अमेझॉनच्या जंगलातील खाणकामाविरोधात यशस्वी लढा देणाऱ्या ‘ती’ची ब्राझिलच्या मुंडूरूकू समुदायाची नेता म्हणून ओळख आहे. ब्रिटीश खाण कंपनी ‘एँग्लो अमेरिकन’ कडून ब्राझिलमधील अमेझॉनच्या जंगलात होणाऱ्या बेकायदा खाणकाम आणि या कामाच्या अनुषंगाने येणाऱ्या योजनांना तिने प्रखर विरोध केला. तिच्या या मौखिक लढ्याचा परिणाम असा झाला की, एँग्लो अमेरिकन कंपनीने या भागातील खाणीविषयीचे २७ संशोधन अर्ज मागे घेतले. तिच्या या पर्यावरणपूरक लढ्याची दखल घेऊन तिला यंदाचा गोल्डमन पुरस्कार प्रदान करून तिला गौरविण्यात आले. या ३९ वर्षीय पर्यावरण लढवय्यीचं नाव आहे एलेस्सांड्रा कोराप मुंडूरूकु!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वात मोठ्या खाण कंपन्यांपैकी एक असलेल्या एँग्लो अमेरिकन कंपनीला हे पाऊल उचलायला भाग पाडणे म्हणजेच एका स्वदेशी समुदायाचा पर्यावरणरक्षणासाठीच्या लढ्यावरील दुर्मीळ विजयच आहे. ब्राझिलियन अमेझॉनमधील जंगलाचे रक्षण म्हणजे पर्यायाने तिथे वास्तव्यास असणाऱ्या मानवी समुदायांचे, दुर्मिळ निसर्गसंपदेचे रक्षण होय. या सर्वांसाठी तिने दिलेल्या लढ्यासंबंधी ‘बीबीसी’ने तिच्याशी संवाद साधला. खाणकामाच्या भस्मासूराशी लढताना तिला भीती वाटली नाही का, असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर उत्तर देताना एलेस्सांड्रा कोराप मुंडूरूकू सांगते, ज्या प्रदेशाचे रक्षण करण्याचा उद्देश मनाशी बाळगला होता, त्याच प्रदेशाने, निसर्गाने मला आंतरिक बळ दिलं. अँग्लो अमेरिकन कंपनी ही इतरांसाठी शक्तिशाली असू शकते. माझ्यासाठी मात्र माझी माणसं, नदी, माझा समाज हेच सर्वात सामर्थ्यशाली आहेत. गेल्या ५०० वर्षांपासून आमचा समाज हक्काच्या भूमीसाठी सातत्याने लढतो आहे. त्यात माझं काम म्हणजे फक्त एका मुंगीचा वाटा इतकंच आहे. मुंगी आपलं काम करत राहणार आहे. समाजमाध्यमांनी आपला हा लढा जगापुढे आणल्यामुळेच अँग्लो अमेरिकन कंपनीवर अधिक दबाव वाढल्याचेही तिने नमूद केले.

आणखी वाचा- मँचेस्टर मॅरेथॉनमध्ये लक्ष वेधलं ते संबलपूरी साडीने!

ब्राझीलच्या स्वदेशी समुदायांची एकजूट आणि ‘अमेझॉन वॉच’ दबावगटाच्या मदतीने एलेस्सांड्राने अँग्लो अमेरिकन कंपनीला ब्राझिलियन अमेझॉनमधील स्थानिक भागातील खाणकाम तसंच खाणसंशोधनासाठीच्या परवानग्या मागे घेण्याचे आवाहन करणारं जाहीर पत्र लिहिलं. ब्राझीलच्या घटनेनुसार आवश्यक असलेल्या स्थानिक समुदायांच्या रितसर संमतीशिवाय हे परवाने जारी करण्यात आले होते.

सुरुवातीला कंपनीने अशा परवानग्या नाकारल्या, परंतु एलेस्सांड्राच्या तीव्र माध्यम मोहिमेनंतर तिने उपस्थित केलेल्या चिंतांचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि ती रास्त असल्याचे पटल्यामुळे तत्पूर्वी मंजुरी दिलेल्या सुमारे दोन डझनाहून अधिक संशोधन अर्जांना औपचारिकरित्या मागे घेत असल्याचे अँग्लो अमेरिकन कंपनीने प्रकरणावर पडदा टाकताना म्हटले. अँग्लो अमेरिकनसारख्या बलाढ्य कंपनीनेच पाऊल मागे घेतल्यानंतर व्हेल ह्या खाण कंपनीनेदेखील त्यांचे अनुकरण केले. स्थानिक प्रदेशातील संभाव्य विकासासाठी तिथल्या समुदायांची संमती असली पाहिजे, हे आपण ओळखले आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी आपल्या भूमिकेबद्दल केले आहे.

आणखी वाचा- पी. टी. उषा, तूसुद्धा…?

सोन्याच्या खाणकामाचा आपल्या समुदायावर कोणता, कसा परिणाम होतो आहे, हे पाहिल्या – अनुभवल्यानंतर एलेस्सांड्राने २०१४ मध्य स्वदेशी प्रदेशांच्या संरक्षणाकरिता सक्रीय पाऊल टाकण्यास सुरूवात केली. ब्राझीलच्या पारा राज्यात तापदोस नदीकिनारी एलेस्सांड्रा राहते त्या ठिकाणी आता भरपूर वस्ती वाढलेली आहे. तिथले लोक मासेमारी करून आपला निर्वाह करतात. अशाच ठिकाणी सोन्याच्या खाणकामामुळे पाणी दूषित झाले आहे. परिणामी, माणसं, मासे मारली जात आहेत, हे बंद व्हायला हवे, असे ती पोटतिडीकीने सांगते. माझ्या बालपणी मला मुक्त स्वातंत्र्य मिळालं. आम्ही नदीत आणि तलावात भरपूर मासेमारी करत असू, फळं गोळा करत असू आणि त्या फळांच्या बियांचा उपयोग हस्तकलेसाठी करीत असू. परंतु २०१४ पासून सगळंच चित्रं पालटलं. पाहता पाहता आम्ही अनुभवलेल्या ह्या सुंदर निसर्गाचं खाणकामाच्या अक्राळविक्राळ यंत्रांनी आणि खाण कामगारांनी वाळवंट केलं.

या भीषण बदलांनीच तिला जबर मानसिक धक्का बसला. आपल्या मुलांचं, पतीचं भविष्य यापुढे काय असेल, याने ती अंतर्मुख झाली आणि तेव्हाच तिने स्वदेशातील पर्यावरण रक्षणासाठी लढण्याचा निर्धार केला. पर्यावरणविषयक चळवळीत ती सक्रीय झाली. ती म्हणते, अगदी सुरूवातीला मुंडुरूकू समाजात नेतृत्वाची धुरा तिने हाती घेणं तेवढं सोपं नव्हतं. आमच्या समाजात पारंपारिक रितीने पुरूषच सर्व काही निर्णय घेत आले आहेत. पुरूषच काय ते मासेमारी, शिकारीसाठी जाणार हे ठरून गेलेलं होतं. आम्ही बायकांनी घरातच राहून आपल्या मुलांची, घराची काळजी घेतली पाहिजे, अशी ती विचारसरणी होती. पारंपारिक विचारांच्या चौकटींना भेदणं अवघड होतं. परंतु अशा कठीण प्रसंगी मुंडुरूकू समाजातील मारिया लेऊसा काबा मुंडुरूकू या स्त्रीनेच लिंगभावाधारित भूमिका घेण्याच्या विचारांना नकार देण्यास शिकवलं, प्रोत्साहित केलं, असं ती सांगते.

आणखी वाचा- ‘या’ आहेत भारतातील पाच अतिश्रीमंत महिला; जाणून घ्या त्यांची एकूण संपत्ती

मारियाने तिला लढत राहण्याचं बळ दिलं. पुरुषांकडून निर्माण होणाऱ्या अनेक संभाव्य अडथळ्यांची कल्पना दिली आणि त्याविरोधात ठामपणे उभं राहण्यासाठी एलेस्सांड्राचं मनोबल कायम दृढ रहायला मदतच केली. समाजात स्त्रिया, मुल यांचाही आवाज असतो. तो ऐकला जायला हवा, असं तिचं म्हणणं होतं. गेल्या दशकापासून एलेस्सांड्राच्या मोहिमेमधे अनेक स्त्रिया जोडल्या जात आहेत. आपला समाज वाचवणं हेच त्यांचंही उद्दिष्ट आहे आणि एलेस्सांड्रा त्यांची नेता आहे. एंग्लो अमेरिकन कंपनीविरोधातला तिचा लढा यशस्वी झाल्यामुळे आता मुंडुरूकूसारखे अनेक लहान समुदाय एकत्र आले आहेत, हे लढ्याचे आणखी एक यश आहे. त्यामुळे एलेस्सांड्राचा गौरव हा संपूर्ण समुदायाचा गौरव आहे, असं ती मानते!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is goldman award winner alessandra korap munduruku mrj