Agra Couple Goes For Divorce : पती-पत्नीमधील वादाची अनेक विचित्र कारणे तुम्ही अनेकदा ऐकली असतील. पण, जे कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते तुम्ही याआधी कधीच ऐकले नसेल. उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एका साडीमुळे पती-पत्नीचे नाते घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोघांमध्ये साडीवरून बराच वाद झाला. यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, पत्नीने रागाने सासरचे घर सोडले आहे आणि तिच्या माहेरच्या घरी जाऊन राहू लागली आहे. आता हे प्रकरण समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचले आहे. जिथे गेल्या रविवारी दोघांचे समुपदेशन करण्यात आले.

साडी ठरली घटस्फोटाचे कारण

मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा जिल्ह्यातील तरुणीचे हाथरस जिल्ह्यातील एका तरुणाशी आठ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. हिंदू रितीरिवाजानुसार या दोघांचे मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले. पण, साडीवरून पती अनेकदा पत्नीशी वाद घालायचा. दरम्यान, हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पोहोचताच पतीने सांगितले की, त्याचे पत्नीवर अपार प्रेम आहे. पत्नीने आपल्या आवडीची साडी नेसावी अशी त्याची इच्छा असायची. कारण त्याच्या आवडीची साडी पत्नीने नेसल्याचे पाहून त्याला आनंद व्हायचा.

यावर त्याच्या पत्नीने सांगितले की, अनेकदा पतीच्या आवडीची साडी ती नेसायची. पण, जेव्हा ती स्वेच्छेने एखादी साडी नेसली की तिचा नवरा चिडायचा आणि वाद घालायचा. साडीवरून दोघांमध्ये एवढा तणाव निर्माण झाला होता की, पत्नीने सासर सोडले आणि गेल्या दोन महिन्यांपासून ती आई-वडिलांच्या घरी राहू लागली.

यानंतर पत्नीने या संपूर्ण प्रकरणी पतीविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनी हे संपूर्ण प्रकरण आता कौटुंबिक समुपदेशन केंद्रात वर्ग केले आहे. हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्रात पोहोचल्यानंतर डॉ. अमित गौड यांनी दोघांचे समुपदेशन केले आहे. यावर डॉ. अमित गौड म्हणाले की, हे एक विचित्र प्रकरण आहे, पण दोघांमध्ये तडजोड होऊ शकते. यात दोघांमधील सुस्थिती जाणून घेण्यासाठी पुढील तारीख देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wife does not wear saree of my choice husband created ruckus matter reached police station couple goes for divorce chdc sjr