‘‘मी एक प्राध्यापिका… समाजातल्या सुशिक्षित वर्गात माझी गणना होते. विचारी माणसांमध्ये माझी उठबस असते. काहीवेळेला त्यांच्याशी वैचारिक वाद होतात. काही विषयांच्या बाबतीत खंडण-मंडण सुरू राहते. कधीकधी यातून ताणतणावाचे प्रसंगही निर्माण होतात. पण अनेकदा याचं फारसं काही वाटत नाही. पण आपले जवळचेच लोक जेव्हा आापल्याशी एक विधवा म्हणून सणासमारंभात मला अव्हेरतात तेव्हा खूप दु:ख होते. अगदी कालचाच प्रसंग. मी माझ्या भाच्याच्या लग्नाला गेले होते. तसं रीतसर आमंत्रणच होतं मला. भाच्याच्या लग्नात छान आनंदात सहभागी व्हायचं यासाठी मी छान नटूनथटून गेले होते. पण…’’ विधवा हक्क मेळाव्यात सहभागी झालेल्या इंदू यांना ही कहाणी सांगताना हुंदका आवरता आला नाही. निमित्त होतं नाशिक इथला विधवा मेळावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी बोलताना इंदूताई म्हणाल्या की, लग्न सोहळ्यात मी सगळ्यांकडून केवळ सवाष्ण नाही म्हणून नाकारले गेले. पुजाविधीत मला सहभागी करून घेतलं गेलं नाही. तू यात सहभागी होऊ नकोस असं सांगत शकुनाच ताट माझ्या हातून काढून घेतलं. का? तर माझा नवरा हयात नाही. मी विधवा आहे म्हणून. पण यात माझी काय चूक? तो गेला, पण त्याच्या नंतरही आमच्यातल्या नात्याची वीण घट्ट आहे. नवऱ्यामुळे जोडल्या गेलेल्या नातेवाईकांच्या मदतीला, त्यांच्या हाकेला ओ देते. मग नेमंक माझं काय चुकंल? हा इंदू यांनी विचारलेला प्रश्न उपस्थित सर्वांनाच पडला होता.

आणखी वाचा-सरोगसीद्वारे आई झालेल्या महिलांना प्रसूती रजेचा अधिकार आहे का? न्यायालयाचा नेमका निर्णय काय?

मायाची सभोवतालची परिस्थितीही फारशी वेगळी नव्हती. त्यांचा नवरा गेला आणि सारं चित्रच बदललं. माझी ताई, माझी वहिनी… असं लाडाने हाक मारणाऱ्यांनी आपलं खरं रूप दाखवलं. वडिलोपार्जित मालमत्तेतून बेदखल करताना माझ्या पदराला हात लावण्याची हिंमत केली. हे असते तर हा दिवस नसता दिसला… असं सांगत मायाताईंनी नकळत डोळ्यांना पदर लावला, पण दुसऱ्या क्षणी त्यांनी स्वत:ला सावरलं. इतक्यात समोरून सत्तरी पार केलेल्या एक आजी उठून उभ्या राहिल्या आणि आपल्या खड्या आवाजात म्हणाल्या, ‘‘असं किती दिवस तुम्ही रडत बसणार हाय? सरकार किंवा आपली माणसं आपल्याला कितीशी मदत करणार? शेवटी आपली लढाई आपल्याला लढावी लागणार. समोरचा कसा भी असू दे डोळ्यात रग आणि मनगटात दम हवा… वाकडी नजर दिसली की डोक्यात दगड हाणायलाच पायजे, तिथे रडून नाय चालायचं.’’

या विधवा मेळाव्यात विधवा म्हणून आपल्याला आलेल्या अनुभवांवर प्रत्येक महिला आपआपल्या परीने व्यक्त होत असताना मायाताईंनी दिलेला सल्ला ऐकताना अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्या समोर माईक न धरता आपल्या खड्या आवाजात बोलत होत्या.

आणखी वाचा-व्हिक्टोरिया स्टार्मर आहेत तरी कोण? ज्यांना ब्रिटनची फर्स्ट लेडी बनण्याचा मिळणार मान; वाचा सविस्तर

‘‘तो माझ्या सोबत असा वागला… हे नाय म्हणून मला लोक असा त्रास देतात. आज कुंकवाचा धनी असता तर… अरं किती रडणार त्याच्या नावानं. तो गेला भी त्याच्या वाटेनं. तुम्ही हात ना तुमच्या रस्त्यावर… मग कोण काय त्रास देतं… तो असता तर हे तुणतुण किती दिस वाजणार? म्या म्हणते किती दिस या कुबड्यांचा आधार घ्यायचा… तुमचं स्त्री-पुरूष समानता मला नाही कळत. पण मला एक माहिती. निसर्गानं, देवानं स्त्री म्हणून खूप काही दिलं. मुलगी, बहीण, बायको, वहिनी, नणंद, मामी, काकु, आजी असं एक ना अनेक नाती न मागता मिळतात. वेळोवेळी ही नाती त्याची किंमत भी वसुल करतात. कधी कष्टानं तर कधी पैशानं. साऱ्यांची मनं जपत असताना आपण मात्र कोलमडत जातो. खरं सांगा यामध्ये ज्याच्या नावाने तुम्ही गळा काढत आहात तो कुठं सोबत असतो. तो असतो पारावर चकाट्या पिटत. नाही तर ठेल्यावर. आपली लढाई हाय आपणच लढावी लागणार. तिथं कुणीबी मदत नाय करणार. सरकारच्या योजना किंवा कोणतीही मदत तुमच्या कामास नाही येणार. येईल ती तुमची जिद्द, परिस्थितीशी दोन हात करण्याची तुमची धमक. एकदा स्विकारलं ना की परिस्थिती हाय ही अशी हाय. यातून पुढं जायचं तर पाहा तुमची वाट कोण आडवतं. पोरींना आसवं गाळण्यापेक्षा स्वत:ला ओळखा असं त्या सांगत असताना अनेकींचे डोळे पाणावले, पण जिद्दीने पुढे जायचे या उमेदीने…

या सत्रानंतर अनेकींनी पापड, लोणचे, मसाले, कपडे ही चौकट ओलांडत नवं काही शिकता येईल का याची चाचपणी सुरू केली. महिलांच्या या धडपडीला दिशा मिळावी, त्यांना मानसिक स्वास्थ्य मिळावं यासाठी लवकरच नाशिकमध्ये प्रशिक्षण केंद्र, समुपदेशन केंद्र सुरू होणार आहे.