काही वर्षांपूर्वी कोणत्याही सात-आठ वर्षांच्या मुलाला, ‘तुला पुढे काय बनायचं आहे?’ असा प्रश्न विचारल्यास त्याची उत्तरं ही साधारण शिक्षक, पायलट, ट्रेन-बसचालक अशी असायची. मात्र, सत्तरीच्या दशकात भारतासह इतर देशांमध्येही महिलांनी अशी स्वप्न पाहणे योग्य समजले जायचे नाही. परंतु, लंडनमधील जिल विनर [Jill Viner] यांनी बसचालक बनायचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णदेखील केले.
आज अनेक क्षेत्रांमध्ये पुरुषांसह काम करणाऱ्या विविध क्षेत्रांमध्ये बसचालकाची भूमिकादेखील स्त्रिया अगदी सहजतेने बजावत आहेत. मात्र, याची सुरुवात १९७४ साली लंडनमध्ये झाली आहे. जिल विनर यांनी मे १९७४ साली, लंडन बसची सर्वात पहिली महिला प्रवासी बसचालक बनून इतिहास घडवला. अर्थात, त्या काळात अनेक स्त्रिया केवळ बस चालवत असल्या तरीही प्रवाश्यांना घेऊन जाणाऱ्या बसची पहिली महिला चालक मात्र जिल होती.
हेही वाचा : “…वाढदिवस साजरा केला जातो मग मासिक पाळी का नाही?” काय आहे ‘मासिका महोत्सव’ जाणून घ्या
जिल विनरची दक्षिण-पश्चिम लंडनमधील नॉर्बिटन गॅरेजवर या ठिकाणी भरती झालेली होती. तिने १९९३ पर्यंत लंडनमधील प्रवाशांना एक चालक म्हणून बस सेवा दिली होती. जवळपास वीस वर्षे जिलने बसचालक म्हणून नोकरी केली.
“मला बसगाड्यांबद्दल फार आकर्षण वाटायचे, ते का हे मात्र विचारू नका. पण, मी वयाच्या आठव्या वर्षीच मला एक बसचालक व्हायचे आहे हे ठरवले होते”, असे जिलने १९९६ साली तिच्या मृत्यूआधी सांगितले असल्याची माहिती बीबीसीच्या एका लेखावरून समजते. “बस एक स्त्री चालवत आहे हे पाहून अनेकांच्या भुवया वर उंचवायच्या, त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव असायचे.
“कदाचित हेच ते, बसच्या पायऱ्यांवर अडखळणारे प्रवासी असतील, ज्यांबद्दल गाडीचा वाहक [कंडक्टर] मला नेहमी सांगायचा. कारण मला माझ्या कामाकडे लक्ष देताना बाकीचे काय करत आहेत हे बघण्यासाठी वेळ नसायचा”, असे जिलने सांगितले होते.
जिलला बसचालक म्हणून एक आठवडा झाला होता, परंतु त्या काळात अजून तब्ब्ल ३० महिलांनीही या नोकरीसाठी अर्ज केला होता. १९८० पासून लंडन ट्रान्सपोर्टने सक्रियपणे महिलांना बसचालक पदावर नोकरी देण्यास सुरुवात केली.
“आज अनेक महिला लंडन ट्रान्सपोर्टच्या विविध स्तरांवर काम करत आहेत. मात्र, असे असले तरी अद्यापही सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्त्व दिसत नसून, खूप कमी स्त्रिया बसचालक म्हणून काम करत असल्याचे, लंडन ट्रान्सपोर्ट संग्रहालयाने बीबीसीला जिलची यश साजरे करताना सांगितले.
जिल विनर यांचा २० वर्षांचा हा प्रवास आणि यश लंडन ट्रान्सपोर्ट संग्रहालय साजरा करत आहे, अशी माहिती बीबीसीच्या एका लेखावरून समजते.
© IE Online Media Services (P) Ltd