“लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करनेवालों की हार नहीं होती”, ही कवी सोहनलाल द्विवेदी यांच्या कवितेतील ओळ तुम्ही अनेकदा ऐकली असेल. याचा अर्थ असा की, आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनात असेल आणि प्रयत्न करण्याची तयारी असेल, सारं काही शक्य आहे.” समोर कितीही संकटं आली तरी त्यांना व्यक्तीच्या जिद्द आणि मेहनतीपुढे हार मानावी लागते. अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर मनात असलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करता येतं. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे भारतीय महिला तीरंदाज शीतल देवी. शीतल जगातील एकमेव हात नसलेली महिला तिरंदाज आहे. शीतल देवीने नुकतेच हँगझोऊ येथील पॅरा-आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन पदके जिंकली आहेत. एक रौप्य पदक आणि दोन सुवर्णपदक तिने मिळवले आहेत. अवघ्या १६ वर्षांची शीतल एकाच स्पर्धेत दोन सुवर्णपदक कमावणारी पहिला महिला खेळाडू ठरली आहे.
महिलांच्या दुहेरीत रौप्यपदक पटकावल्यानंतर शीतलने कम्पाऊंड प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदकाची कमाई केली. त्याचबरोबर शीतलने मिश्र दुहेरीतही सुवर्णपदक जिंकले आहे. दोन्ही हात नसताना शीतलने पायाने आपले लक्ष्य भेदून हे यश मिळवले आहे. अंतिम फेरीत शीतलने सिंगापूरच्या अलिम नूर स्याहिदाहचा १४४-१४२ असा पराभव केला.
कोण आहे शीतल देवी
१६ वर्षीय शीतल देवी ही जम्मू-काश्मीरच्या लोह धार गावात किश्तवार येथे राहते. जम्मूच्या माता वैष्णोदेवी तीरंदाजी अकॅडमीमध्ये ती प्रशिक्षण घेते. शीतलचा जन्म फोकोमेलिया या दुर्मिळ जन्मजात विकाराने झाला होता, ज्यामुळे अंग विकसित होत नाही. शीतलला जन्मापासूनच हात नाही, तरीही तिने हार मानली नाही. तिने फक्त ११ महिन्यांपूर्वी शूटिंग सुरुवात केली होती. इतक्या कमी वेळात तिने तिरंदाजी प्रकारात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. अशक्य वाटणारी गोष्ट शीतलने शक्य करून दाखवली आहे.
इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना शीतलने सांगितले की, “सुरुवातीला मला धनुष्य नीट उचलताही येत नव्हते, पण दोन महिने सराव केल्यानंतर ते सोपे झाले. माझ्या पालकांचा माझ्यावर नेहमीच विश्वास होता. गावातील माझ्या मित्रांनीही मला साथ दिली. मला एक गोष्ट आवडत नाही, ती म्हणजे जेव्हा लोकांना समजते की माझ्याकडे हात नाही, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव येतात. पण, या पदकामुळे मी खास असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. हे पदक फक्त माझे नाही, तर संपूर्ण देशाचे आहे.”
हेही वाचा – ‘गेमिंग’च्या ‘पुरूषप्रधान’ क्षेत्रात आता स्त्रियाही पुढे! भारतातील तरूण गेमर्समध्ये ४० टक्के स्त्रिया
संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, पण प्रत्येकाचा संघर्ष हा वेगळा असतो. प्रत्येकाला वाटत असते की, आपल्या आयुष्यात खूप संघर्ष आहे. पण, जेव्हा शीतल देवीसारख्या अशक्यही शक्य करून दाखवणाऱ्या लोकांना पाहिले की समजते, त्यांच्या संघर्षापुढे आपला संघर्ष काहीही नाही. शीतलकडून जर काही शिकायचे असे तर तिच्यासारखी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनात बाळगायला शिका. परिस्थिती कितीही अवघड असो, आपले स्वप्न पाहायला शिका आणि ती पूर्ण करायला शिका. शीतलचा हा प्रेरणादायी प्रवास अनेकांना प्रोत्साहन देणारा ठरला आहे.