Who is Iltija Mehbooba Mufti: राजकीय क्षेत्रात आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अनेकजण राजकारणात प्रवेश करतात. वारसाहक्काने पुढे आलेल्या नेत्यांच्या वाटेवर संघर्ष नसला तरीही त्यांच्यासमोर आव्हान सारखेच असते. फक्त आई-वडिलांचा वारसा चालवायचा म्हणून या क्षेत्रात येण्यापेक्षा अभ्यासपूर्ण आणि अनुभवातून या क्षेत्रात येणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यापैकीच एक म्हणजे इल्तिजा मुफ्ती. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्या या कन्या. १९९६ साली आईने ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, त्याच मतदारसंघातून इल्तिजा आता आपलं नशिब आजमावणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या संपूर्ण कार्यकाळावर एक दृष्टीक्षेप टाकुयात.
कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. सोमवारी दक्षिण काश्मीरमधील आठ विधानसभा मतदारंसघातील आठ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यापैकी बिजबेहरा विधानसभा मतदारसंघातून इल्तिजा मुफ्ती यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हेही वाचा >> Iltija Mufti : “मेहबुबा मुफ्तींची लेक म्हणून नाही तर…”, उमेदवारी मिळाल्यानंतर इल्तिजा मुफ्तींकडून प्रचार सुरू
३७० कलम हटवल्यानंतर राजकीय करिअरला सुरुवात
५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरचे कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांना ताब्यात घेण्यात आले होते आई नजरकैदेत गेल्यानंतर इल्तिजा यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यावेळी बहुतेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना अटक करण्यात आली होती. यावेळी इल्तिजा यांनी याविरोधात जोरदार आवाज उठवला होता. टीव्ही चर्चांमध्ये त्यांना स्थान मिळत होते. त्यानंतर इल्तिजा यांनी आपल्या आईचे सोशल मीडिया हँडल चालवायला घेतले; ज्यामुळे मेहबुबा मुफ्ती यांच्या सोशल मीडिया हँडलवर फॉलोअर्सची संख्या वाढलेली पाहायला मिळाली. ऑगस्ट २०२३ मध्ये इल्तिजा यांची मेहबुबा मुफ्ती यांची माध्यम सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
आपकी बात इल्तिजा के साथ
मेहबुबा मुफ्ती यांना १४ महिन्यांनंतर तुरुंगातून मुक्त करण्यात आले. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना इल्तिजा या मेहबुबा मुफ्ती यांच्या बाजूला उभ्या असल्याचे दिसले. जून २०२२ साली एक्स या सोशल मीडिया साईटवर ‘आपकी बात इल्तिजा के साथ’ हा संवाद कार्यक्रम इल्तिजा यांनी सुरू केला. या कार्यक्रमात त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. जम्मू-काश्मीरमधील लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम त्यांनी केले.
इल्तिजा मुफ्ती या आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात येतील, अशी अटकळ अनेकांनी बांधली होती. पाच वर्षांपासून आईचा सोशल मीडियाचा कारभार हाताळताना इल्तिजा यांचा पक्षाशी संबंध येत होता. आई मेहबुबा मुफ्ती आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व पीडीपीचे संस्थापक मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याप्रमाणेच इल्तिजादेखील राजकारणात येणार, असा अंदाज होता. त्यानुसार, त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आहे. १९९६ साली त्यांच्या आई मेहबुबा मुफ्ती यांनी ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, त्याच मतदारसंघातून इल्तिजा मुफ्ती आता निवडणूक लढवत आहेत. हा मतदारसंघ पीडीपीचा बालेकिल्ला मानला जातो.
इल्तिजा यांचं शिक्षण किती?
इल्तिजा यांचे दोन वर्षांचे प्राथमिक शालेय शिक्षण काश्मीरमध्ये झाले, त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये पुढील शिक्षण घेतले. शालेय शिक्षणानंतर, इल्तिजा यांनी दिल्ली विद्यापीठाच्या श्री व्यंकटेश्वरा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, तेथून राज्यशास्त्रात पदवी घेतली. दिल्लीतून पदवी घेतल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती पुढील शिक्षणासाठी यूकेला गेल्या. येथील वॉर्विक विद्यापीठातून त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण घेतले.
इल्तिजा यांचा व्यावसायिक अनुभव काय?
इल्तिजा मुफ्ती यांनी यूकेच्या भारतीय उच्चायुक्तालयात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणूनही काम केले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियातील इंडिया इन्स्टिट्यूटमध्येही काम केले आहे.