आपल्याला नेमकं काय सलतंय ते सुरेखाला सापडत नव्हतं. तिचा प्रेमविवाह. ती शहरात वाढलेली, संभाषणचतुर, वादविवादस्पर्धा गाजवणारी. तर नवरा मूळचा गावाकडचा, अबोल. आता मोठ्या कंपनीत, जबाबदारीच्या पदावर. एका सेमिनारमध्ये ते भेटले, त्याच्या बुद्धीवर ती भाळली आणि तिच्या उत्साही बोलण्यावर तोही. लग्नाला आता दहा वर्षं झालेली. नवरा घरात थोरला. त्यामुळे आई-वडिलांची जबाबदारी, बहिणीच्या सासरच्यांच्या मागण्या त्याच्याकडेच यायच्या. सुरेखा प्रेमळ, कर्तव्यदक्ष होती. तिची हरकत जबाबदारीला नव्हती. पण एकमेकांत गुंतलेले नातेसंबंध तिला ‘घोळ’ वाटायचे.
‘किती काळ बहिणीच्या सासरच्यांची दादागिरी सहन करायची? त्यांच्या मागण्यांना ‘नाही’ म्हणून एकदा बहिणीला आपल्या घरी आणू या, चट जागेवर येतील तिच्या सासरची मंडळी, सोन्याची अंडी देणारी कोंबडी सोडणार नाहीत ते.” अशी तिची मतं आणि तडकफडक उपाय घरच्यांना रुचायचे नाहीत. जगराहाटीला घाबरून ते बहुतेकदा त्यांच्या पद्धतीने परस्पर निर्णय घ्यायचे. पुढे त्यातून काहीतरी नवी समस्या उगवायची. तेव्हा सुरेखाची चिडचिड सुरू व्हायची. गेल्या दहा वर्षांतला इतिहास निघायचा. ‘तुम्ही मला न सांगता खूप गोष्टी ठरवता’ हा तिचा आरोप आणि ‘आम्ही मुद्दाम काहीच लपवत नाही, तू कायम चुकीचे अर्थ लावतेस,’ असं त्यांचं म्हणणं.
आणखी वाचा : मूत्रविसर्जनाबाबत खास स्त्रियांसाठीच्या सहा चांगल्या सवयी..
सुरेखा घुसमटायची. “घरात मोकळं वाटत नाही गं, सतत एक दडपण जाणवतं.” ती सखीकडे मन मोकळं करायची. “नेमकं काय घडायला हवंय तुला, म्हणजे शांत होशील? वाद थांबतील?” सखी विचारायची, पण सुरेखाला नेमकं सांगता यायचं नाही. एके दिवशी भांडताना, संतापून नवरा म्हणा ला, “हो, लपवतो आम्ही गोष्टी तुझ्यापासून, कारण तुझ्या फटकळपणाची भीती वाटते. तुझ्या रोकठोक वागण्याने नातलग दुखावतात, ते नंतर आम्हालाच निस्तरावं लागतं.” सुरेखा एकदम गप्पच झाली. सुरेखाला अचानक शांत झालेली पाहून सखीनं नवलाने विचारलंच. सुरेखा म्हणाली, “नणंदेच्या सासरच्यांची देणीघेणी, गावाकडची मिटवामिटवी नवऱ्याने मला न सांगता केली, तरी मला अंदाज यायचाच. विचारायला गेल्यावर, ‘तसं नाहीच, तुलाच तसं वाटतं’ असं म्हणून वेगळंच काहीतरी सांगायचा. फाटे फुटून, वाद होऊन बोलणंच थांबायचं. “मी इतकी कल्पनेत जगते? कायम चुकीचेच अर्थ लावते? असं कसं असेल?” असं वाटून गोंधळायचे. माझा प्रॉब्लेम तिथे होता. नवऱ्याने रागाच्या भरात त्या दिवशी ‘माझ्यापासून गोष्टी लपवल्या जातात’ हे मान्य केलं, तेव्हा ‘मला काय हवं होतं?’ ते नेमकं सापडलं.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : जोडिदाराच्या भावनांचीही कदर व्हावी
‘मला वेड्यात काढू नका, मी आपल्याच कल्पनेत जगणारी मूर्ख बाई नाही’, एवढाच विश्वास मला नवऱ्याकडून हवा होता. सासू-सासऱ्यांना जुन्या रूढी, मतं बदलता येत नाहीत, मुलीचा संसार तुटण्याची भीती आणि सुनेच्या अतिरेकी स्पष्टवक्तेपणाची भीतीही त्यांच्या मनात असणार. अबोल नवऱ्याला ना त्यांना बदलता येत, ना माझ्याशी मुद्देसूद वाद घालता येत. त्यामुळे सगळ्यांनाच दडपण येत असणार, हे मला समजून घेता आलं, तक्रारच संपली. मग मी स्वत:लाच प्रश्न विचारले. ‘आपली सुधारक मतंच बरोबर असण्याची जशी आपल्याला खात्री आहे, तशीच त्यांना त्यांच्या मतांची असणार ना? मग त्यांना गावाकडचे, अज्ञानी समजून, प्रत्येक लहानमोठ्या प्रसंगात स्वत:ला जोरजोराने सिद्ध करत राहायची काय गरज होती? त्यातून ते बदलले की आपण व्हिलन झालो? पण नवऱ्याशी बॉण्डिंग कमी झालं. हे लक्षात आल्यानंतर माझा फटकळपणा, ‘तुमचं कसं चुकतंय’ हा टोन आणि अट्टहास थांबलाच आपोआप. आता माझं मत मी शांत शब्दांत फक्त एकदा सांगते. त्यामुळे त्यांचाही विरोध कमी झाला. नवरा आता त्याच्या परीने मोकळेपणाने बोलतो.”
आणखी वाचा : मासिक पाळी सुसह्य करायचीय? मग या टिप्स वाचाच!
“म्हणजे नवऱ्याने रागाच्या भरात मान्य केलं नसतं, तर तू आयुष्यभर तिथेच गरगरत राहिली असतीस?” सखीनं छेडलं.
“शक्य आहे. पण, आता मला रस्ता सापडलाय. एखादी गोष्ट मनात फारच गरगरताना जाणवली, की आपल्या बाजूचे मुद्दे क्षणभर थांबवायचे, विरुद्ध बाजूने वादविवादाचे मुद्दे मांडायचे. मग स्पर्धेत दोघांपैकी प्रभावी कोण याचा निकाल ठरवण्याचा चॉइस माझ्याच हातात येतो.” सुरेखा हसत म्हणाली.
(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)
neelima.kirane1@gmail.com