आपण सगळे जीवनाच्या रंगमंचावरील कलाकार असतो. एका आयुष्याच्या नाटकात अनेक भूमिका पार पाडत असतो. एखादं नाटक जेव्हा खूप उत्तम रंगतं, तेव्हा त्याचं श्रेय त्यातील मुख्य कलाकारांना दिलं जातं; तसं ते द्यायलाही हवं. पण त्याच बरोबर नाटक उभं करण्यात पडद्यामागील कलाकारांचा किती मोठा वाटा असतो हे आपण का विसरतो? की आपल्या लक्षात येऊनही आपण त्याकडे म्हणावं तितकं लक्ष देत नाही? नातेसंबंधातही बऱ्याचदा पडद्यामागील कलकाराकडे दुर्लक्ष होतं आणि बहुतांश वेळा ही कलाकार असते घरातील सून ! तिची धडपड, तिची नातं टिकवण्याची तळमळ आणि त्यामागील कष्ट अनेकदा नजरेआड होतात. ( हे असं सर्वांकडे घडतं असं मुळीच नाही, पण जिथे घडतं तिथं ते चुकतंय… आणि आज आपण त्याबद्दल बोलणार आहोत.)
हेही वाचा- वयानुसार महिलांमध्ये युरिक ॲसिड किती असावे? कंट्रोल करण्यासाठी पाहा ‘हा’ सोपा तक्ता
विदिशाच्या सासूबाईंना सकाळपासून बरं वाटत नव्हतं म्हणून तिनं ऑफिसला न जाता त्यांना आधी दवाखान्यात नेलं. अनेक टेस्ट, एक्स-रे वगैरे सगळं झालं आणि सगळी औषधं वगैरे घेऊन ती त्यांना घरी घेऊन आली. दुपारचा औषधाचा डोस देऊन बऱ्याच उशिरा ऑफिसला गेली. संध्याकाळी विदिशाचा नवरा घरी आला तेव्हा नेमक्या त्याच वेळी त्याची बहीण संध्या आईला गोळ्या देत होती. आई लगेच म्हणाली, ‘‘घरचं सगळं आवरून संध्या मला गोळ्या द्यायला आली रे ! मुलींना खरंच फार काळजी असते आईची ! ही नसती तर कसं झालं असतं ?’’ वास्तविक त्यांनी आपल्या सुनेचंही कौतुक करायला हवं होतं की नाही? मुख्य जबाबदारी तर तिनंच पार पाडली होती. नात्यांमध्ये अनेकदा घरातील सुनेचं क्रेडिट इतर कुणाला दिलं जातं. तिची धडपड, तिचा खटाटोप बऱ्याचदा नजरेआड केला जातो आणि वेळेवर समोर असणाऱ्या व्यक्तीला श्रेय दिलं जातं.
हेही वाचा- मुलाखत: ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’- अभिनेत्री जेनेलिया देशमुख
स्नेहानं नवऱ्याला बजावून सांगितलं होतं की, ‘‘मी साडी आणून पॅक करून ठेवली आहे. ताई दुपारी घरी येणार आहेत. तू घरूनच काम करतोय नं, मग आठवणीने साडी त्यांना दे. मी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन करेनच.’’ त्यानंतर तिनं पुन्हा आठवण करून दिल्यावर नवऱ्यानं बहिणीला साडी दिली. स्नेहाचे सासरे बुवा म्हणाले, ‘‘याला ऑफिसचं काम आणि बाकी सगळं सांभाळून कसं लक्षात राहतं नाही ? भाऊ असावा तर असा !’’ त्यावेळी आपल्या पत्नीची धडपड तिथं बोलून दाखावणं ही नवऱ्याची जबाबदारी नाही का? सरिता आणि केदारच्या घरात एका लग्नावरून वाद सुरू होता. त्यावरून केदारचे आईवडील आणि त्याची आत्या यांचे संबंध खूप बिघडले होते. त्यांचं बोलणं, येणं-जाणं सारं बंद होतं. सरिताला या गोष्टीचं फार वाईट वाटे. या दोन्ही घरांनी पुन्हा एकत्र यावं असं तिला वाटे. केदारच्या आतेभावाचं लग्न होतं. ती कुणालाही न सांगता केदारच्या आत्याकडे गेली आणि समस्त कुटुंबाला तिनं जेवणाचं आमंत्रण दिलं. ‘‘तुमचा भाऊ आणि वहिनी तुमची नेहमी आठवण काढतात, त्यांच्यासाठीतरी नक्की या… ’’ हे ऐकून आत्या प्रचंड भावनिक झाली.
हेही वाचा- विवाह समुपदेशन : सिबलिंग रायव्हलरी… नात्यात नकोच
इतक्या वर्षांनंतर तिच्या घरचे सगळे जण आलेले पाहून केदारच्या वडिलांचे डोळे भरून आले. जुने वाद विसरून सगळे एकत्र आले. लग्नात मुलाचे मामा-मामी म्हणून केदारचे आईवडील मिरवत होते. आनंदात लग्न पार पडलं. इतक्या वर्षांचे ताणलेले संबंध छान जुळून आले. इतकी मोठी घटना घडली, पण कुणीही एका शब्दाने सरिताचं कौतुक केलं नाही. सगळं क्रेडिट मात्र तिच्या सासू-सासऱ्याना मिळालं. नातवंडांना यश मिळालं की आजी-आजोबा अगदी सहज बोलून जातात, ‘‘पोरं अगदी बापावर गेली आहेत हो. आमचा मुलगाही अभ्यासात फार हुशार होता.’’ हे बोलताना मुलांची आई म्हणजे आपली सूनही उच्च शिक्षित आणि कुशाग्र बुध्दीची आहे हे कसं विसरलं जातं? त्याकडे दुर्लक्ष करण्यात त्यांना एक वेगळाच आनंद मिळत असतो का ?नातवंडं जन्माला आलं की ते आपल्या मुलासारखं कसं दिसतंय यावर जोरजोरात चर्चा होते. त्या बाळाला जन्म देणारी त्याची आई म्हणजे त्यांची सून मात्र हे शांतपणे ऐकत असते. तिला माहीत असतं, आपल्या कामाचं क्रेडिट आपल्याला मिळेलच या भावनेत कधी राहायचं नसतं. नाहीतरी गीतेत सांगितलंच आहे नं, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका…अपर्णा देशपांडेadaparnadeshpande@gmail.com