सासर आणि माहेर अशी मुलीला दोन घरं असतात. पण एकही घर तिच्या मालकीचं नसतं. दोन्ही घरात त्या परक्याच. आई-वडिलांसाठी त्या परक्याचं धन तर, सासरच्यांसाठी ती परक्याची लेक असते. त्यामुळे कितीही आपलं मानलं तरीही ते घर तिच्यासाठी तसं परकंच. हे परकेपण सहन होत नव्हतं. स्वतःचं काहीतरी असावं म्हणून मी चौकटीबाहेरचा विचार केला. आई-वडिलांची संपत्ती होती. त्यात माझा वाटा होताच. शिवाय नवऱ्याचंही वडिलोपार्जित घर होतं. पण तरीही दोन्ही घरे खायला उठायची. त्या घरांमध्ये आपलंपण वाटत नव्हतं. म्हटलं आपण चांगले कमावतो आहोत, तर स्वतःचं घर घेऊन तिथे नव्याने संसार सुरू करूयात. नवऱ्यालाही कल्पना आवडली. माझा स्वाभिमान त्याला पटला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बजेटमध्ये बसेल आणि चौकोनी कुटुंब आनंदात राहिल असं वन बीएचके घर घेण्याचं ठरवलं. नाशिकमधील सर्व चांगली लोकेशन्स पालथी घातली. या प्रयत्नांना यश आलं आणि नाशिकच्या मध्यवर्ती भागात स्वतःचा वन बीएचके फ्लॅट घेतला. या फ्लॅटमध्ये खूप वर्षांनी मोकळा श्वास घेतला. हे घर ना माहेरचं होतं, ना सासरचं. हे घरं होतं माझ्या हक्काचं आणि स्वप्नातलं. मी, नवरा, मुलगी आणि सासू असे आम्ही चौघेजण इथे स्थायिक झालो. इथं मला मी हवंतसं घर सजवलं. मला पाहिजे तसं इंटेरिअर केलं. अगदी खिडक्यांच्या पडद्यांपासून बाथरुमच्या टॉयलेट पेपरपर्यंत सगळं काही माझ्या मनाजोगतं झालं होतं.

हेही वाचा >> नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!

घर तसं कर्जावर घेतलं. नवऱ्यानेच स्वतःच्या नावावर कर्ज काढलं आणि मी हफ्ते भरायचे ठरलं. त्यामुळे दर महिन्याला हफ्त्याची रक्कम नवऱ्याला देत होते. सुरुवातीचे काही दिवस खूप चांगले गेले. सूनेने स्वतःच्या कष्टाने घर घेतल्याचं माझ्या सासूला अपार कौतुक होतं. ती तिच्या मैत्रिणींना बोलावून आनंदाने हे घर दाखवत होती. सासूच्या या मायेने मीही हरखून गेले. लेकीप्रमाणे सूनेलाही पाठिंबा दिला तर प्रत्येक घरातील स्त्री यशस्वी होऊ शकते, असं त्यावेळी जाणवलं. पण ही माया फार अल्पावधित संपली. माझी आई औषधोपचार करण्याकरता माझ्याकडे राहायला आली. खरंतर, माझ्या हक्काचं घर होतं, त्यामुळे मी तिला हक्काने माझ्याकडे राहायला बोलावलं. ती आजारी असल्याने तिचे उपचार सुरू होते. माझ्या घरापासून तिचं रुग्णालय जवळ होतं, त्यामुळे तिला येथून सोयीस्कर पडत होतं. चौकोनी कुटुंबात फार त्रास होणार नाही असं मला वाटलं. पण माझी आई आल्याने सासूच्या नाकावर राग स्पष्ट दिसायला लागला. आईला प्रवासाचा त्रास होत असेल तर तिला इथे भाड्याने खोली घेऊन दे, पण आपल्याकडे का ठेवायचं? असा तिने थेट प्रश्न विचारला. त्यांच्या या प्रश्नाचा प्रचंड धक्का बसला. मी सासूच्या घरात राहत होती, तेव्हा माझी आई पाहुण्यासारखी यायची आणि पाहूणचार घेऊन त्याच दिवशी निघून जायची. लेकीच्या सासरी जास्त वेळ राहु नये म्हणून तिने एक वस्तीही माझ्याकडे कधी काढली नाही. पण आता लेकीने स्वतःच्या कष्टाने घर उभारलं आहे म्हणून तीही हक्काने माझ्याकडे राहायला आली. पण सासूबाईंना तिचं येणं पटलं नाही.

मी ऑफिसला गेल्यावर सासू माझ्या आईला टोमणे मारायला लागल्या. लेकीच्या सासरी जास्तवेळ आईने थांबू नये असं सांगू लागल्या. मैत्रिणींकडे गॉसिप करायला लागल्या. पण आईच्या आरोग्यासाठी तिने आमच्याकडे राहणंच योग्य होतं. ती माझ्याकडे आल्यापासून तिची प्रकृती सुधारलीही होती. परंतु, आईने माझ्याकडे राहणं हे सासूला पसंत पडत नव्हतं. सुनेने घर घेतलं असलं तरीही त्यांना त्यांच्या लेकाचं कौतुक. लेकाने प्रोत्साहन दिलं म्हणून घर घेऊ शकलीस, असं सासू बोलू लागल्या. आईला माझ्याकडे न ठेवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. पण मी माझ्या आईला माझ्याकडे का ठेवू नये असा प्रश्न मला सतत पडायच्या. ज्या बाईने माझ्या शिक्षणासाठी अनेक कष्ट सोसले. स्वतःचं तारुण्य माझ्यासाठी घालवलं. वडिलांच्या मागे माझ्या सावलीप्रमाणे उभी राहिली. मला ना भाऊ आणि नाही बहिण. मग तिने कोणाकडे जायचं? त्यामुळे तिने माझ्याकडेच राहावं असा माझा अट्टाहास होता. पण माझा हा अट्टाहास सासूला पटत नव्हता. नवराही सासूच्या पुढ्यात काही बोलेना.

उलट नवराही म्हणाला की मी आईंना दुसरी खोली भाड्याने घेऊन देतो. तिथे तुम्ही राहा. पण इथं नको. त्यामुळे मुलाची आई चालते मग मुलीची आई का नको? असा थेट सवाल मी केला. मी घराचे हफ्ते भरत होते, म्हणून नवरा आईला आणि बहिणीला पैसे देऊ शकत होते. घरचं वाण-सामान, इतर खर्चही मीच पाहत होते. पैशांसाठी मी कधीच कोणाकडे हात पसरले नाहीत. तरीही माझ्या पडत्या काळात कोणीच उभं राहिलं नाही. शेवटी मला यांना इंगा दाखवावा अशी इच्छा माझ्या मनात आली.

घर घेताना मी नवऱ्याच्या नावावर कर्ज घेतलं होतं. त्यामुळे यापुढचे हफ्ते मी भरणार नाही, तूच भर असं मी निक्षून सांगितलं. ज्या घराचं डाऊनपेमेंट मी केलं, ज्या घराचे हफ्ते मी भरले. त्याच घरात माझी आई राहू शकत नसेल तर या घरात मी कोणत्या अधिकारवाणीने राहू? मी त्या कर्जाचे हफ्ते भरणं बंद केलं. आई आणि माझ्यासाठी तात्पुरतं घर भाड्याने घेतलं. आणि नव्या घराच्या शोधात राहिले. नवऱ्याला कर्जाचे हफ्ते आणि इतर खर्च अंगावर पडल्याने तो आई आणि बहिणीसाठी खर्च करू शकत नव्हता. त्याच्यावर खर्चाचा अतिरिक्त बोजा पडला. अखेर त्याला आणि त्याच्या आईला आपल्या चुकीची उपरती झाली आणि मला व आईला आनंदाने पुन्हा घरात घेतलं.

त्यामुळे, यापुढे स्वतःचं हक्काचं घर घेताना मुलींनी याबाबतची कल्पना सासरच्यांना देणं फार महत्त्वाचं आहे. आणि वेळ पडली तर कठीण निर्णय घेता येणंही गरजेचं आहे. खरंतर मुलीच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या आई-वडिलांचा तिच्यावर हक्क असतो. मुलाच्या आई-वडिलांना सूनेने सांभाळावं अशी एक अलिखित रित आपल्या परंपरेत आहे, तसंच मुलीच्या पालकांची जबाबदारीही उचलणे इष्ट कर्तव्य आहे हे का कळत नाही?

-अनामिका

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why in laws not allowed daughter in laws parents in her own house marathi katha chdc sgk
Show comments