भारत स्वतंत्र होण्यापूर्वी, स्वातंत्र्य लढ्यात भारतीय महिलांचादेखील पुरुषांइतकाच सहभाग होता. या स्वातंत्र्यपूर्व भारतातील त्या काळच्या स्त्रियांचा लढा, त्यांची चळवळ हीच नव्या युगातील महिलांच्या हक्काची जाणीव आणि हमी करून देणारी होती. या लढ्यात काही स्त्रियांनी वैयक्तिक सहभाग घेतला होता, तर काहींनी यासाठी त्यांच्या जमिनी, दागिन्यांसारख्या मौल्यवान वस्तूंचा त्याग केला. हळूहळू हा आकडा ब्रिटीश अधिकाऱ्यांकडून लक्ष्य केले जाण्याची भीती असतानादेखील प्रचंड संख्येने वाढत गेला.
त्याकाळातील १९२० साली नेल्लोर येथे झालेल्या महात्मा गांधींच्या भाषणाने पुरुष आणि स्त्रिया दोघेही भारावून गेले होते. तेव्हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक स्त्रियांनी सहभाग घेतला होता. त्यांनी हरिजन आणि हातमाग निधीसाठी पैसे गोळा केले.
हेही वाचा : बायकोच्या ‘या’ सल्ल्यामुळे, Google चे सीईओ आज दिवसाला कमवतात तब्ब्ल पाच कोटी रुपये! पाहा
नेल्लोरमधील या स्त्रियांमध्ये पोनाका कनकम्मा यांचादेखील सहभाग होता. पोनाका कनकम्मा या त्यावेळच्या सामाजिक कार्यकर्त्या, क्रांतिकारी [activist] आणि एक स्वातंत्र्य सैनिक होत्या. इतकेच नाही तर पोनाका कनकम्मा यांना एक वर्षाहून अधिक काळ गांधीजींच्या शिष्य असल्या कारणाने तुरुंगवास भोगावा लागला होता. पोनाका यांनी मुलींसाठी नेल्लोरमध्ये, श्री कस्तुरीदेवी विद्यालयम नावाची मोठी शाळादेखली स्थापन केली होती.
पोनाका कनकम्मा यांचा जन्म, १८९६ साली झाला होता. लहान वयातच त्यांचे लग्न नेल्लोर गावाच्या जवळ असणाऱ्या पोटलापुडी गावाच्या जमीनदार, सुब्बाराम रेड्डी नावाच्या व्यक्तीशी करण्यात आले होते. पोनाका यांचा विवाह त्यांच्या वयाच्या केवळ आठव्या वर्षी करण्यात आला होता. परंतु, सुब्बाराम रेड्डी हे पुढारलेल्या विचारांचे नसल्याने, पोनाका यांना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती.
असे असले तरीही कनकम्मा या एक कवी आणि नेल्लोर काँग्रेस कमिटीच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात, तसेच वंदे मातरम आंदोलनात सहभाग घेतला होता. याच कारणामुळे पोनाका यांना एक वर्षाहून अधिक काळ वेल्लोर आणि नेल्लोर अशा दोन्ही तुरुंगात घालवावा लागला.
अशा या शूर आणि धाडसी महिलेचा, म्हणजेच पोनाका कनकम्मा यांचा मृत्यू १५ सप्टेंबर १९६३ साली झाली. २०११ साली त्यांचे तेलगू भाषेतील कनकपुष्यरागम नावाचे आत्मचरित्र डॉक्टर के. पुरुषोत्तम यांनी प्रसिद्ध केले. पोनाका कनकम्मा यांची शौर्यकथा नेल्लोरच्या प्रत्येक नागरिकांसाठी अभिमानास्पद अशी आहे. त्यांनी केलेलं काम आणि धाडस पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्याचे काम करत राहील, अशी माहिती डीएनएच्या एका लेखावरून समजते.