अर्चना मुळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन वर्षांपूर्वी लग्न झालेली दीप्ती शहराजवळच्या एका खेड्यात राहात होती. ती सहा महिन्यांची प्रेग्नंट होती. तिची तपासणी गावातल्याच एका डाॅक्टरांकडे सुरू होती. त्या डाॅक्टरांनी तिला सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफीची सोय गावात नसल्याने ती आणि तिचा नवरा विजय शहरात गेले. तिथे त्यांनी सोनोग्राफी केली. रिपोर्ट घेऊन गावातील डाॅक्टरांकडे गेले. डाॅक्टरांनी रिपोर्ट बघितला आणि ते काळजीत पडले. म्हणाले, “काहीतरी गडबड आहे. मी सुरुवातीपासून दीप्तीचा गर्भ नीट तपासतोय. सगळं ठीक आहे. पण या रिपोर्टनुसार बाळाची वाढ हवी तशी दिसत नाही.”

दीप्ती आणि विजय दोघेही घाबरले. अचानक बाळाच्या वाढीबद्दल कळल्याने दीप्ती तर रडायलाच लागली. विजयलाही धक्का बसला होता. दोघांची अवस्था बघून डाॅक्टर म्हणाले, “दीप्तीताई, तुम्हाला थोडा त्रास होईल. म्हणजे परत शहरात जावं लागेल. परत एकदा सोनोग्राफी करावी लागेल. आपण या वेळी दुसरीकडून सोनोग्राफी करून घेऊ. काळजी करू नका. मला खात्री आहे बाळाची वाढ चांगलीच आहे. तरी रिस्क नको म्हणून आपण काळजी घेतोय.”

हेही वाचा… ग्राहकराणी : पेट्रोलपंपावर टायर्समधे हवा भरणं नि:शुल्कच

ते दोघे पुन्हा शहरात गेले. त्यांनी दुसरीकडे सोनोग्राफी केली. या वेळच्या रिपोर्टमध्ये बाळाची वाढ व्यवस्थित दिसत होती. डाॅक्टरांनी दोघांना बाळ चांगलं असल्याची खात्री दिली. परंतु तोपर्यंत दीप्ती, विजय आणि तिच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास झाला होता. तो काळ अस्वस्थता, भीती, ताण यातच गेला. त्यामुळे विजय पहिल्या सोनोग्राफी सेंटरमधे गेला. तिथे त्याने रिपोर्टबद्दल सांगितलं आणि सोनोग्राफीचे पैसे परत मागितले. त्यावर तिथले कर्मचारी म्हणाले, “पेशंटला घेऊन या. परत सोनोग्राफी करतो, पण पैसे मिळणार नाहीत.” विजयच्या मागणीचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर दीप्तीने त्या सेंटरमध्ये फोन केला. ती म्हणाली, “तुमच्या रिपोर्टमुळे आम्हाला आर्थिक फटका तर बसलाच, पण प्रचंड मानसिक त्रास झालाय. तुम्ही असा चुकीचा रिपोर्ट दिलाच कसा. तुम्ही परत त्याच पैशांत सोनोग्राफी करायला तयार आहात याचा अर्थ तुम्हाला तुमची चूक मान्य आहे. तर मग पैसे का नाही परत देत आहात?”

“मॅडम, आम्ही पैसे देऊ शकणार नाही. तुम्ही डाॅक्टरांना भेटा. त्यांच्याशी बोला. ते म्हणाले तर पैसे परत देऊ.” त्यांनी डाॅक्टरांचा वैयक्तिक नंबर दिला. दीप्तीने त्या नंबरवर कमीतकमी चार वेळा फोन केला त्यांनी फोन घेतला नाही. तेव्हा मात्र दीप्ती वैतागली. तिने त्या सोनोग्राफी सेंटरला मेल केला. त्यात लिहिलं, ‘आम्हाला झालेला मानसिक त्रास तुम्हाला कदाचित कळणार नाही. तसं असतं तर तुम्ही आमचे पैसे परत केले असते. हा मेल वाचून पाॅझिटिव्ह रिप्लाय कराल अशी अपेक्षा करते.’ या मेलला उत्तर आलंच नाही. आपल्यावर झालेला हा अन्याय आहे. तो का सहन करायचा? असा तिला प्रश्न पडला होता.

हेही वाचा… ग्राहकराणी : हॉटेलमधल्या वॉशरुमचा नि:शुल्क वापर

तिनं या अन्यायाविरोधात कोर्टात न्याय मागायचं ठरवलं. तिच्या नात्यातील एक बहीण वकील होती. तिला तिनं फोन केला आणि सगळी हकिगत सांगितली. तेव्हा बहिणीने ग्राहक न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. तिने तिला बरीच माहिती सांगितली. ती अशी होती, की तुझ्याजवळ सोनोग्राफीचा रिपोर्ट चुकीचा आहे हे सिद्ध करणारी योग्य कागदपत्रं हवीत. दोन्ही सोनोग्राफी रिपोर्ट्स, डाॅक्टरांनी दिलेला लिखित सल्ला, पैसे भरल्याचं बिल, सोनोग्राफीची तारीख, वेळ, ज्यांच्या विरोधात तक्रार नोंदवायची आहे त्यांचं नाव, पत्ता अचूक लिहायला हवा. अर्ज रूपात न्याय विषय योग्य शब्दात मांडायला हवा. जिल्हास्तरीय ग्राहक मंचाकडे आपण तक्रार करणार असल्यामुळे तक्रारीच्या तीन प्रती आपल्याकडे असाव्यात.

ग्राहक न्यायालयाकडे तक्रार मेल केल्यानंतरही तक्रार नोंदीचे कागदपत्र पोस्टानेही पाठवावे लागतात, जेणेकरून न्यायालयाच्या नजरेतून चुकूनही आपली तक्रार सुटू नये. मी तुला सगळी मदत करेन. न्यायालयात जाण्यापूर्वी तू त्या सोनोग्राफी सेंटरला वरील सर्व माहितीसह एक मेल पाठव. त्याची काॅपी मलाही पाठव. मला तू त्यांचा नंबरही पाठव. मी एकदा त्यांच्याशी बोलते. आपण ग्राहक न्यायालयात तक्रार करण्यापूर्वी एकदा त्यांना त्याची कल्पना द्यायला हवी. कदाचित त्यानंतर ते पैसे द्यायला तयारही होतील.

हेही वाचा… ग्राहकराणी : दुकानदारांनी विकलेला माल परत घेतला पाहिजे..

वकील बहिणीने डाॅक्टरांना फोन केला. तो रिसिव्ह केला गेला नाही. तिने सोनोग्राफी सेंटरला मेल केला. त्यात ग्राहक न्यायालयात जाणार असल्याचे कळवले, ‘न्यायालयात जाण्यापूर्वी तुमच्याशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे. विचार करा. नाहीतर न्यायालयाच्या प्रक्रियेत अडकून वेळ, पैसा वाया जाणार. शिवाय तुमच्या स्टाफशी वेळोवेळी झालेले फोन रेकाॅर्ड्ससुद्धा आमच्याकडे आहेत. सेंटरची चूक सिद्ध करण्यासाठी भक्कम पुरावे दीप्तीकडे आहेत. त्यामुळे आम्हाला न्याय मिळणार याची खात्री आहे.’

या पत्राचा योग्य तो उपयोग झाला आणि ते सोनोग्राफी सेंटर दीप्तीचे पैसे परत देण्यासाठी तयार झाले. विजयला सेंटरमधून फोन गेला. त्याला बोलवून घेतलं. सेंटरने चूक मान्य केली. डाॅक्टर म्हणाले, “पुढच्या सोनोग्राफीला माझ्याकडेच या. मी स्वत: लक्ष घालून रिपोर्ट देईन. इथून पुढे अशी चूक होणार नाही.” अशी खात्री दिली. दीप्ती आणि विजयला झालेल्या मानसिक त्रासाची भरपाई मिळाली. ग्राहक न्यायालयात जाण्यापूर्वीच अन्यायाविरुद्धचा एक लढा दीप्ती आणि विजयने जिंकला होता.

archanamulay5@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will customer get compensation if the report result is wrong asj
Show comments