दोन दिवसांपूर्वी इराणच्या सारा खादेमला स्पेनने नागरिकत्व बहाल केले. साराने हिजाब घालून बुद्धिबळ खेळण्यास कायम विरोध दर्शवला. ती हिजाबच्या बंधनांच्या विरुद्ध होती. साराची ही भूमिका कायम सर्वांच्या चर्चेचा मुद्दा ठरला. परंतु, सारा खादेम कोण आहे? तिची आजवरची कामगिरी काय आहे आणि इराणची नागरिक असताना स्पेनने तिला नागरिकत्व का दिले हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
कोण आहे सारा खादेम ?
इराणची बुद्धिबळपटू सारा खादेमचा जन्म १५ ऑगस्ट, १९९७ ला इराणमधल्या तेहरानमध्ये झाला. लहानपणापासूनच तिला बुद्धिबळ खेळायची आवड होती. तिचे वडील बुद्धिबळ खेळायचे. त्यांच्याकडून साराने बुद्धिबळ शिकण्यास सुरुवात केली. साराने प्रथम वयाच्या सातव्या वर्षी बुद्धिबळ स्पर्धामध्ये भाग घेतला. पहिल्याच खेळात ती उत्कृष्टपणे बुद्धिबळ खेळली. इराणमधल्या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी तिला प्रशिक्षण दिले. आंतरराष्ट्रीय पातळीवर २०१२ मध्ये साराला पहिले यश मिळाले. आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत १६ वर्षांपेक्षा कमी गटात साराने सुवर्णपदक जिंकले आहे या यशानंतर सारा अनेक स्पर्धांकरिता खेळली. २०१९ ला आशियाई महिला बुद्धिबळ चँपियनशिप स्पर्धेत तिला यश मिळाले.साराची बुद्धिबळ खेळण्याची पद्धत ही अत्यंत आक्रमक आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्याची कमकुवत स्थाने काय आहेत, याचे निरीक्षण करत आपला खेळ तसेच पुढच्या चाली ठरवते.
हेही वाचा : आईबाबांनी शिकवलं नाही का ? अनेक मुलींना विचारला जाणारा प्रश्न
सारा बुद्धिबळाची राणी असली तरी तिला अनेक समस्यांशी सामना करावा लागला. तिची मते ही इराणच्या नियमांच्या विरुद्ध असल्यामुळे ती कायम ‘ट्रोल’ होत होती.
साराने डिसेंबर २०२२ मध्ये कझाकिस्तान या ठिकाणी झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत हिजाब न घालता भाग घेतला होता. यानंतर इराणने तिचा निषेध केला होता. आपल्यावर काही कारवाई होऊ नये म्हणून सारा खादेम जानेवारी महिन्यातच स्पेनला गेली होती. इराणमध्ये साराच्या विरोधात अटक वॉरंट लागू करण्यात आले. तसेच इराणमध्ये तिच्या हिजाब न घालण्याच्या निर्णयाविरोधात निषेध करण्यात आला.
हेही वाचा : ‘टाटा समूहा’च्या सर्वात तरुण सीईओ आहे मराठी महिला ! कोण आहेत अवनी दावडा ?
स्पेनने सारा खादेमला का दिले नागरिकत्व ?
बुद्धिबळपटू सारा खादेमला स्पॅनिश नागरिकत्व देण्यात आले आहे. स्पेन सरकारनेच या विषयीची माहिती दिली. सारा खादेमने कझाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या फिडे वर्ल्ड रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावेळी तिने हिजाब न परिधान करता खेळ खेळला. ही बाब इराणच्या इस्लामिक ड्रेसकोड नियमाच्या विरोधात होती. सारा खादेम ही जेव्हा स्पेनला आली तेव्हा तिने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यावेळी तिने म्हटले की, ”मला हिजाब घालायला आवडत नाही. मला पडद्यामागे लपून राहायला आवडत नाही. त्यामुळेच मी आता यापुढे हिजाब घालणार नाही.”
इराणच्या या बुद्धिबळपटू सारा खादेमला स्पॅनिश नागरिकत्व देण्यात आले. स्पेन सरकारनेच याविषयीची माहिती दिली. सारा खादेमने कझाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या फिडे वर्ल्ड रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावेळी तिने हिजाब न परिधान करता खेळ खेळला. ही बाब इराणच्या इस्लामिक ड्रेसकोड नियमाच्या विरोधात होती. स्पेनचे कायदा मंत्री पिलर होप यांच्या हवाल्याने एका अधिकाऱ्याने ही बाब स्पष्ट केली की, तिथल्या कॅबिनेटने मंगळवार, दि. २५ जुलै रोजी सारा खादेमवर ओढवलेली विशिष्ट परिस्थिती लक्षात घेता तिला स्पेनचे नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.
निवृत्त बुद्धिबळ रेफरी शोहरेह बयारत यांनी जानेवारी महिन्यात हे म्हटले होते की, इराणच्या बुद्धिबळपटू किंवा इतर महिला खेळाडू जेव्हा स्पर्धांमध्ये भाग घेतात तेव्हा त्यांना हिजाब घालणे, हे अनिवार्य आहे. हिजाब घातला नाही, तर निषेध नोंदवला जातो, प्रसंगी कुटुंबालाही त्रास दिला जातो त्यांच्यावर हल्लाही केला जातो, असे बयारत यांनी म्हटले आहे.