कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विकसित करण्यात आलेल्या चॅटबोट चॅटजीपीटी नामक चॅटबोटच्या दुरूपयोगाबद्दल निर्माणकर्ता असलेल्या ओपनएआय या अमेरिकन कंपनीची सीटीओ अर्थात मुख्य तंत्रज्ञान अधिकारी असलेल्या मीरा मुराटी हिने चिंता व्यक्त केली आणि जगभर तिच्या नावाच्या चर्चेला सुरुवात झाली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर होऊ शकतो किंवा त्याची हाताळणी वाईट पद्धतीने होऊ शकते. अशावेळेस जागतिक स्तरावर या तंत्रज्ञानाच्या हाताळणीवर नियंत्रण कसे ठेवता येईल किंवा मानवी मूल्यांना अनुरूप कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर नियंत्रण ठेवता येईल, असे महत्त्वपूर्ण असे कळीचे मुद्दे तिने उपस्थित केले आहे.
आणखी वाचा : यशोगाथा : ‘सिंगल मदर’ आईच माझी हिरो! संध्या रंगनाथच्या ट्विटनंतर क्रीडाप्रेमीही झाले भावूक!
कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर रोखण्यासाठी अमेरिकन कंपनी ओपनएआयला याकामी विविध देशांतील सरकारं, स्त्रोत, नियामक मंडळे आणि जवळपास प्रत्येकाचीच मदत लागणार आहे, असे मत मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या मीरा मुराटी हिने व्यक्त केले आहे. आमची टीम लहान आहे आणि आम्हांला या इनपूट प्रणालीसाठी नियामक आणि विविध सरकारं तसंच प्रत्येकाच्या सहभागाची आवश्यकता आहे. थोडक्यात, सहभाग विस्तृत प्रमाणात अपेक्षित आहे, असंही तीनं या मुलाखतीत म्हटलं आहे.
आणखी वाचा : लोक काय म्हणतील या भीतीने माझ्या सासूने मला…
सॅनफ्रान्सिस्को येथे १९८८ साली जन्मलेली मीरा मुराटी अमेरिकेतच लहानाची मोठी झाली. तिचे आईवडील भारतीय वंशाचे आहेत. ओपनएआयमध्ये दाखल होण्यापूर्वी मीरा टेस्लामध्ये वरिष्ठ उत्पादन व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. डार्टमाऊथ येथील थायर स्कूल ऑफ इंजिनीअरिंग मधून तिने अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. सध्या ती ओपनएआयमध्ये संशोधन, उत्पादन आणि भागीदारी या विभागाची ज्येष्ठ वरिष्ठ उपाध्यक्ष आहे. सॅनफ्रान्सिस्को येथील ओपनएआय या कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करणाऱ्या कंपनीने चॅटजीपीटी हा चॅटबोट तयार केला असून नोव्हेंबर २०२२ मध्ये तो बाजारात दाखल झाला. हा चॅटबोट एलएलएम म्हणजेच लार्ज लँग्वेज मॉड्युलवर आधारित काम करतो. चॅटजीपीटी इतिहासापासून ते तत्त्वज्ञानापर्यंत कोणत्याही विषयावर संभाषण करू शकतो; टेलर स्विफ्ट किंवा बेली जोएल शैलीतली गाणी लिहू शकतो; संगणक प्रोग्रॅमिंग कोडमध्ये बदल, चुका शोधणे, दुरूस्त करणे ही कामे करू शकतो. नावाप्रमाणेच तो चॅट म्हणजे संवाद साधतो. थोडक्यात, माणसाला हवे ते लिहून देणारा हा आगळा यंत्रमानवच म्हणायला हवा. पण हा आहे संगणकीय प्रोग्रॅम.
आणखी वाचा : ‘ती’ आई आहे म्हणुनि…
या चॅटबोटला कृत्रिमरित्या प्रशिक्षित करण्यात आले असून त्याच्याद्वारे लोक टेक्स्ट इतरांना वा संबंधितांसाठी पुढे पाठवू शकतात, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे प्रश्नांची उत्तरेही तो देतो. ‘घंटो का काम मिनिटोंमें’ हा हिंदीमधला वाक्प्रचारही आता काळानुसार कात टाकेल, इतक्या झटपट काम ह्या चॅटजीपीटीद्वारे होणार असल्याने नजिकच्या काळात त्याचा वापर वाढण्याच्या शक्यता बळावल्या आहेत. वापरकर्त्याने पुरविलेल्या माहितीच्या बळावर चॅटजीपीटी टेक्स्ट तयार करतो तसाच आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांना उत्तरेही देऊ शकतो. गुगलपेक्षाही एक पाऊल पुढे असंच याचं वर्णन केलं जातं. माहिती महाजालावरील विखुरलेल्या स्त्रोतांमधून हा ती एकत्र करून संबंधिताला पुरवतो. चॅटजीपीटी दाखल होऊन केवळ तीन चार महिन्यांमध्येच लोकप्रिय व्हायला लागला आहे.
आणखी वाचा : कामावरून रात्री उशिरा परत घरी जाताय? सुरक्षिततेसाठी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा
तंत्रज्ञान जेवढं प्रगत होत जातं तेवढेच त्यामुळे निर्माण होणारे धोकेही वाढतात, हा आजवरचा अनुभव आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित, प्रशिक्षित असलेल्या चॅटजीपीटीच्या अल्पावधीतच लोकप्रिय होण्यानेही वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना तोंड फुटलं आहे. या चॅटबोटच्या फायद्यातोट्यावर बोललं जाऊ लागलं आहे. चॅटजीपीटीच्या मदतीने होणाऱ्या कामांच्या योग्यायोग्यता, नैतिकता, सच्चेपणा आणि विश्वासार्हता याविषयी प्रश्नचिह्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या यंत्रमानवाची निर्मिती करणाऱ्या मीरा मुराटीला म्हणूनच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दुरूपयोगाबद्दल चिंता वाटत असेल, तर ती रास्तच म्हणावी लागेल. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा अखेरीस धोकादायकच असतो, असं म्हणतात.