१९ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध तमिळ अभिनेता, संगीतकार, आणि निर्माता विजय अँटनीच्या मुलीने आत्महत्या केली. मीरा ही अवघ्या १६ वर्षांची होती. अल्पवयीन मीराने आत्महत्येसारखं धक्कादायक पाऊल उचल्याने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली आहे. फक्त मीराच नाही तर यापूर्वीही देशात अशा कित्येक अल्पवयीन मुलींनी आत्महत्या हा मार्ग निवडून आपले आयुष्य संपवले.
खरं तर आत्महत्या हा मार्ग नाही किंवा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही. कधीही कोणत्याही व्यक्तीने आत्महत्येचा विचार मनात आणू नये. आज आपण चतुराच्या या विशेष लेखात अल्पवयीन मुली आत्महत्येकडे का वळतात आणि यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत असू शकतात, यावर चर्चा करणार आहोत.
अल्पवयीन असलेल्या म्हणजे १८ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलींनी ज्या वयात खेळायला पाहिजे, मनसोक्त जगायला पाहिजे, त्या वयात ते त्यांचे आयुष्य संपवण्याचा विचार करत असतील तर ही खरंच खूप गंभीर बाब आहे. ज्या वयात मुलांनी भविष्य घडवण्यासाठी मार्ग शोधायला पाहिजे त्या वयात जीवन संपवण्याचा मार्ग निवडणाऱ्या या अल्पवयीन मुलींच्या आत्महत्यांचा बातम्या वाचून अंगावर काटा येऊ शकतो.
पालकांची भूमिका
प्रत्येक अल्पवयीन मुलांच्या चांगल्या वाईट गोष्टीमागे पालक जबाबदार असू शकतात. एखादी अल्पवयीन मुलगी जेव्हा आत्महत्येचा विचार करते, तेव्हा तिच्या मनातील घालमेल जर पालक ओळखू शकले नाही, तर पालक म्हणून तुम्ही अयशस्वी ठरू शकता. आईवडिलांनी मुलांच्या आयुष्यात काय सुरू आहे, त्यांची मनस्थिती कशी आहे, हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्याबरोबर मैत्री करणे आणि संवाद साधणे हा एक चांगला पर्याय आहे.
हेही वाचा : मी एका शहीद जवानाची आई वीरमाता बोलतेय…
अल्पवयीन मुलींची मनस्थिती
भारतीय समाजव्यवस्थेत मुलींवर बरीच बंधने लादली जातात. तिने हे करू नये किंवा ते करू नये, असं सातत्याने पालकांकडून किंवा कुटूंबाकडून सांगितले जाते. अनेकदा पालक समाज काय म्हणेल या भीतीने मुलीला मुलांप्रमाणे समान वागणूक देत नाही. तिला नियमांच्या चौकटीक वागायला लावतात. अशा वेळी तुमची मुलगी स्वत:ला एकटं समजू शकते. तिची मनस्थिती बिघडू शकते. त्यामुळे अल्पवयीन मुलींची मनस्थिती समजून घेण्यासाठी तिला समजून घेणे, तिला कोणता शारीरिक, मानसिक त्रास किंवा तणाव आहे का, हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
मुलींना स्वातंत्र्य
एकाच घरात राहून अनेकदा मुलींना मुलांप्रमाणे स्वातंत्र्य दिले जात नाही. तिला दुय्यम आणि असमान वागणूक मिळत असल्याने ती स्वत: चे एक वेगळे विश्व तयार करू शकते. पालकांनी हे समजून घेणे गरजेचे आहे की कधी कधी मनाप्रमाणे वागू न दिल्याने मुलं तुमच्यापासून आणखी गोष्टी लपवू शकतात किंवा तुमच्याशी खोटं बोलू शकतात. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य द्या जेणे करुन ते तुमच्याबरोबर पारदर्शक राहतील.
हेही वाचा : Margaret MacLeod : अमेरिकेच्या प्रवक्त्या हिंदी भाषाप्रभू कशा झाल्या, जाणून घ्या त्यांचा प्रवास
अल्पवयीन मुलींच्या समस्या
देश कितीही प्रगतशील असला तरी आजही भारतात मुलामुलींमध्ये समानता दिसून येत नाही. मुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दररोजच्या जीवनातील संघर्षाला कंटाळून अनेकदा मुली आत्महत्येचा मार्ग निवडतात.
देशात लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या कित्येक मुली आत्महत्या करतात. कधी घरगुती हिंसाचार तर कधी अभ्यासाचा तणाव ही सुद्धा आत्महत्येची कारणे दिसून आली आहेत. कमी वयात मार्ग भरकटलेल्या मुली प्रेम प्रकरणाच्या नादातही आपला जीव गमावून बसतात.
अल्पवयीन वयात सुजाण नागरिक होण्याआधीच आयुष्य संपवणाऱ्या मुलींविषयी खरंच वाईट वाटतं. योग्य मार्गदर्शन आणि संवादाची कमतरता या गोष्टीसुद्धा आत्महत्येस कारणीभूत असू शकतात. एक पालक म्हणून आपल्या अल्पवयीन मुलांना येणाऱ्या समस्या समजून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्याबरोबर मैत्री करुन घरात हेल्दी वातावरण निर्माण करणे, गरजेचे आहे.