भारतीय हवाई दलातील ट्रेनिंग कमांडच्या प्रमुख वैद्यकीय अधिकार असलेल्या साधना सक्सेना नायर यांची एअर मार्शल या पदावर पदोन्नती झाली आहे. एअर मार्शल पदावर पदोन्नती होऊन त्यांना भारतीय सशस्त्र दलांच्या रुग्णालय सेवा विभागाच्या महासंचालक पदाचा कार्यभार सोपावला आहे. एअर मार्शल रँक मिळवलेल्या त्या दुसऱ्या महिला अधिकारी असून एअर मार्शल पद्मा बंधोपाध्याय या पहिल्या महिला अधिकारी होत्या. महत्त्वाचं म्हणजे, भारतीय हवाई दलात साधना सक्सेना यांच्या तीन पिढ्या कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी आज सविस्तर जाणून घेऊयात.
कोण आहेत साधना सक्सेना?
साधना सक्सेना यांनी पुण्यातील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर डिसेंबर १९८५ मध्ये त्यांची भारतीय हवाई दलात अधिकारी पदावर नियुक्ती झाली. पण त्या एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत. त्यांनी पुढील शिक्षण सुरूच ठेवलं. हवाई दलात सहभागी झाल्यानंतरही त्यांना उच्चशिक्षणाचा ध्यास लागला होता. म्हणून त्यांनी दिल्लीतील एम्स येथे मेडिकल इन्फोर्मेटिक्स विभागात दोन वर्षांचा प्रशिक्षण कार्यक्रमही पूर्ण केला आहे. तसंच, फॅमिली मेडिसीन या विषयांत त्यांनी पदव्युत्तर पदवीही घेतली आहे. भारतातून शिक्षण घेत असताना त्यांनी परदेशात जाऊनही शिक्षण घेतलं. परदेशात जाऊन त्यांनी सीबीआरएन युद्धशास्त्र आणि मिलिटरी मेडिकल एथिक्स विषयांत प्रशिक्षण घेतलं.
हेही वाचा >> पूर्ण वेळ नोकरी करूनही पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा केली उत्तीर्ण अन् आयएएसचे स्वप्न केले साकार …
साधना सक्सेना यांचं तीन कुटुंबीय भारतीय हवाई दलात
साधना सक्सेना यांचे वडील, भाऊ, पती आणि मुलगा भारतीय हवाई दलाशी संबंधित आहेत. गेल्या सात दशकांत त्यांच्या तीन पिढ्या हवाई दलात कार्यरत आहेत. साधना यांचे वडिल हवाई दलात डॉक्टर होते. तसंच, त्यांचे बंधुही याच क्षेत्रात होते. तर, साधना यांचे पती हवाई दलात वैमानिक होते. आता ते निवृत्त असून त्यांचा मुलगाही लढाऊ वैमानिक आहे. महत्त्वाचं म्हणजे, साधना सक्सेना नायर आणि के.पी नायर एअर मार्शलपदापर्यंत पोहोचलेलं पहिल आणि एकमेव जोडपं आहे.
अनेक मान-सन्मान
साधना सक्सेना या दुसऱ्या एअर मार्शल ठरल्या आहेत. तर, याआधी त्या हवाई दलाच्या पश्चिम कमांड आणि ट्रेनिंग कमांडच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी होत्या. ही पदे भुषवणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव महिला अधिकारी होत्या. असे अनेक मानसन्मान साधना सक्सेना यांना मिळाला आहेत. तसंच, चीफ ऑफ एअर स्टाफ आणि एअर ऑफिसर कमांडिंग इन-चीफ यांच्याकडूनही साधना सक्सेना यांना विविध मानसन्मान मिळाला आहे.