Who is Sheetal Devi : पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला असून खेळांना सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत तिरंदाज शीतल देवी हिच्याकडून सुवर्णपदकाची मोठी आशा आहे. हात नसलेली ती एकमेव महिला तिरंदाज असल्याने अवघ्या देशाचं लक्ष तिच्या कामगिरीकडे लागलं आहे. शीतल महिला वैयक्तिक कंपाऊंड ओपन आणि मिश्र सांघिक कंपाऊंड ओपन या दोन स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे. तिच्याविषयी अधिक जाणून घेऊयात.
जन्मताच दुर्मिळ आजार
क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक महिला खेळाडूचा वेगळा प्रवास असतो. सामाजिक, कौटुंबिक बंधने झुगारून त्यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागतं. मात्र शीतल देवीचा संघर्ष वेगळा होता. तिला तिच्या शरीराशीच संघर्ष करावा लागला. आपल्या शारिरीक व्यंगाकडे दुर्लक्ष करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागलं. शीतल देवीचा जन्म १० जानेवारी २००७ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडमधील लोईधर गावात झाला. जन्मताच तिला फोकोमेलिया हा दुर्मिळ आजार होता. या आजारामुळे शरीर विकसित होत नाही. त्यामुळे तिचे हात पूर्णपणे तयार झाले नाहीत. परिणामी तिच्या जन्मानंतरच तिच्या भविष्यात प्रचंड संघर्ष लिहून ठेवलाय हे विधिलिखित होतं. परंतु, आपल्या व्यंगाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून तिने आज जागतिक स्तरावर स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे.
अन् तिला झाली तिच्यातील खेळाडूची ओळख
लहानपणापासूनच शीतलकडे प्रबळ इच्छाशक्ती होती. करमणूक म्हणून ती झाडांवरही चढायची. या तिच्या नियमित हालचालींमुळे तिचं शरीर मजबूत होत गेलं. तिचा हा सरावच तिच्या आयुष्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. पॅरा तिरंदाजीमध्ये शीतल देवीची कारकीर्द पुढे नेण्यात भारतीय लष्कराने महत्त्वाची भूमिका बजावली. २०२१ मध्ये जम्मू काश्मीरच्या किश्तवार येथे भारतीय सैन्याने आयोजित केलेल्या युवा कार्यक्रमात शीतलमधील आत्मविश्वासाची जाणीव लष्कराच्या प्रशिक्षकांना झाली. त्यानंतरच पॅरा तिरंदाजीतील शीतलचा प्रशिक्षणाचा प्रवास सुरू झाला. मात्र सुरुवातीचे तिचे प्रयत्न अयशस्वी ठरले. तिच्या प्रशिक्षणात अनेक तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. त्याच काळात तिच्या प्रशिक्षकांना मॅट स्टुटझमन (Matt Stutzman) याची माहिती मिळाली. हासुद्धा एक हातहीन तिरंदाज आहे. त्याने लंडन २०२१ पॅराऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवलं होतं. त्याने यासाठी पाय वापरला होता. शीतलच्या प्रशिक्षकांनीही हीच रणनीती वापरण्याचं ठरवलं.
Ten, ten, ten! Perfect scores! Devi Sheetal shot six consecutive ten rings in the last two rounds at the final of Women's Ind. Compound and won her first individual gold medal of Asian Games.#Hangzhou #AsianParaGames #HangzhouAsianParaGames #4thAsianParaGames #Hangzhou2022APG… pic.twitter.com/CV40QHpAHm
— The 19th Asian Games Hangzhou Official (@19thAGofficial) October 27, 2023
भारतातील पॅरा तिरंदाज
तिरंदाजीतील आपला पुढचा प्रवास तिने माजी तिरंदाज आणि प्रशिक्षक कुलदीप वेदवान यांच्यामार्फत केला. राष्ट्रीय स्पर्धांतील दिव्यांग तिरंदाजांमध्ये तिने उत्तम कामगिरी केली. पॅरा तिरंदाजीमध्ये शीतलनेही स्टुटझमनप्रमाणेच पाय वापरून अपारंपरिक नेमबाजी तंत्र स्वीकारले आणि मार्च-एप्रिल २०२२ मध्ये हरियाणातील पॅरा तिरंदाजी राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेतील तिच्या कामगिरीमुळे तिला एक भारतीय पॅरा तिरंदाज अशी ओळख निर्माण झाली. सहा महिन्यांनंतर शीतल देवीने गोव्यातील ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला. या स्पर्धेत सर्व सक्षम तिरंदाज (Abled Archers) होते. या स्पर्धेत तिला पदक मिळालं नसलं तरीही तिच्या प्रशिक्षकांचा तिच्याविषयी असलेल्या विश्वास अधिक वाढला होता.
अल्पावधीत मिळाला जागतिक स्पर्धेत प्रवेश
जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवण्यासाठी अनेक खेळाडूंना प्रशिक्षणासाठी अनेक वर्षे प्रयत्न करावे लागतात. पण शीतल देवीवर खऱ्या अर्थाने देवाचा आशीर्वाद होता. तिने तिच्या कौशल्याने अल्पावधित जागतिक स्पर्धांमध्ये प्रवेश मिळवला. २०२३ च्या जागतिक अजिंक्यपद (World Championship) स्पर्धेत रौप्य पदक आणि आशियाई पॅरा गेम्समध्ये दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळवण्यात यश मिळवल्यानंतर शीतल देवीने पॅरा कंपाऊंड तिरंदाजांच्या क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवला. शीतलने नवी दिल्लीतील महिलांच्या कंपाउंड खुल्या गटात खेलो इंडिया पॅरा गेम्स २०२३ स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले.
सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू
शीतल देवी हिला आशियाई पॅरालिम्पिक समितीने वर्षातील सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू म्हणून घोषित केले. तसंच, भारताच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२३ मध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त करण्यासाठी नामांकित केले. अर्जुन पुरस्कार हा भारतातील भारतीय खेळाडूंसाठी दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे.
शीतलच्या प्रत्येक स्पर्धेत तिची सहकारी रोमिका शर्मा तिच्याबरोबर असते. याबाबत रोमिका म्हणते की, “मी तिच्या सराव सत्रांवर देखरेख करते. खेळाचं सामान घेऊन जाते. शिवाय तिच्या स्ट्रेचिंगच्या कामावर देखरेख ठेवते. तसेच तिची स्कोअरिंगची खात्री करते. मैदानाबाहेरही, मी तिला खायला मदत करते. तसेच तिला जेव्हा जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा तिच्यासाठी उपलब्ध असते. मी खरंतर तिची मैत्रीण आहे. पण मला ती बहिणीसारखी आहे. जेव्हा ती एकटी कुठेही प्रवास करत असते, तेव्हा मला तिच्या प्रकृतीविषी चिंता वाटत असते. ती थोडी हट्टी असून तेवढीच निरागसही आहे. तिला मालिका पाहायलाही आवडतात.”
भारतासाठी पॅरालिम्पिक कोटा सुरक्षित झाल्यामुळे शीतल देवी पॅरिस २०२४ मध्ये पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारी देशातील सर्वात तरुण महिला बनण्याचा प्रयत्न करणार आहे. यावर्षी शीतलने खेलो इंडिया NTPC नॅशनल रँकिंग तिरंदाजी मेळाव्यात रौप्य पदक जिंकले. सक्षम शरीराची तिरंदाज एकता राणी ही एक ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन आहे, तिला शीतलने मागे टाकले होते.
शीतल देवीची पदके आणि कामगिरी
- जागतिक तिरंदाजी पॅरा चॅम्पियनशिप २०२३ रौप्य पदक – महिला वैयक्तिक कंपाउंड खुली तिरंदाजी
- आशियाई पॅरा गेम्स २०२३ सुवर्णपदक – महिला वैयक्तिक कंपाउंड ओपन तिरंदाजी
- आशियाई पॅरा गेम्स २०२३ सुवर्णपदक – मिश्र दुहेरी कंपाउंड खुली तिरंदाजी
- आशियाई पॅरा गेम्स २०२३ रौप्य पदक – महिला दुहेरी कंपाउंड ओपन तिरंदाजी
- २०२३ मध्ये खुल्या गटातील महिला कंपाऊंड पॅरा तिरंदाज जागतिक क्रमांक १
- खेलो इंडिया पॅरा गेम्स २०२३ सुवर्णपदक – महिला वैयक्तिक कंपाऊंड ओपन तिरंदाजी
अर्जुन पुरस्कार २०२३
- आशियाई पॅरालिम्पिक समितीतर्फे २०२३ चा सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू
- जागतिक तिरंदाजी द्वारे २०२३ मधील सर्वोत्कृष्ट महिला पॅरा आर्चर