Menstrual Health and Hygiene : १२ वर्षांची सोनू घरात तिच्या आईबरोबर टीव्ही पाहत असते. तेवढ्यात टीव्हीवर सॅनिटरी नॅपकिन्सची जाहिरात दाखवली जाते.
जाहिरातीमध्ये दाखवितात, “एका शाळेत खेळाचा तास सुरू आहे. सर्व मुलं खेळत आहेत; पण सोनूच्या वयाची एक मुलगी कोणताचा खेळ खेळत नाही. तिला पाहून एक शिक्षिका त्या मुलीला न खेळण्याचे कारण विचारते, तेव्हा ती मुलगी घाबरत मासिक पाळी आल्याचे सांगते. तिची चिंता ओळखून शिक्षिका तिला सॅनिटरी नॅपकिन वापरण्याचा सल्ला देते. त्यानंतर ती मुलगी सर्वांसह आनंदानं खेळताना, उड्या मारताना दाखवली जाते.”
शाळेमध्ये सॅनिटरी पॅडबाबत नुकतीच माहिती मिळाल्यामुळे सोनूच्या मनात त्याबाबत अनेक प्रश्न होते. टीव्हीवरील जाहिरात पाहून सोनू आपल्या आईला विचारते की, आई, सॅनिटरी पॅड्सच्या जाहिरातीत मुली खेळताना, उड्या मारताना, महिला डोंगर-दऱ्या चढताना का दाखवितात?
सोनूची आई तिला उत्तर देत म्हणाली, “ही जाहिरात आहे. मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅड्सचा वापर करणं अत्यंत सोईस्कर आहे पण ही महिलांसाठी तयार केली गेलेली एक सुविधा आहे. जाहिरातीमध्ये मुलींना सॅनटरी पॅड वापरून उड्या मारताना दाखवणे ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. पूर्वीच्या काळी महिला कापड वापरत; ज्यामुळे सहज डाग पडत असे. त्यामुळे महिलांना मासिक पाळीदरम्यान काही दिवस बाजूला बसावं लागे. सॅनिटरी पॅड्सच्या तुलनेत कपड्याचा वापर करणं तितके सोईस्कर नव्हतं. कपडा वापरून महिलांना जास्त हालचाली करता येत नसत. कारण- त्यामुळे सहज डाग पडत असे. कापडापेक्षा सॅनिटरी पॅड वापरणं तसं अत्यंत सोईस्कर आहे. सॅनिटरी पॅडमध्ये रक्त शोषून घेण्याची क्षमता असल्यामुळे महिलांना डाग पडण्याची भीती न बाळगता, आपलं काम करता येतं. सॅनिटरी पॅड्समुळे महिलांना आता बाजूला बसून राहावं लागत नाही. सॅनिटरी पॅड्स वापरून महिला आपलं रोजचं काम आरामात करू शकतात. सॅनिटरी पॅड्स असले तरी कपड्यांना डाग लागण्याची भीती महिलांना आजही असतेच; पण ही भीती आता कमी झाली आहे. पाच दिवस सक्तीने बाजूला बसून राहण्याची आता प्रत्येक महिलेला गरज नाही. पूर्वीपेक्षा महिला आता मुक्तपणे बागडू शकतात, या भावनेची जाणीव करून देण्यासाठी जाहिरातीत मुली खेळताना, उड्या मारताना, महिला डोंगर-दऱ्या चढताना दाखवितात.”
हेही वाचा –२० किलोच्या गुलाबी गाऊनमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणारी नॅन्सी आहे तरी कोण? पाहा व्हायरल फोटो
सोनू पुन्हा कुतूहलाने विचारते की, मासिक पाळीदरम्यान सुरक्षिततेसाठी जाहिरातींमध्ये उड्याच मारणारी बाई का दाखवली जाते?
अनेक मासिक पाळीच्या जाहिरातींमध्ये सॅनिटरी पॅड्स आणि महिलांना मुक्तपणे बागडण्याचे स्वातंत्र्य यांचा संबध दाखविला जातो. जाहिरातीमध्ये नेहमी अतिशयोक्ती केली जाते. खऱ्या आयुष्यात मासिक पाळीदरम्यान प्रत्येक महिला सॅनिटरी पॅड्स वापरून उड्या मारू शकत नाही. जाहिरातीमध्ये जरी मुली सॅनिटरी पॅड्स वापरून बिनधास्तपणे खेळताना दाखविल्या असल्या तरी खऱ्या आयुष्यात हे शक्य नाही. प्रत्येक महिलेला मासिक पाळीदरम्यान होणारा रक्तस्राव हा कमी-जास्त असू शकतो आणि सॅनिटरी पॅडचीसुद्धा रक्त शोषण्याचीही एक क्षमता आहे. त्यामुळे नेहमी दर चार ते सहा तासांनी सॅनिटरी पॅड बदलण्याचा सल्ला दिला जातो.
मासिक पाळीदरम्यान प्रत्येक महिलेला येणारा अनुभव वेगवेगळा असतो. काही महिलांना मासिक पाळीदरम्यान मोठ्या प्रमाणात त्रास होतो. त्यामुळे त्यांना सॅनिटरी पॅड्स वापरूनही कोणतंही काम करणं शक्य होत नाही. मासिक पाळीदरम्यान मुली उड्या मारू शकतात किंवा डोंगरदऱ्याही चढू शकतात; पण ते प्रत्येक स्त्रीला मासिक पाळीदरम्यान होणारा रक्तस्राव आणि त्रास यांवर अवलंबून आहे. जर एखाद्या महिलेला मासिक पाळीदरम्यान फारसा त्रास होत नसेल, खूप रक्तस्राव होत नसेल, तर ती या गोष्टी सहज करू शकते. पण, प्रत्यक्षात या सर्व गोष्टी करताना महिलांना आधीपासून खूप काळजी घ्यावी लागते. दिवसातून चार-पाच वेळा पॅड्स बदलावे लागतात. मासिक पाळीदरम्यान खूप त्रास होत असेल, तर डॉक्टरांच्या सल्ला घेऊनच अशा गोष्टी कराव्या लागतात.