रेमंड ग्रुपचे एमडी गौतम सिंघानिया आणि नवाज मोदी यांचं ३२ वर्षांचं नातं संपुष्टात आलं आहे. कारण गौतम सिंघानिया यांनी पत्नी नवाज मोदीपासून विभक्त होत असल्याची घोषणा X या सोशल मीडिया साईटवर पोस्ट लिहून केली आहे. या घोषणेनंतर नवाज मोदी यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला. ज्या व्हिडीओत त्यांना घरातल्याच दिवाळी पार्टीमध्ये येण्यापासून रोखण्यात आलं. गौतम सिंघानिया आणि नवाज मोदी हे दोघे आठ वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले. त्यानंतर १९९९ मध्ये या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं. आता हे दोघेही विभक्त झाले आहेत. आपण जाणून घेऊ या सगळ्या घडामोडींमुळे चर्चेत आलेल्या नवाज मोदी कोण आहेत?
आठ वर्षे डेटिंग आणि लिव्ह इन
गौतम सिंघानिया आणि नवाज मोदी हे १९९९ मध्ये विवाहबद्ध झाले. मात्र त्याआधी आठ वर्षे ते एकमेकांच्या आयुष्यात होते. नवाज मोदी यांनी गौतम सिंघानिया यांच्याशी लग्नगाठ बांधली. मात्र आता गौतम सिंघानिया यांनी जाहीर केल्याप्रमाणे दोघांचंही ३२ वर्षांचं नातं संपुष्टात आलं आहे.
नवाज मोदी या फिटनेस ट्रेनर
नवाज मोदी या प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहेत. मुंबईत त्यांचं फिटनेस सेंटर आहे. न्यू अॅक्टिव्हिटी स्कूलमधून त्यांचं शिक्षण झालं आहे. तसंच मुंबईच्या कॅथेड्रल आणि जॉन कॅनन या शाळेतही त्या शिकल्या आहेत. सेंट झेव्हियर्स या महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली आहे. नवाज या लेखिका आहेत. ‘पॉज, रिवाईंड : नॅचरल अँटी एजिंग टेक्निक्स’ हे पुस्तकही लिहिलं आहे. नवाज यांनी लॉ ची पदवीही घेतली आहे. त्यांचे वडील नादर मोदी हे सुप्रसिद्ध वकील आहेत. नवाज मोदी आणि गौतम सिंघानिया या दोघांचं लग्न झालं आणि या दोघांनाही लग्नानंतर निहारिका आणि निसा या दोन मुली झाल्या आहेत. मात्र आता नवाज आणि गौतम वेगळे झाले आहेत.
हे पण वाचा- गौतम सिंघानियांनी पत्नीला बंगल्याच्या दारावरच रोखलं, नवाज मोदी यांचा रस्त्यावरच ठिय्या; व्हिडीओ व्हायरल!
नवाज मोदी सिंघानिया यांच्यापासून आपण विभक्त होत असल्याचं जेव्हा गौतम सिंघानियांनी जाहीर केलं त्यानंतर काही वेळातच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये दिवाळी पार्टीत त्यांना निमंत्रण मिळूनही येऊ दिलं नाही. त्यानंतर नवाज मोदी सिंघानिया यांनी ठाण्यातल्या बंगल्याबाहेरच ठिय्या मारला होता. नवाज मोदी यांनी असं म्हटलं होतं की मला निमंत्रण दिलं आहे तरीही गेटमधून आतमध्ये सोडलं जात नाही. तर दुसरीकडे रेमंडच्या सुरक्षा रक्षकांनी म्हटलं की त्यांना निमंत्रण दिल्याची आम्हाला काहीही माहिती नाही. या दोहोंमधला वाद सोशल मीडियावर रंगला होता.
नवाज मोदी सिंघानिया या इंस्टाग्रामवर चांगल्याच सक्रिय आहेत. मुंबईत त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. तसंच गौतम सिंघानियांचे वडील आणि नवाज मोदी यांचे सासरे विजयपत सिंघानिया आणि सासू यांच्यासह त्या दिवाळीही साजरी करताना दिसल्या. इंस्टाग्रामवर त्यांचे २.४१ लाख फॉलोअर्स आहेत.