आराधना जोशी
माझ्या मुलीला लहानपणी झोपताना गोष्ट ऐकायची सवय होती. पण ती ऐकून झोपी जाणं हा मुलीचा स्वभाव नव्हता. आपण सांगितलेल्या गोष्टींवर ती विचार करते, याची जाणीव तिला कायम पडणाऱ्या प्रश्नांमुळे मला सतत होत होती. एकदा भीम आणि बकासुराची गोष्ट ऐकल्यावर दुसर्या दिवशी तिने प्रश्न विचारला, “आई बकासूर जर एवढा गाडाभरून जेवत होता, मग त्याची शी शी किती असेल नं?” खरंच किती योग्य प्रश्न तिला पडला होता.
अगदी तान्ह्या बाळालासुद्धा आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींचं कुतूहल वाटत असतं, तेव्हा बोलता येत नसतं म्हणून प्रश्नांची सरबत्ती आपल्यावर होत नाही. मात्र एकदा का बोलता यायला लागलं की, त्यांच्या चिवचिवत येणाऱ्या प्रश्नांना अंतच उरत नाही. खरंतर, या वयापासूनच मुलांच्या मनात विविध विषयांबद्दल असंख्य प्रश्न निर्माण होत असतात. या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा या मुलांचा प्रयत्न असतो. ज्यांची उत्तरं मिळत नाहीत, त्यासाठी ते अर्थातच आपल्या पालकांना विचारणं त्यांना महत्त्वाचं वाटतं. मात्र पालकांनाही यासाठी पुरेसा वेळ देणं किंवा त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं माहीत असणं शक्य नसतं. अशावेळी हे प्रश्न म्हणजे अनेकदा भुणभुण वाटायला लागते. या वयात असंख्य प्रश्न पडणं, ही खरंतर अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. स्वतः अभ्यास करून प्रश्नांची उत्तरं कशी मिळवायची, त्यासाठी संदर्भ कसे शोधायचे, कुठून शोधायचे हे अनेकदा मुलांना माहीत नसतं. त्यामुळे आईवडील, शिक्षक किंवा त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीला प्रश्न विचारण्याशिवाय पर्याय नसतो. नेमकी हीच गोष्ट पालकांकडून लक्षात घेतली जात नाही.
हेही वाचा >> मुलांना स्मार्ट बनवायचं आहे, पण त्यांचा स्क्रीन टाइम कसा कमी कराल? जाणून घ्या सोप्या टिप्स!
मुलांच्या मनातील विविध प्रकारचे प्रश्न हे त्यांच्यातल्या कुतुहलाचं, जिज्ञासेचं लक्षण असतं. म्हणूनच प्रश्न विचारणाऱ्या मुलांचं कौतुक करून त्यांना प्रश्न विचारायला पालकांनी प्रोत्साहन द्यायला हवं. वास्तविक कोणताही प्रश्न हा फालतू, चूक किंवा अनुपयोगी नसतो. प्रत्येक मुलाला आपल्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळवण्याची संधी आणि मार्गदर्शन मिळायला हवं. अनेकदा मुलांचा अनुभव असा असतो की, ज्या प्रश्नांची उत्तरं पालकांना स्वतःलाच माहिती नसतात, त्यांची उत्तरं देणं टाळलं जातं. तसंच सारखे सारखे प्रश्न विचारल्याबद्दल समजही दिली जाते. आम्ही जे सांगतो तेवढंच नीट करा, असा उपदेशवजा सल्लाही दिला जातो. अनेकदा मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहीत नाही, हा पालकांना वैयक्तिक अपमान वाटतो. यातून त्या प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा तो प्रश्नच कसा चुकीचा आहे, हे सांगितलं जातं किंवा सतत प्रश्न विचारल्याबद्दल या मुलांना ओरडून गप्प बसवलं जातं.
म्हणूनच पुढच्या वेळी मुलांकडून प्रश्न आला की, पालकांनी थोडासा हा विचार करण्याची गरज आहे. आपल्याला त्याचं नेमकं उत्तर सांगून आपलं ज्ञान दाखवणं जास्त महत्त्वाचं आहे की, मुलांनी उत्तरं शोधायची कशी हे समजावून सांगण्यासाठी त्यांना मदत करायची. ‘चल आपण शोधू या’, ‘करून बघूया’, ‘जमतंय का पाहू’, ‘अरे वा! हे मलाही आताच समजलं आणि तेही तुझ्यामुळे’, अशा वाक्यांनी मुलांना प्रश्नांमधून मिळणाऱ्या माहितीची, ज्ञानाची आस लागते. अधिक कुतूहलाने मुलं प्रश्न विचारतात. अगदी कणकेच्या गोळ्यापासून आपण पोळीव्यतिरिक्त अजून काय काय बनवू शकू याचा विचार करणं किंवा एखादं झाडं कसं वाढतं, नवी पानं कशी फुटतात, कळीचं फूल आणि मग फळ कसं होतं यांसारख्या निरीक्षणांमध्ये पालकांचा सहभाग मुलांचा उत्साह वाढवणारा असतो.
हेही वाचा >> परीक्षा, गुण यापलीकडेही आहे जग! पालकांनी मुलांना ‘या’ गोष्टी शिकत स्वत:त करा ‘हे’ बदल
प्रश्न विचारण्याची मुलांची शक्ती तासाला १०० अशी असू शकते, हे एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. मुलांना जेव्हा प्रश्न पडतात तेव्हा, त्यांची उत्तरं शोधण्याच्या धडपडीमुळे मेंदूच्या असंख्य पेशी उद्दीपित होतात आणि तो ज्ञान ग्रहण करायला स्वतःला सज्ज करतो. मात्र अनेकदा असं बघायला मिळतं की, जशी ती मोठी होत जातात, शाळेच्या सिस्टीममध्ये स्वतःला बसवायला लागतात, तसं मुलांचं कुतूहल कमी होत जातं. पण एक गोष्ट मात्र नक्की की, कुतूहलाचं हे बीज लहानपणी योग्य पद्धतीने जपलं गेलं असेल तर, पुढे कुठेतरी त्याला पुनश्च अंकुर फुटतो आणि बीज फुलतंच! आपले प्रश्न सोडवायला लागणारी सर्जकता नक्कीच बहरते.
हेही वाचा >> भारतात मुलींचे हक्क, अधिकारांबाबत उदासीनता! ‘तिचे’ हिंसाचार, कुपोषण, बलात्काराच्या घटनांमधून कसे होईल संरक्षण?
अर्नो पेंझियास नावाच्या खगोलशास्त्रज्ञाला नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या भाषणात सांगितलेला हा मार्मिक किस्सा! ते म्हणाले – “माझ्या या नोबेलमध्ये सगळ्यात मोठा वाटा, जेमतेम चार इयत्ता शिकलेल्या माझ्या आईचा आहे. ती माऊली घरकाम, शेती यात बुडालेली असे, पण शाळेतून घरी आल्यावर जेवतांना एक प्रश्न ती मला आवर्जून विचारत असे… आर्नो, आज तू वर्गात कुठला ‘चांगला’ प्रश्न विचारलास?” तिच्यामुळे मला अनेक प्रश्न पडणं, त्यांची उत्तरं शोधणं, कुतूहल जागृत होणं याची सवयच लागली, जी पुढं माझ्या खगोल संशोधनात अत्यंत उपयोगी पडली!”