वातावरण बदलासंदर्भात लढा देणारी किशोरवयीन पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गच्या देशाने एक कौतुकास्पद निर्णय घेतलाय. स्वीडनच्या नवीन सरकारने मंगळवारी अवघ्या २६ वर्षांच्या तरुणीला क्लायमेट खात्याची मंत्री म्हणून घोषित केलंय. रोमिना पौर्मोख्तरी असं या तरुण महिला मंत्र्याचं नाव आहे. स्वीडनच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात तरुण असलेल्या वातावरण बदल (क्लायमेट) खात्याच्या मंत्री आहेत. तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हीदेखील स्वीडनची आहे. तिने हवामान बदलाच्या धोक्यांसंदर्भात लाखो तरुणांना एकत्रित करून एक व्यापक जागतिक चळवळ सुरू केली होती. त्या चळवळीचे पडसाद जगभरात उमटले होते.
स्वीडनचे नवनिर्वाचित पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी मंत्रिमंडळाची ओळख करून दिली. यामध्ये रोमिना यांची वातावरण (क्लायमेट) खात्याच्या मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतात पर्यावरण मंत्री असं पद आहे. पण जगभरातील अनेक देशांमध्ये वातावरण बदलाच्या चर्चेनंतर क्लायमेट मिनिस्टर असे नवे मंत्रीपद आले आहे. सर्वात तरुण मंत्री असलेल्या रोमिना पौर्मोख्तरी या आतापर्यंत लिबरल पक्षाच्या युवा शाखेच्या प्रमुख होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे त्या राजकीय जीवनात वावरताना पर्यावरणाशी संबंधित कामासाठी ओळखल्या जात नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रोमिना यांनी स्वीडनचे नवे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी स्वीडन डेमोक्रॅट्स पक्षाशी युतीचा निर्णय घेतल्यानंतर जोरदार टीका केली होती.
हेही वाचा – ‘ती’च्या अभियांत्रिकी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
रोमिना पौर्मोख्तरी यांचा जन्म स्वीडनची राजधानी स्टॉकहोमच्या उपनगरात इराणी वंशाच्या कुटुंबात झाला. सर्वात तरुण मंत्री ठरत रोमिना यांनी २७ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. यापूर्वी स्वीडनमधील सर्वात तरुण मंत्री २७ वर्षांचे होते. उल्फ क्रिस्टरसन यांनी त्यांच्या मंत्रालयात नियुक्त केलेल्या ११ महिलांमध्ये पौर्मोख्तरी यांचा समावेश आहे. त्यांनी २३ पैकी १२ पुरुष आणि ११ महिलांना मंत्र्यांना मंत्रालयात सामावून घेतलंय. स्वीडन डेमोक्रॅट्सने गुन्हेगारी आणि इमिग्रेशनवर धोरणात्मक बदल करण्याची मागणी केली असून त्या बदल्यात त्यांनी सरकारला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा – उपयुक्त : ‘फॅशन सर्च’मध्ये ‘ट्रेण्डिंग’ असलेले ‘को-ऑर्डस्’ आहेत तरी काय?
दरम्यान, गेल्या महिन्यात स्वीडनच्या निवडणुकीत सोशल डेमोक्रॅटच्या नेत्या मॅग्लेना अँडरसन यांचा पराभव झाला होता. त्यांच्या लेफ्ट-सेंटर आघाडीला बहुमत मिळू शकले नाही. निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरून आणि सुमारे ३० टक्के मतं मिळवूनही सोशल डेमोक्रॅट पक्षाला सरकार स्थापन करता आलं नाही. मॅग्लेना अँडरसन यांच्या सोशल डेमोक्रॅट्स पक्षाने निवडणुकीत १०७ जागा जिंकल्या. तर त्यांच्या विरोधात असलेल्या स्वीडन डेमोक्रॅट्सला ७३ जागांवर विजय मिळाला. तिसऱ्या क्रमांकावर मॉडरेट पार्टी असून त्यांना ६८ जागा मिळाल्या आहेत. स्वीडनचे नवनिर्वाचित पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन याच पक्षाचे नेते आहेत.
हेही वाचा – दिवाळीसाठी ग्रीटिंग कार्ड मिळाले नाही म्हणून तिने…; लॉकडाउनमधील गैरसोयीतून सुचलेल्या कल्पनेने काय केले पाहा
स्वीडनमधील सर्वात मोठा उजवा पक्ष स्वीडन डेमोक्रॅट्स आहे. परंतु स्वीडन डेमोक्रॅट्सचे नेते जिमी ऍक्सन यांना इतर उजव्या मित्रपक्षांचा पाठिंबा मिळू शकला नाही. अशा परिस्थितीत तिसऱ्या पक्षाचे नेते उल्फ क्रिस्टरसन यांच्यावर सरकार स्थापनेची जबाबदारी आली. स्वीडन डेमोक्रॅट्सने नव्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान झाल्यानंतर मंत्रिमंडळाची घोषणा करताना उल्फ क्रिस्टरसन यांनी रशिया- युक्रेन तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘नागरी संरक्षण’साठी नवीन मंत्री पद निर्माण करण्याची घोषणा केली आहे.