विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी एका भाषणाच्या वेळी महिलांना शस्त्रे द्या, तरच या सुरक्षित होतील, असे म्हटले. पण खरंच शस्त्रे दिल्यामुळे महिला सुरक्षित होऊ शकतात का? महिलांना शस्त्रे दिल्यामुळे सामाजिक प्रश्न निर्माण होतीलच, कायदा-सुव्यवस्था यांच्यावर शंका उपस्थित होईल. मुख्य गोष्ट म्हणजे महिलांना शस्त्र दिल्यामुळे बलात्कार, छेडछाड हे प्रश्न सुटणार आहेत का? आपल्याला प्रश्नांच्या मुळांवर काम करण्याची गरज आहे. मग महिलांना शस्त्र देण्याऐवजी अजून काही पर्याय आहेत का ? याच्यावर विचार करणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या सुरक्षितेसंदर्भात बोलताना ‘महिलांना शस्त्रे दिली पाहिजेत’ असे सांगितले. पण, ही शस्त्रे खरेच उपयोगी आहेत का? निर्भया बलात्कार प्रकरणानंतर मुलींनी-महिलांनी सेफ्टीपिन, मिरची पावडर स्प्रे, लहान चाकू, असे ठेवण्यास सुरुवात केली. परंतु, २००८ पासून आतापर्यंतची आकडेवारी बघता बलात्कार, जबरदस्ती, अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. वर्षभराच्या मुलीपासून आजीच्या वयाच्या महिलांवर बलात्कार होत आहेत. शाळा, महाविद्यालये, कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे अगदी घरातसुद्धा नातेवाईकांकडून महिला अत्याचाराच्या बळी पडत आहेत. त्यांच्या असाहाय्यतेचा फायदा घेऊन किंवा स्वतःची शारीरिक भूक शमवण्यासाठी या महिलांचा बळी जातो. यामध्ये खिशात ठेवलेले किंवा पर्स मध्ये असणारे शस्त्र किती कामाला येईल, हा प्रश्न आहे. तेच शस्त्र तिच्यावरसुद्धा उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा : विश्लेषण : बलात्काराची प्रकरणे का वाढत आहेत? बलात्काराची मानसिकता आणि ‘कॉपीकॅट क्राईम’ म्हणजे काय ?

पुरुषांची मानसिकता बदलणे हे या प्रश्नाच्या मुळावर काम करणे आहे. इंटरनेटवर सहज उपलब्ध होणारा मजकुर, मुलींकडे उपभोगाचे साधन म्हणून बघणे, अशा अनेक गोष्टींमुळे बलात्काराच्या घटना वाढतात. ‘कॉपीकॅट क्राईम’चे प्रमाण यामुळेच वाढत आहे. म्हणजे एकसारख्या गुन्ह्यांसारखे बाकीचे गुन्हे घडतात. कायद्याचा धाक कोणाला राहिलेला नाही. समाज माध्यमे तसेच इतर माध्यमांमधून शारीरिक संबंध आणि स्त्रियांविषयी चुकीची प्रतिमा निर्माण केली गेली. शालेय वयातच मुलांना शारीरिक संबंधांविषयी आकर्षण वाटू लागते. त्यात ते वाईट मार्गाला जाण्याची शक्यता असते. शालेय वयातच चुकीच्या सवयी निर्माण झाल्या तर मोठेपणी त्याचे रूपांतर मोठ्या गुन्ह्यांमध्ये होऊ शकते. त्यामुळे लहान वयातच मुलांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पुरुषांची मानसिकता बदलली तर मोठ्या प्रमाणावर हा प्रश्न सुटू शकतो.

आता प्रश्न येतो की, पुरुषांची मानसिकता बदलेल किंवा नाही, हा पुढील मुद्दा. पण महिला सक्षमीकरणाचे काय? आज देशात अनेक महिला, सुशिक्षित महिला पण नवऱ्याला, घरातील पुरुषांना विचारून निर्णय घेतात. त्यांना स्वतःचे विचारस्वातंत्र्य नसते. अशा महिला खरेच शस्त्र वापरू शकतील का? नारीशक्ती किंवा स्त्रीमधील कालीमातेचे रूप हे नवरात्री किंवा वुमन्स डे पुरते मर्यादित राहते. हे रौद्ररूप पुरुषांना दिसले, तर ते खरेच हात लावण्याची हिम्मत करतील का? दोन हात, दोन पाय ही मुख्य शस्त्रे स्त्रियांकडे आहेत. ती सक्षम करणे, शारीरिक आणि मानसिकरित्या सक्षम होणे, अत्यावश्यक आहे. दोन कानाखाली मारण्याची ताकद महिलांमध्ये असायला हवी. कराटे, किंवा अन्य स्वसंरक्षण प्रकार सर्व महिलांनी शिकणे अत्यावश्यक आहे. स्प्रे किंवा पिनसारख्या वस्तू उपयोगी पडू शकतात यात शंका नाही, परंतु, ते बॅग मधून काढण्याच्या वेळेत तुमच्यावर हल्ला होण्याची शक्यता असते. आजवर झालेल्या किती अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये हे स्प्रे महिलांच्या कामी आले हा प्रश्नच आहे.

महिलांकडे जर शस्त्र दिले तर त्याचा सदुपयोग होईल, याची खात्री आहे का? कोणत्याही चांगल्या गोष्टीचा दुधारी वापर केला जातो. कदाचित या शस्त्राच्या वापरामुळे कायदा-सुव्यवस्था यावर प्रश्न निर्माण होऊ शकतो. कदाचित पुरुषांवरती हल्ले होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शस्त्र देण्यापेक्षा महिलांना सक्षम करणे आवश्यक आहे.

मुळात जन्मजात कोणीही गुन्हेगार नसतो. समाज त्या व्यक्तीला घडवत असतो. कुटुंबाकडूनही होणारे संस्कार महत्त्वाचे ठरत असतात. समाज माध्यमे किंवा अन्य इंटरनेटवरील संकेतस्थळांमुळे विकृतीला पोषक असा मजकूर मिळतो. ‘आपण एक गुन्हा केला तर काय झालं’ ही मानसिकता यामुळे निर्माण होते. गुन्ह्याशी संबंधित पर्याय, अंमलबजावणी, पळवाटा हे समाजमाध्यमांवर उपलब्ध असते. त्याचाच आधार घेत विकृतीकडे पुरुष झुकतात. ‘बलात्कारानंतर खून’ अशी आता घटनांची पुनरावृत्ती झालेली दिसते. यालाही एकप्रकारे कारण दृक-श्राव्य माध्यमे, समाजमाध्यमे आहेत. व्यक्ती एखादी घटना या माध्यमांवर बघते. पुरावे नष्ट करण्याचा मार्ग म्हणून खून हा पर्याय त्यांना दिसतो. यातून एकाच पॅटर्नच्या गुन्ह्यांची निर्मिती होते.
बलात्कार रोखण्यासाठी महिलांची सक्षमताही तेवढीच आवश्यक आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणे, प्रतिकारक्षमता या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सर्व स्त्रिया सक्षम होण्यासाठी आधी सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. बलात्कार थांबवण्यासाठी प्रबळ जनजागृतीची गरज आहे. कारण, कायद्यांनी बलात्कार थांबणार नाहीत. बलात्कार हे निरोगी मानसिकता निर्माण झाली तर थांबू शकतात, असे डॉ. शुभांगी पारकर यांनी मत मांडले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या योगिता साळवी या महिलांच्या सक्षमीकरणाविषयी म्हणतात की, ”मुली आणि मुलींचे पालक यांच्याशी चर्चा करणे अत्यावश्यक आहे. तसेच मुलगे आणि मुलग्यांचे पालक यांच्याशी संवाद आवश्यक आहे. कारण, मुली आणि मुलगा घडत असताना त्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मुलीला सक्षम करण्याची आवश्यकता आहे, हे पालकांना पटले की, ते मुलीला प्रशिक्षण देऊ शकतात. कारण, अनेक गोष्टींची सुरुवात ही घरातून होत असते. मुलगी आणि मुलगा या भेदांपेक्षा त्यांच्यावर अपत्य म्हणून चांगले संस्कार होणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.
एकंदरीत महिलांना शस्त्र देण्यापेक्षा त्यांना भावनिक आणि शारीरिक ताकद देणे, सक्षम करणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will giving weapons to women solve the problem or increase it vvk
Show comments