आई, मीनाक्षी आणि स्नेहा गणपतीची तयारी करत होत्या. यावेळी त्यांनी घरीच डेकोरेशन करायचे ठरवले होते. मीनाक्षी आणि स्नेहाने मिळून मस्त डिझाईनसुद्धा तयार केले. आई तेवढ्यात म्हणाली, ”यावर्षीपासून तुम्ही दोघींनी हरतालिकेचा उपवास करायचा आहे. मला काहीतरी फालतू कारणं सांगू नका. चांगला नवरा कसा मिळेल मग तुम्हाला ?” ८ वर्षाच्या स्नेहाने प्रश्न केला, ”आई चांगला नवरा मिळवण्यासाठी व्रत करावं लागतं का ?” आई म्हणाली, अगं परंपरा आहे आपली. पार्वतीने शिवाला प्राप्त करण्यासाठी व्रत केलं होतं. म्हणून आपण प्रतीकात्मकरित्या हरतालिकेचा उपवास करतो.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आई आणि स्नेहाच्या या संभाषणात मीनाक्षी विचारात पडलेली. मला जर व्रत करून चांगला नवरा मिळणार असेल तर अभ्यास, नोकरी, स्वतः करण्याचे प्रयत्न याची गरज काय ? चांगला नवरा शोधण्यासाठी मी सक्षम नाही का ? आणि चांगला म्हणजे काय ? घरच्यांच्या दृष्टिकोनातून निर्व्यसनी, निरोगी, एकाच जातीतला, संपन्न घरातला मुलगा म्हणजे चांगला होय. पण, माझ्यासाठी एवढं पुरेसं आहे का ? माझ्यासाठी चांगला नवरा म्हणजे जात-धर्म याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जो चांगला आहे, स्वभावाला जो चांगला आहे, माझी स्वप्नं, माझं करिअर पूर्ण करण्यास जो साहाय्य करेल, मला योग्य-अयोग्य गोष्टींविषयी सांगेल. मला समजून घेईल किंवा समजावून सांगेन आणि मुख्य म्हणजे ज्याचं आणि माझं मन जुळेल तो चांगला नवरा असेल ना ? मग ही जबाबदारी माझी आहे. शेवटी चांगलं आणि वाईट हे आपापल्या दृष्टीवर अवलंबून आहे.

मीनाक्षीने न राहवून आईला विचारलं आई पार्वतीने असं काय व्रत केलं ? आई म्हणाली, पार्वती ही हिमालयाची कन्या. पण, तिने भगवान शंकराला वरलं होतं. पण हिमालयाला हे मान्य नव्हतं. त्याने पार्वतीसाठी दुसरा वर निवडला होता. पण, पार्वतीला शंकराशीच विवाह करायचा होता. मग ती सखीला घेऊन वनात निघून गेली. तपश्चर्या केली. केवळ झाडावरून गळून गेलेली पानं खाऊन राहिली. हे बघून शिव प्रसन्न झाला. त्याने पार्वतीला विवाहाकरिता होकार दिला. कालांतराने पार्वतीचा विवाह शंकराशी झाला. पार्वतीला जसा शिवशंकर प्राप्त झाले तसे सर्वांना मिळो, यासाठी हरतालिकेचे व्रत करतात. ही कथा भविष्यपुराणात आली आहे. पण, सती-दक्ष, पार्वती-शंकर यांच्या अनेक लोककथासुद्धा आहेत.

मीनाक्षी म्हणाली, आई चांगला वर नव्हे, तर इच्छित वर मिळवण्यासाठीच हे व्रत झालं ना ? कारण, हिमालयाने पार्वतीसाठी वेगळा वर निवडला होता, तेव्हा पार्वती तिच्या इच्छित वराविषयी ठाम राहिली. तेव्हा तर भगवान शंकर तर जटाधारी, रानावनात राहणारे, भस्म लावणारे, रौद्ररूप धारण करणारे असे होते. तरीही पार्वतीला ते आवडले. त्यांचा विवाह झाला. त्यांना देवत्व मिळालेले असल्यामुळे आपण हा विवाह ‘ग्रेट’ मानतो. पण, आई मला आवडणाऱ्या मुलाशी तू लग्न लावून देऊ शकतेस का ?”
आई यावर क्षणभर थांबली. मीनाक्षीचा प्रश्नही तसा बरोबर होता. प्रॅक्टिकल होता. आपण निवडलेला वर हा चांगला असेलच. चौकशी करून, अगदी सगळ्या चाळण्या लावून आपण मुलगा निवडू. पण तो आपल्या दृष्टीने चांगला असेल. हिमालयाने पण तेच केले. वडील या नात्याने त्याने पार्वतीसाठी सुयोग्य वर निवडला होता. पण पार्वतीने रानात राहणाऱ्या शंकराला निवडले. कारण, तिला तो चांगला वाटत होता आणि त्यांनी संसारही केला. पार्वतीला वाटणारे ‘चांगलेपण’ शंकरामध्ये होते. तसेच मीनाक्षी आणि स्नेहाचेसुद्धा होऊ शकेल. त्यांना वाटणारा चांगला नवरा वेगळा असेल.
आपण मुलीला शिकवले आहे. तिच्या पायावर उभे राहण्यास शिकवले आहे. ती नोकरी करते स्वतःची कामे स्वतः करते. घरात लहान मुलीसारखी वागत असली तरी ती आत्मनिर्भर आहे. स्वतःचे चांगले वाईट तिला कळते. मग, ती स्वतःसाठी चांगला वर निवडू शकत नाही का ? केवळ परंपरा आहे म्हणून मी तिला उपवास करायला का लावू ? तोही चांगला नवरा मिळावा यासाठी ? खरंतर चांगला, सुयोग्य वर निवडणं ही गोष्ट तिच्या आणि माझ्या हातातील आहे. निर्जळी, एकदा खाऊन असे उपवास करून मिळणारी नव्हे. असे असते तर शेजारच्या सरिता वहिनींची दारुड्या नवऱ्यामुळे संसाराची वाताहत झाली नसती. नवरा मारझोड करतो म्हणून घटस्फोट झाले नसते. असो…
आईने मीनाक्षी आणि स्नेहाला सांगितले,” बाळांनो मी तुम्हाला केवळ परंपरा सांगितली. तुम्हाला कोणी या उपवासाविषयी विचारले, तर ‘कोण हरतालिका’ असं होता नये. तुम्हीही सांगितलेला व्यावहारिक दृष्टिकोन बरोबर आहे. विविध पत्रींची ओळख व्हावी, पौराणिक कथांचा अभ्यास व्हावा तसेच गणपतीचा छान वातावरण निर्माण व्हावे, यासाठी आपण हरतालिका सणाकडे बघूया. उपवास न करता.”
यावर स्नेहा आणि मीनाक्षी खूश झाल्या… इच्छित आणि योग्य वरसंशोधन आपल्याच हातात आहे आणि त्यासाठी आईबाबांनी आपल्याला सक्षम केले आहे, याची जाणीव त्यांना झाली.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why should we do hartalika vrat is it necessary to do hartalika vrat vvk