केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालक पदाची जबाबदारी इतिहासात पहिल्यांदाच एका महिला आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली आहे. राजस्थान केडरच्या १९८९ बॅचच्या आयपीएस अधिकारी नीना सिंह यांना ही जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे ५४ वर्षांत पहिल्यांदाच विमानतळ, दिल्ली मेट्रो आणि देशभरातील इतर सरकारी इमारतींच्या सुरक्षेची जबाबदारी एक महिला अधिकारी पार पाडणार आहे. १९६९ मध्ये स्थापन झालेल्या सीआयएसएफचे नेतृत्व फक्त पुरुष अधिकारी करत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नीना सिंह सध्या सीआयएसएफच्या विशेष डीजी पदावर होत्या. त्या २०२१ मध्ये सीआयएसएफमध्ये रुजू झाल्या. ३१ जुलै २०२४ रोजी त्या सेवानिवृत्त होणार असून तोपर्यंत त्या सीआयएसएफ प्रमुख पदावर राहणार आहेत.

कोण आहे नीना सिंह? (Who is Nina Singh)

सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्त झालेल्या नीना सिंह या राजस्थान केडरच्या १९८९ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्या सीआयएसएफच्या अतिरिक्त महासंचालक (ADG) पदावर कार्यरत होत्या. नीना सिंह या बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहेत. त्यांनी पटनामधील महिला महाविद्यालयातून शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (JNU)आणि अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले. त्यांनी नोबल पारितोषिक विजेते अभिजीत बॅनर्जी आणि एस्थर डफ्लो यांच्याबरोबर दोन शोधनिबंधही लिहिला आहे. त्यांनी केंद्र सरकारमध्येही काम केले आहेत.

राजस्थान पोलिसात डीजी पद मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. आयपीएस नीना सिंह यांनी २००० साली राजस्थान महिला आयोगाच्या सदस्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळली होती, जिथे त्यांनी महिलांसाठी एक आउटरीच मोहीम चालवली होती. यामध्ये आयोगाच्या सदस्यांना विविध जिल्ह्यांचा दौरा करून महिलांशी संपर्क साधणे, त्यांच्या समस्या ऐकून घेणे, त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम सोपविण्यात आले.

CBI मध्येही केले काम

२०१३ मध्ये त्या सीबीआयमध्ये सहसंचालक म्हणून रुजू झाल्या, जिथे त्यांनी २०१८ पर्यंत या पदावर काम केले. या काळात त्यांनी बँक फसवणूक, भ्रष्टाचार, आर्थिक गुन्हे आणि अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांवरही काम केले आहे. एका अहवालानुसार, आयपीएस नीना सिंग शीना बोरा हत्या प्रकरण, जिया खान आत्महत्या आणि नीरव मोदी पीएनबी घोटाळा प्रकरणांच्या तपासाचा एक भाग आहेत. त्यांना २०२० मध्ये सर्वात उत्कृष्ट सेवा पदक देखील देण्यात आले आहे.

नीना सिंह यांचे पतीही आहेत आयपीएस अधिकारी

नीना सिंह यांचे पती रोहित कुमार हे देखील राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत. ते २०२०-२१ मध्ये राजस्थानमध्ये प्रमुख सचिव (आरोग्य) होते, सध्या ते केंद्रीय ग्राहक मंत्रालयात सचिव आहेत.

आयपीएस नीना सिंह यांच्या व्यतिरिक्त, मणिपूर केडर 1989 बॅचचे आयपीएस अधिकारी राहुल रसगोत्रा ​​यांची इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, ते यापूर्वी इंटेलिजन्स ब्युरोचे विशेष संचालक होते. तर ITBP प्रमुख अनिश दयाल सिंग यांची केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कार्मिक मंत्रालयाच्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is nina singh the first woman to be appointed as chief of cisfsecurity force become first women dg in 54 years sjr