Pandit Nehru Tirbal Wife Death: झारखंडमध्ये चार दिवसांपूर्वी म्हणजेच १७ नोव्हेंबरच्या दिवशी बुधनी मांझियाइन यांचं निधन झालं. बुधनी या ८० वर्षांच्या संथाल समाजाच्या आदिवासी महिला होत्या. पंडित नेहरु यांची ‘आदिवासी पत्नी’ अशी त्यांची ओळख होती. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र हे वास्तव आहे. बुधनी यांना पंडित नेहरुंनी एक हार घातला आणि त्यांना आयुष्यभर बहिष्कार सहन करावा लागला. काय घडलं होतं? कोण होत्या बुधनी आपण जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

५ डिसेंबर १९५९ हा दिवस बुधनी मांझियाइन यांच्यासाठी आयुष्यभराचा शाप ठरला. पंचेत प्रकल्पाचं उद्घाटन करायला दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आले होते. त्यावेळी त्या ठिकाणी पंतप्रधान नेहरुंचं स्वागत करण्यासाठी आदिवासी युवती आल्या. त्यामध्ये बुधनीही होत्या. बुधनी मांझियाइन नावाच्या या मुलीने प्रकल्पासाठी मजूर गोळा करायला बरीच मदत केली असं पंडित नेहरुंना कळलं. त्यावेळी नेहरु खूपच आनंदी झाले. त्यांनी सांगितलं की प्रकल्पाचं उद्घाटन बुधनी मांझियाइन यांच्या हस्तेच होईल. त्यानंतर पंडित नेहरुंनी आपल्या गळ्यातला हार बुधनी यांच्या गळ्यात घातला. पंडित नेहरुंनी केलेल्या या कृतीची किंमत बुधनी यांना आयुष्यभर मोजावी लागली.

पंचेत प्रकल्पाचं उद्घाटन बुधनी यांच्या हस्ते झालं. मात्र संथाल आदिवासी समाजात जर कुठल्या पुरुषाने स्त्रीच्या गळ्यात हार घेतला तर त्यांचं लग्न झालं असं समजलं जातं. तसंच पंडित नेहरु हे संथाल आदिवासी समाजाचे नव्हते. त्यामुळे जातीबाहेरच्या पुरुषाने आपल्या समाजातल्या मुलीच्या गळ्यात हार घातला म्हणून तिला समाजाने बहिष्कृत केलं. खरंतर बुधनी यांनी प्रकल्पाचं उद्घाटन करणं ही एक ऐतिहासिक घटना होती. कारण ‘आनंद बाजार पत्रिका’, ‘स्टेट्समन’ या वृत्तपत्रांनी पंतप्रधान पंडित नेहरु आणि बुधनी यांचे फोटोही छापले आणि ही बातमीही. मात्र या पंडित नेहरुंनी जो हार घातला त्याची किंमत बुधनी यांना आयुष्यभराच्या बहिष्काराने मोजावी लागली.

बुधनी यांच्या आयुष्यातला हा सर्वात मोठा वादळी दिवस ठरला. कारण पंतप्रधान पंडित नेहरुंसह माळ घातली म्हणून सगळ्या गावाने बुधनी यांना कोसलं. बुधनी या जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांना आदराची वागणूकही गावाने दिली नाही.

काही वर्षांपूर्वी बुधनी मांझियाइन यांनी बीबीसीला मुलाखत दिली होती, त्या म्हणाल्या होत्या, “त्या दिवशी रात्री खोरबाना गावात संथाली समाजाची बैठक बोलवली गेली. मला हे सांगण्यात आलं की पंडित नेहरुंनी तुला माळ घातल्याने तू आता त्यांची पत्नी झाली आहेस. तिथे बसलेल्या लोकांनीही सांगितलं की पंडित नेहरुंनी तुला हार घातला आदिवासी परंपरेनुसार हे लग्नच आहे. पण पंडित नेहरु हे आदिवासी नाहीत. त्यामुळे तुझ्यावर बिगर आदिवासी माणसाशी लग्न केल्याचा ठपका ठेवत आहोत. संथाली समाजाने मला त्या रात्रीच बहिष्कृत केलं आणि गावाबाहेर हाकललं.”

याच मुलाखतीत त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की पंडित नेहरुंना तुम्ही हार घातला होतात का? यावर बुधनी म्हणाल्या, “मी पंडित नेहरुंना हार घातला नव्हता. मी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं होतं. मात्र ती माझी चूक ठरली कारण माझ्यावर सगळ्या गावाने बहिष्कार घातला.”

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who was budhni manjhiyain popularly known as nehru tribal wife know the inside story scj