कधीही बरा न होणारा असा फुफ्फुसाचा कर्करोग असतानादेखील ‘चॅरिटी’ म्हणून एका महिलेने तब्ब्ल पाच किलोमीटर पोहून फंड उभारण्यास हातभार लावला आहे. इतकेच नाही, तर “मला हे पुन्हा करायला नक्कीच आवडेल”, असेही ती महिला म्हणत असल्याचे बीबीसीच्या एका लेखावरून समजते. ‘ज्युली डॉटी’ असे या महिलेचे नाव असून, ती वेस्टर्न-सुपर-मेरे येथील रहिवासी आहे. ज्युलीने युके स्वीमथोन [Swimathon] मध्ये भाग घेऊन कॅन्सर रिसर्च युके आणि मेरी क्युअरसाठी तब्ब्ल पाच हजार पौंड म्हणजे अंदाजे ५२ लाख ११ हजार रुपये जमा केले.

६२ वर्षीय ज्युलीला २०२२ साली चौथ्या स्टेजमध्ये असलेल्या कर्करोगाचे निदान झाले. मात्र, सुदैवाने केवळ इम्युनोथेरपी उपचाराने तो कर्करोग स्थिर राहू शकला. “देव करो आणि माझी तब्येत आहे तशी राहो किंवा ती सुधारू दे. मग, मला हे [पोहणे] पुन्हा करायला फार आवडेल”, असे ज्युली म्हणते. खरंतर आठवड्यातून तीन दिवस २.५ किलोमीटर पोहणाऱ्या ज्युलीला स्वतःला ‘आव्हान’ करायचे होते, म्हणून ती हटन मूर लेझर सेंटर येथे पोहण्यासाठी आली होती.

हेही वाचा : कोण होती पहिली भारतीय ‘स्टंटवूमन?’ का म्हटले जायचे तिला ‘हंटरवाली’? जाणून घ्या ही माहिती

युके स्वीमथोन २०२४ हे संपूर्ण देशात चारशे ठिकाणांवर २६ ते २८ एप्रिलदरम्यान भरवण्यात आले होते. यावर्षी जवळपास १० हजार नागरिकांनी यात सहभाग घेतला असून, तब्बल १० लाख पौंडपेक्षाही अधिक फंड दोन चॅरिटींसाठी उभारण्यात आला आहे.

ज्युलीने तिच्या ‘जस्टगिव्हिंग’ नावाच्या पेजवर लिहिताना म्हटले की, “जेव्हा माझे निदान झाले, त्या वेळेस मी प्रचंड अस्वस्थ होते. मी इथे येईन असे मला अजिबात वाटले नव्हते. त्याहीपेक्षा मी दोन तासात पाच किलोमीटर पोहण्यास सक्षम असेन हेच माझ्यासाठी अविश्वसनीय होते.

ज्युलीला असणाऱ्या कर्करोगावर सुदैवाने केमोथेरपीऐवजी इम्युनोथेरपीने उपचार होऊ शकत होते. केमोथेरपी म्हणजे अत्यंत क्रूर पद्धत असे ज्युली म्हणते. तिच्या बाबतीत इम्युनोथेरपीचा इलाज कर्करोग पूर्णपणे बरा करू शकत नसला, तरीही तो स्थिर ठेवण्याचे वा काही प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त होता.

“धोकादायक दुष्परिणामांमुळे सप्टेंबर २०२२ पासून मी कोणतेही उपचार घेत नसले, तरीही त्याचा प्रभाव अजूनही काम करतो आहे”, असे ज्युली म्हणते.

ज्युलीला मिळणारी इम्युनोथेरपी ही २०१६ पर्यंत केवळ अमेरिकेत मान्य होती. मात्र, काही वर्षांनंतर त्याच्या वापरावर युकेमध्येही मंजुरी देण्यात आली होती. “त्यामुळे संशोधनासाठी, सतत शोधल्या जाणाऱ्या नवनवीन गोष्टींसाठी अशा निधीची फार आवश्यकता असते”, असे ती म्हणते.

ज्युली पोहण्यासाठी जाण्याआधी शुक्रवारी तिला, ‘त्वचेच्या कर्करोगासाठी, असा कर्करोग बरा करण्याच्या हेतूने नवीन चाचण्या झाल्या असल्याची बातमी समजली. या बातमीने ज्युलीला अधिक प्रोत्साहित केले. “पोहण्याच्या आदल्या दिवशी अशी बातमी मिळण्याने मला अधिक आनंद झाला”, असे ती म्हणते.

हेही वाचा : तब्ब्ल ‘एक कोटी’ रुपयांच्या नोकरीला नकार देऊन, स्वतः उभारला करोडोंचा स्टार्टअप! कोण आहे ‘ती’ जाणून घ्या…

एक तास ३८ मिनिटे आणि ५७ सेकंदात ज्युलीने पाच किलोमीटर अंतर पोहून ५३४ जलतरणपटूंच्या शर्यतीत १३३ वे स्थान मिळवले. कुणीतरी ज्युलीच्या हातात २० पौंडची नोट दिली आणि तिने ५००० पौंड म्हणजेच ५२ लाख ११ हजार रुपयांचे [अंदाजे] लक्ष पूर्ण केले.

“जस्टगिव्हिंगमधील ज्युलीच्या या आश्चर्यकारक कथेने आम्ही पचंड प्रभावित झालो आहोत”, असे जस्टगिव्हिंगचे अध्यक्ष आणि जनरल मॅनेजर पास्केल हार्वी
म्हणतात. “एवढ्या अवघड प्रसंगातून जात असतानादेखील तिने अतिशय निःस्वार्थपणे इतर लोकांसाठी प्रचंड मोठ्या संख्येने गोळा केलेल्या निधीतून ज्युलीचे ध्येय आणि चिकाटी अगदी स्पष्टपणे दिसून येते.”

“आमच्या स्वीमथोनमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आम्हाला प्रचंड कौतुक आणि अभिमान आहे आणि ज्युलीने जे काम करून दाखवले आहे, ती कामगिरी खरंच अविश्वसनीय आहे”, असे हटन मूर लेझर सेंटरच्या टीमने म्हटले आहे.

ज्युलीने या सर्व स्पर्धेनंतर, कार्यक्रमानंतर तिच्या जस्टगिव्हिंग पेजवर लिहिताना म्हटले की, “तुम्ही सर्वांनी पाठवलेल्या सुंदर मेसेजने आणि तुमच्या प्रेमाने मी अक्षरशः भारावून गेलेले आहे; अगदी खरे सांगायचे झाले तर शेवटचा टप्पा माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होता, मात्र तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल खूप खूप धन्यवाद.”