मास्कच्या अनुषंगाने त्यांनी चश्म्याच्या फ्रेमच्या रचना केल्या. याचे विपणन आणि वितरण त्यांनी स्वतः सांभाळले. १९३९ मध्ये, शिनासी यांनी चश्म्याच्या या फ्रेमचे फॅशन ऍक्सेसरीमध्ये रूपांतर केले. त्याच वर्षी त्यांना या डिझाईनबद्दल लॉर्ड अँड टेलर ऍन्युअल अमेरिकन डिझाइन पुरस्कार मिळाला. ‘व्होग आणि लाइफ’ मासिकांनी शिनासी यांना सौंदर्यक्षेत्रातील महत्त्वाच्या योगदानाबद्दल सन्मानित केले. तिने बनवलेला चश्मा हा संग्रहित करण्यात आला. १९४० नंतर या चश्म्याच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली.
या कॅट आय फ्रेमसह अल्टिना या चित्रपट पटकथा लेखिका होत्या. त्यांनी वॊशिंग्टन येथे स्थलांतर केल्यानंतर चित्रपटांच्या निर्मितीमध्येही सहभाग घेतला. कलाक्षेत्रात त्यांनी योगदान दिले. अशा प्रकारे कलात्मक दृष्टी असणाऱ्या अल्टिना शिनासी होत्या.