यशस्वी होण्याकरता प्रयत्न, मेहनत, सातत्य, चिकाटी या गोष्टी फार महत्त्वाच्या असल्या तरीही स्वतःच्या क्षमताही ओळखता आल्या पाहिजेत. अनेकदा शिक्षण संपून नोकरी लागली की मिळेल त्या पगारात तरुणाई समाधानी होते. पण, स्वतःच्या क्षमता ओळखून मोठी उडी मारण्याचं धाडस फार कमीजण करतात. पण, हेच धाडस केलंय रायपूरमधील राशी बग्गा या तरुणीनं. १४ लाखांच्या पॅकेजला नकार देत तिने आणखी चांगल्या नोकरीची आस धरली. आणि आता तिने तिच्या शैक्षणिक संस्थेत शिकलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड मोडून सर्वाधिक पॅकेजची नोकरी मिळवली आहे. तिच्या या आत्मविश्वासू धाडसी वृत्तीबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, राशी बग्गा हिनं इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नया रायपूर (IIIT-NR) येथून अभियांत्रिकी (बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी) शिक्षण घेतलंय. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन ठिकाणी इंटर्नशीपही केली. या इंटर्नशीपमुळे तिला तिच्यातील क्षमता कळल्या. नोकरीच्या बाजारपेठेतील तिची क्षमता जाणून घेतल्यानंतर तिने मोठी उडी मारायचं ठरवलं. त्यामुळे ती अनेक मुलाखती देत होती. या मुलाखतींदरम्यान तिला १४ लाख पॅकेज देणाऱ्या नोकरीची ऑफर आली. राशीऐवजी या ठिकाणी दुसरी कोणी तरुणी असती तर तिने हसत हसत ही नोकरी स्वीकारली असती. पण, राशीला तिच्या कामाप्रती आणि मेहनतीप्रती विश्वास होता. आपण १४ लाखांच्या पॅकेजपेक्षाही मोठ्या पॅकेजसाठी लायक आहोत, असं तिला वाटू लागलं. त्यामुळे तिनं १४ लाख पॅकेजची नोकरी धुडकावून लावली.
राशीने चांगल्या नोकरीसाठी तिचा शोध सुरू ठेवला. अनेक कंपन्यांमध्ये ती मुलाखतीकरता गेली. आपल्या क्षमता ओळखून, आपल्यातील कौशल्याला वाव मिळेल अशा नोकरीच्या ती शोधात राहिली. अखेर तिला तिच्या मनजोगी नोकरी मिळाली. तिच्या शैक्षणिक संस्थेतून बाहेर पडलेल्या कोणत्याच विद्यार्थ्याला एवढं पॅकेज मिळालं नव्हतं, जेवढं राशीला मिळालंय. राशीला तब्बल ८५ लाखांचं पॅकेज असलेली नोकरी मिळाली आहे. Atlassian येथे उत्पादन सुरक्षा अभियंता म्हणून ती जुलै महिन्यातच रुजू झाली आहे.
राशीने याआधी बेंगळुरूमधील Intuit येथे SDE इंटर्न आणि Amazon येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर इंटर्न म्हणून काम केले होते. या अनुभवाच्या जोरावर तिने आता उंच उडी घेतली आहे.
IIIT-NRमधील तिची सहकारी विद्यार्थी चिंकी करडा हिने मागील वर्षी याच कंपनीकडून वार्षिक ५७ लाख रुपयांचे पॅकेज मिळवून मागील विक्रम मोडला होता. तर, योगेश कुमार या आणखी एका विद्यार्थ्याने एका बहुराष्ट्रीय कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पदासाठी वार्षिक ५६ लाख रुपयांचं पॅकेज मिळवलं होतं. २०२० मध्ये, रवी कुशाश्वा याला एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीने वार्षिक १ कोटी रुपयांच्या कराराची ऑफर दिली होती. परंतु, करोनामुळे लादलेल्या निर्बंधांमुळे तो १ कोटीचं पॅकेज स्वीकारू शकला नाही.
हेही वाचा >> दागिने खरेदी : हौस, प्रतिष्ठा की आर्थिक गुंतवणूक? समजून घ्या नाण्याची दुसरी बाजू
राशीच्या सस्केस स्टोरीतून काय शिकाल?
यशस्वी होण्याचे काही ठोकताळे नाहीत. प्रत्येकाचं यश वेगवेगळं असतं. प्रत्येकासाठी यशाची व्याख्या निराळी आहे. पण प्रत्येकाला ती व्याख्या तयार करावी लागते. १४ लाखांचं पॅकेज मिळवूनही ती यशस्वीच ठरली असती. पण, आपल्यातील क्षमता ओळखून तिने आणखी मोठी उडी घेतली. त्यामुळेच तिला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. याचा अर्थ इतकाच की आपल्यातील क्षमता ओळखायला शिका, त्या क्षमतांवर विश्वास ठेवायला आणि त्यावर ठाम राहायला शिका. पण आपल्यातील क्षमतांवर असलेला विश्वास हा अतिआत्मविश्वास असता कामा नये. सजगतेने आणि हुशारीने निर्णय घेतल्यास राशीसारखं यश तुमच्याही पदरात पडेल.