Who is Han Kang : पांढरा रंग सर्व रंगात सामिल आहे. जगातील सर्व प्रकाश या रंगात समाविष्ट आहे. पांढरा रंग आणि शांततेचा कोणताही संबंध नाही, असं लिहिणाऱ्या दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना २०२४ सालचा साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. नोबेल पुरस्कार देणारे रॉयल स्वीडिश अकादमीने त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. नोबेल पत्रकार परिषदेनुसार हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या दक्षिण कोरियाच्या लेखिका आहेत. तर, आतापर्यंत साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार १८ महिलांना मिळाला आहे.

हॉनचा यांचा जन्म १९७० मध्ये झाला. दक्षिण कोरियाच्या ग्वांगजू शहरात जन्मलेल्या हान सध्या त्यांच्या देशाच्या राजधानी असलेल्या सोलमध्ये राहतात. तिथे त्या वयाच्या नवव्या वर्षी स्थायिक झाल्या होत्या. त्यांना त्यांच्या कुटुंबातूनच साहित्याचं बाळकडू मिळालं. त्यांचे वडील हाँग-स्युंग-वुन हे प्रसिद्ध कांदबरीकार आहेत. लेखनाबरोबरच कला आणि संगीत क्षेत्रातही त्यांचा तितकाच सहभाग असतो. सोलमधील योन्सेई विद्यापीठात कोरियन साहित्याचा अभ्यास करण्यापूर्वी त्या संगीताच्या दुनियेत रमल्या होत्या.

हेही वाचा >> महिला वनकर्मचाऱ्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या दीपाली देवकर

द व्हेजिटेरियनला मिळाला बुकर पुरस्कार

१९९३ मध्ये हान यांनी त्यांच्या लेखनाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या पाच कविता “‘लिटरेचर अँड सोसायटी'” मासिकात प्रकाशित झाल्या. दोन वर्षांनंतर, १९९५ मध्ये, “लव्ह ऑफ येसू” हे त्यांचे पहिले लघुकथांचे पुस्तक आले. या पुस्तकाला “रेड अँकर” या कथेसाठी साहित्यिक स्पर्धेत पुरस्कारही मिळाला होता. तर, २००७ मध्ये प्रकाशित झालेली त्यांची “द व्हेजिटेरियन” ही कादंबरी त्यांच्या करिअरसाठी चारचांद ठरली. या पुस्तकाला २०१६ मध्ये बुकर पुरस्कारही मिळाला होता. याशिवाय त्यांनी “Human Acts”, “The White Book” सारख्या कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. त्यांचे सर्वात अलीकडील “वुई डू नॉट पार्ट” हे पुस्तक तीन वर्षांपूर्वी २०२१ मध्ये प्रकाशित झाले.

कविता आणि कथा या दोन्ही प्रकारांत त्यांनी सातत्याने लिखाण केलं आहे. त्यांच्या लेखनातून जिवंत आणि मृत, शरीर आणि आत्मा यांच्यातील नातेसंबंधांची तीव्र जाणीव दिसून येते आणि त्यांच्या सततच्या कवितेच्या प्रयोगामुळे त्या गद्य लेखनाच्या सध्याच्या जगात आदर्शवादी बनल्या आहेत. मानवी जीवनातील नाजकूपणा त्या त्यांच्या कविता आणि कथांमधून वाचकांपर्यंत पोहोचवत असतात. या पुरस्काराचे मूल्य एक कोटी स्वीडिश क्रोना आहे आणि हा जगातील सर्वात प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार म्हणून ओळखला जातो.

हान कांग यांची प्रतिक्रिया काय?

“मी पुस्तकांबरोबरच मोठी झाले आहे. मी लहानपणापासून कोरिअन पुस्तके वाचत आलेय. माझी कोरिअन भाषेतील अनेक पुस्तकांचं इतर भाषांमध्येही अनुवाद झाले आहेत. कोरिअन भाषा मला फार जवळची वाटते. मला मिळालेला हा पुरस्कार कोरिअन साहित्य वाचकांसाठी अभिमानास्पद असेल”, अशी प्रतिक्रिया हान कांग यांनी दिली.