छाया महाजन
मध्यरात्रीची वेळ. पाऊस मी म्हणतोय. अशातच एका गर्भवतीला अचानक प्रसवकळा सुरू झाल्या. प्रसूतीसाठी रुग्णालय गाठायचे तर गर्भवतीच्या रहिवासाची वस्ती दुर्गम भागात. तेथे जाण्या-येण्यासाठी कच्चा रस्ताही नाही. मार्ग काढायचा तो डोंगरमाथ्यावरील खाचखळग्यांनी भरलेल्या रस्त्यातून. चिखल तुडवतच. अखेर डोलीतून मध्यरात्री तिला कसे-बसे रुग्णालयापर्यंत पोहोचवले तर तेथे डाॅक्टर नाही. होत्या त्या परिचारिका. पुन्हा दुसरीकडे नेण्यापर्यंतचा प्रवास डोलीतून. असह्य वेदना व्याकूळ ती बाई सहन करत असणार. त्याही प्रसूतीच्या. अखेर वेदनांमधला विव्हळ थांबला. प्राण सुटला. एका गर्भवतीचा रस्ता, डाॅक्टरांअभावी असा मृत्यू लिहिला गेला.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीजवळच्या तळोघ ग्रामपंचायतीमधील जुनवणेवाडीतील वनिता भगत या स्त्रीचा मृत्यू मन विषण्ण करून सोडतो. स्त्रीबद्दलची अनास्था आणि तिची कुटुंब, समाजातील स्थिती याबद्दल बरंच लिहिलं जातं. ती कौटुंबिक छळाची बळी आहे, वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या नियमांची, प्रथांची बंदी असल्यानंही तिचा छळ आहे. त्यावर बरीच चर्चा होते. पण असुविधांमुळेही वेदना आणि मृत्यूला कवटाळावं लागावं हे दुर्दैवंही तिच्या माथी आलेलं. तळोघ ग्रामपंचायतीतील घटनेबाबतही तसंच म्हणता येईल. अर्थात या आधी अशा घटना झालेल्या आहेतच. त्याची चर्चाही झालेली आहे. मात्र दिवस सरले, की चर्चा थंड होते आणि सुविधांअभावी माणसांचे हाल चालूच राहातात. आजही अनेकांसाठी तर ती फक्त ‘बातमी’ असणार आहे. आज एक तर उद्या दुसरी. माणसांची नावं बदलतात. ठिकाणं बदलतात फक्त.
तळोघ ग्रामपंचायतीच्या कक्षेतील जुनावणे वस्ती ही मुख्य रस्त्यापासून दूर. पक्का रस्ता नाही. म्हणजे खाचखळग्यांची वाट. त्यात पावसानं वाटेत चिखल झालेला. दुर्गम भाग असल्याने विजेचा तर आनंदच. त्यातच वनिताला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. ज्या अगदी सहनशक्ती पलीकडे गेल्यावर तिनं रडत-रडत हे बरोबरच्यांना सांगितले असेल. ते तरी काय करणार ? खाचखळग्यांच्या रस्त्यांवर ठेचकाळत चालावे लागले असणार. अडीच किलोमीटरची ही अंधारी वाट. महाराष्ट्रात रस्त्यांचा ‘विकास’ होतोय, पण तो अशा दुर्गम जागी कसा पोचणार? अनेक ठिकाणी नुसतेच नारे, घोषणा. त्याचा फटका या भागातल्या अशा लोकांना बसतोय. त्यात त्या बाईला वेदना असह्य. चालण्याच्या कष्टानं शरीर थकलेलं. शेवटी डोलीत झोपवलं. या उपर दोन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाहीत. शासकीय रुग्णालयात फक्त नर्सेस, जिल्हा शासकीयमध्ये उपचार झाले खरे, पण ती स्त्री आणि तिचं बाळ यांना वाचवण्यात अर्थातच यश आलं नाही. तिच्या देहाची हेळसांड इथेच थांबली नाही तर तिला पाड्यावर परत न्यायलाही वाहन नव्हतंच.
देशभरात रस्त्यांचं जाळं पसरलंय आणि अगदी दुर्गम खेडीही जोडली गेलीत हे ठामपणे सांगत असताना या लोकांना खासगी वाहनाची सोय करता येऊ नये, यामागे आर्थिक कारण नसेलच असं सांगता येणार नाही. आणि वैद्यकीय सेवेबद्दलही म्हणावे तर शहरांमध्ये दवाखाने आणि हॉस्पिटल्स गल्लोगल्ली आहेत. तर खेड्यांमध्ये आजही मूलभूल सुविधा नाहीत. याचा बळी ठरतात ती गरीब माणसं. वनिता भगत यांना असा मृत्यू का यावा? त्याला जबाबदार कोण? यापुढे अशी घटना होऊ नये म्हणून प्रयत्न केले जातील का? हे प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहेत.
एक मात्र नक्की, जेव्हा जेव्हा असा पाऊस कोसळत असेल तेव्हा तेव्हा डोलीतून नेली जाणारी वेदनांनी तडफडणारी, कळवळणारी गर्भार स्त्री आणि तिला तसं नेणारे काळजीनं करपणारे दु:खजड कुटुंबीय दिसत राहाणार.
जाताना रुग्णालयाचा शोध घेत फिरणारी झोळीतली एक जिवंत बाई आणि घरी परत जाताना दीड मृतदेह, हाच काय तो अती वेदनामय विचार … !
drchhayamahajan@gmail.com