first woman campus director at IIT : आयआयटीमधून पदवी शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी जगातील सर्वांत मोठ्या कंपन्यांमध्ये काम करतात, असे आपण कायम ऐकत आलो आहोत. हटके विचारसरणी, दूरदृष्टी, चौकटीपलीकडे जाऊन विचार करण्याची क्षमता व कठोर परिश्रम करण्याची वृत्ती या जोरावरच असे विद्यार्थी स्वहिमतीने उच्च पगाराच्या नोकऱ्या मिळवतात. अनेक आयआयटी पदवीधारकांना दरवर्षी उच्च पगाराच्या नोकऱ्या दिल्या जात असल्या तरीही त्यातील बरेच जण स्वतः काहीतरी करून दाखविण्याचा मार्ग स्वीकारतात. अर्थात, असे असले तरीही त्यातील अगदी मोजक्या व्यक्ती आपले नाव इतिहासात नोंदवितात.
अशीच एक यशस्वी, इतिहासात नाव कोरणारी आणि आयआयटी मद्रासमधून पदवी शिक्षण पूर्ण करणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर प्रीती अघालयम. आयआयटीमधून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रीती यांची प्रथम महिला आयआयटी कॅम्पस डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. माहितीसाठी, आयआयटी मद्रासने ३५ पदवीपूर्व आणि १५ पदव्युत्तर विद्यार्थ्यांसह झांजिबार, टांझानिया येथेदेखील कॅम्पस उभारले आहेत. डॉक्टर प्रीती झांजिबार कॅम्पसच्या ‘डायरेक्टर इन्चार्ज’ म्हणून कार्यरत आहेत.
१९९१ साली आयआयटी मद्रासमधून बी.टेक. या विषयात प्रीती यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील रोचेस्टर विद्यापीठातून केमिकल इंजिनियरिंगमध्ये मास्टर्स / एम.एस. शिक्षण घेतली आणि पीएचडीदेखील पूर्ण केली. त्यासाठी त्यांनी १९९६ साली मॅसॅच्युसेट्स विद्यापीठात प्रवेश घेतला होता. प्रीती आयआयटी मद्रासमध्ये डायरेक्क्टर असण्यासोबतच, आयआयटी मुंबई येथे प्राध्यापक आणि केंब्रिज एमआयटी येथे पोस्ट डॉक्टरल संशोधक म्हणून काम करीत आहेत.
मुख्य वैज्ञानिक सल्लागारांच्या कार्यालयातून [Principal Scientific Advisor’s office] नावाजल्या जाणाऱ्या STEM मधील ७५ महिलांपैकी एक म्हणून प्रीती अघालयम ओळखल्या जातात. इतर प्राध्यापकांप्रमाणेच प्रीती यांनीदेखील डिझेल ऑक्सिडेशन कॅटॅलिटिक कन्व्हर्टरच्या कार्यक्षमतेवर इनलेट मॅनिफोल्ड डिझाइनच्या प्रभावांचा अंदाज आणि CFD चा वापर करून SCR च्या कार्यक्षमतेवर युरिया नॉन-युनिफॉर्मचा परिणाम अशा विषयांवर अनेक लेख लिहिले आहेत. त्याव्यतिरिक्त प्रीती एक मॅरेथॉन धावपटू अन् ब्लॉगरदेखील आहेत.