केवळ २० हजार रुपयांची गुंतवणूक करून, रजनी बेक्टर यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, तोच लहानसा व्यवसाय आता कोट्यवधींची उलाढाल करीत आहे. इतर यशस्वी व्यक्तींप्रमाणे रजनी यांनादेखील परिश्रम आणि खडतर प्रवास चुकलेला नाही. मात्र, इतर स्पर्धक कंपन्या आणि सामाजिक अडथळ्यांवर मात करून, रजनी यांनी आपला प्रवास सुरू ठेवला आहे.

सुरुवातीला लुधियानामध्ये राहणाऱ्या रजनी यांनी घरातच आइस्क्रीम बनवून, स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली आणि नंतर बिस्किटे आणि इतर खाद्यपदार्थांचे उत्पादन सुरू करून आपला व्यवसाय वाढवला. बघता बघता रजनी यांच्या लहानशा कंपनीला प्रसिद्धी मिळू लागली. मात्र, मॅकडोनाल्ड्स या कंपनीने रजनी यांच्या कंपनीची ‘फूड स्पेशालिटीज लिमिटेड’अंतर्गत कायमस्वरूपी बन [बर्गरसाठी लागणारे पाव] पुरवठादार म्हणून निवड केली आणि रजनी यांच्या व्यवसायाला कलाटणी मिळाली. या संधीचा फायदा घेऊन आणि त्यांच्या वाढत्या व्यवसायाचे स्वरूप लक्षात घेता, रजनी यांनी ग्रेटर नोएडामध्ये आपला उत्पादन प्रकल्प स्थापन करून, देशभरात अजून लहान-मोठी दुकाने सुरू केली.

हेही वाचा : Women Empowerment Schemes : भारतामध्ये महिला आणि मुलांसाठी कोणकोणत्या योजना राबवल्या जातात? घ्या जाणून…

२०२३ पर्यंत बाजार मूल्य ६,६८१ कोटी रुपये असणारी सौ. रजनी बेक्टर्स यांची फूड स्पेशालिटीज लिमिटेड ही कंपनी FMCG उद्योगातील सर्वांत यशस्वी व्यवसायांपैकी एक आहे. रजनी यांची इंग्लिश ओव्हन आणि क्रेमिक यांसारखी प्रसिद्ध उत्पादने खरेदीसाठी देशभरात सर्वत्र उपलब्ध आहेत.

रजनी बेक्टर यांचा हा प्रवास असंख्य नवीन उद्योजकांना, स्वतःचा व्यवसाय करू पाहणाऱ्या होतकरू तरुणांना, व्यावसायिकांना प्रेरणा देणारा आहे, अशी माहिती डीएनएच्या एका लेखावरून मिळते. मेहनत करणे, येणाऱ्या प्रत्येक अडचण आणि अडथळ्यामुळे अडून न राहता, त्याचा सामना करणे आणि सतत नवनवीन गोष्टी करत राहण्यानेच अपेक्षित यश प्राप्त होऊ शकते, हे रजनी यांच्या गोष्टीवरून समजते.