गुगल डुडल नेहमी वेगवेगळे संदेश देण्याचे काम करत असते. १६ जुलै रोजीच्या गुगल डुडल वरती मूळ भारतीय असणाऱ्या जरिना हश्मी यांची प्रतिमा आहे. अनेकांना त्या अमेरिकन कलाकार आहेत, एवढेच माहीत आहे. परंतु, त्यांचा जन्म भारतामध्ये झाला असून शिक्षणही भारतात झाले आहे. या पार्श्वभूमीवर जरिना हश्मी कोण होत्या, त्यांचे कार्य काय, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण होत्या जरिना हश्मी ?

जरिना हश्मी या विख्यात चित्रकार, स्त्रीवादी कार्यकर्त्या होत्या. त्यांचा जन्म १६ जुलै, १९३७ मध्ये अलिगढ येथे झाला. १९४७ मध्ये फाळणी झाल्यावर त्यांचे कुटुंब पाकिस्तानमधील कराची येथे स्थलांतरित झाले. त्यांचे वडील शेख अब्दुर रशीद हे अलिगढ मुस्लिम विद्यापीठात प्राध्यापक होते. जरिना यांनी १९५८ मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून गणित विषयात बीएस (ऑनर्स) पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी थायलंडमध्ये प्रिंटमेकिंगच्या विविध पद्धतींचा अभ्यास केला आणि पॅरिसमधील ‘एटेलियर १७’ स्टुडिओमध्ये स्टॅनले विल्यम हेटर यांच्याकडे प्रशिक्षण घेतले. १९८० च्या दशकात, जरिना यांनी न्यूयॉर्क फेमिनिस्ट आर्ट इन्स्टिट्यूटचे बोर्डचे सदस्य आणि संलग्न महिला केंद्र फॉर लर्निंग येथे पेपरमेकिंग कार्यशाळेचे प्रशिक्षक म्हणून काम केले. फेमिनिस्ट आर्ट जर्नल हेरेसीजच्या संपादकीय मंडळावर असताना त्यांनी ‘थर्ड वर्ल्ड वुमन’ या प्रदर्शनाचे आयोजन केले.

हेही वाचा : नक्षत्रांची वाहने सांगतात पावसाचा अंदाज ? नक्षत्राचे वाहन म्हणजे काय ? पावसालाही टोपणनावे असतात का ?

जरिना हश्मी यांचे कार्य

गुगल डुडलच्या रचनेमध्येही त्यांचे प्रिंटमेकिंग क्षेत्रातील तसेच, स्त्री कार्यकर्त्या, संपादिका म्हणून दिलेले योगदान चित्रित होते. जरिना या मिनिमलिस्ट शैलीतील चित्रांसाठी प्रसिद्ध आहेत. जरिना यांचा विवाह २१व्या वर्षी झाला. लग्नानंतर पतीच्या राजकीय कामांनिमित्त त्यांना बँकॉक, पॅरिस आणि जपान प्रवासाचा योग्य आला. परंतु, या प्रवासात त्यांनी प्रिंटमेकिंग आणि आधुनिकतावादी आणि अमूर्त कला प्रकारांचा अभ्यास केला.
१९७७ मध्ये त्या न्यूयॉर्क शहरात स्थलांतरित झाल्या. त्यानंतर त्यांनी महिला संघटनांमध्ये सहभाग घेऊन महिला कलाकारांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर काम करण्यास सुरुवात केली. त्या ‘हेरेसीज कलेक्टिव्ह’च्या सदस्य झाल्या. ‘हेरेसीज कलेक्टिव्ह’ हे एक स्त्रीवादी मासिक आहे, ज्यात राजकारण, कला आणि सामाजिक न्याय यांच्यातील संबंधांचे परीक्षण केले जाते. त्यात त्यांनी सक्रिय योगदान दिले. नंतर त्या न्यूयॉर्क फेमिनिस्ट आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक झाल्या. त्यांनी महिला कलाकारांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्या. १९८० मध्ये त्या ‘एआयआर’मध्ये रुजू झालया. विविध प्रदर्शनांच्या आयोजनांमध्ये त्यांनी सहकार्य केले. “द डायलेक्टिक ऑफ एलेनेशन: अॅन एक्झिबिशन ऑफ थर्ड वर्ल्ड वुमन आर्टिस्ट्स फ्रॉम युनायटेड स्टेट्स” या मुख्य प्रदर्शनाचे आयोजन त्यांनी केले.

जरिना हश्मी या आकर्षक इंटॅग्लिओ आणि वुडकट प्रिंट्ससाठी प्रसिद्ध होत्या. शहरे, घरांचे अमूर्त शैलीतील आकार त्यांनी तयार केले होते. भारतात जन्म घेऊन काही काळ भारतात तर काही काळ पाकिस्तानमध्ये घालवल्यामुळे त्यांच्यावर भारतीय तसेच इस्लामिक संस्कृतीचा प्रभाव होता. इस्लामिक धार्मिक सजावटीतील वस्तू, वास्तू, साहित्य यांचा त्यांनी रचनात्मक अंगांनी अभ्यास केला. त्यांच्या सुरुवातीच्या कामांच्या अमूर्त आणि संक्षिप्त भूमितीय सौंदर्याची तुलना सोल लेविट यांच्या मिनिमलिस्टच्या कामांशी केली गेली आहे. सॅन फ्रान्सिस्को म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट, द व्हिटनी म्युझियम ऑफ अमेरिकन आर्ट, द सॉलोमन आर येथे त्यांच्या कलाकृतींचा संग्रह आहे. तसेच अन्य जागतिक स्तरावरील गॅलरीज् मध्ये त्यांच्या कलाकृती संग्रहित करण्यात आल्या आहेत.

जरिना हश्मी यांना मिळालेले पुरस्कार

२००७: रेसिडेन्सी, रिचमंड विद्यापीठ , रिचमंड, व्हर्जिनिया
२००६: रेसिडेन्सी, मोंटाल्व्हो आर्ट्स सेंटर, साराटोगा, कॅलिफोर्निया
२००२: रेसिडेन्सी, विल्यम्स कॉलेज , विल्यमस्टाउन, मॅसॅच्युसेट्स
१९९४: रेसिडेन्सी, आर्ट-ओमी, ओमी, न्यूयॉर्क
१९९१: रेसिडेन्सी, महिला स्टुडिओ वर्कशॉप , रोसेंडेल, न्यूयॉर्क
१९९०: अॅडॉल्फ आणि एस्थर गॉटलीब फाउंडेशन अनुदान, कला फेलोशिपसाठी न्यूयॉर्क फाउंडेशन
१९८९: ग्रँड प्राइज, इंटरनॅशनल द्विवार्षिक प्रिंट्स, भोपाळ, भारत
१९८५: न्यूयॉर्क फाउंडेशन फॉर आर्ट्स फेलोशिप, न्यूयॉर्क
१९८४: प्रिंटमेकिंग वर्कशॉप फेलोशिप, न्यूयॉर्क
१९७४: जपान फाउंडेशन फेलोशिप, टोकियो
१९६९: प्रिंटमेकिंगसाठी राष्ट्रपती पुरस्कार, भारत

५० हून अधिक जागतिक स्तरावरील एकल प्रदर्शने तसेच सामूहिक प्रदर्शनांमध्ये जरिना हश्मी यांचा सहभाग होता. वयाच्या ८२ व्या वर्षी लंडनमध्ये २५ एप्रिल, २०२० मध्ये अल्झायमरने त्यांचा मृत्यू झाला. आज गुगलने त्यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त खास डुडल बनवून त्यांच्या कार्याला अभिवादन केले आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is the indian woman on google doodle who was zarina hashmi vvk