Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येत राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. बहुप्रतिक्षित अशा या सोहळ्यासाठी देशभरातील अनेक प्रतिष्ठित आणि नामवंत लोकांना आमंत्रणं देण्यात आली आहेत. छत्तीसगडमधील एका सामान्य महिलेलाही अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकासाठी निमंत्रण मिळाले आहे. आपल्या वडिलांच्या जागेवर शवविच्छेदनाचं कार्य करणाऱ्या या महिलेला एवढं मानाचं आमंत्रण आल्याने ती भावूक झाली. “देशातील अनेक प्रतिष्ठितांना हे आमंत्रण आलेलं नसताना मला हे आमंत्रण आल्याने मी प्रचंड खूश आहे”, असं आमंत्रण मिळालेल्या संतोषी दुर्गा म्हणाल्या.
उत्तर बस्तर कांकेर जिल्ह्यातील नरहरपूर जिल्हा पंचायतीच्या भगतसिंग वॉर्ड क्रमांक ५ मध्ये संतोषी दुर्गा (३५) ही महिला राहते. २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीच्या अभिषेक कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रण मिळाले आहे. हे आमंत्रण पाहून संतोषी इतक्या भारावून गेल्या की त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. शवागरात छोटंसं काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या कामाला एवढा मोठा सन्मान मिळाल्याने संतोषी दुर्गा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. “भगवान श्रीरामांनी मला स्वतःहून अयोध्येला बोलावले आहे”, असंही संतोषी दुर्गा म्हणाल्या. संतोषी दुर्गा यांच्या कुटुंबात त्यांचे पती रवींद्र दुर्गेसह सहा सदस्य आहेत. संतोषी दुर्गा यांना अभिषेक, योगेश्वरी आणि बिंदू सिंदूर अशी तीन मुले आहेत.
हेही वाचा >> परिस्थितीला न डगमगता बांधकाम कामगाराची लेक ‘एस अस्वथी’ झाली IAS, वाचा प्रेरणादायी गोष्ट
…अन् संतोषी दुर्गा शवविच्छेदन करू लागल्या
संतोषी दुर्गा यांचे वडील नरहरपूर येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन सहाय्यक म्हणून काम करायचे. परंतु शवविच्छेदन करताना त्यांना दारूचं व्यसन जडलं. या व्यसनाधीनतेमुळे त्यांना त्यांची नोकरी टिकवता आली नाही. परंतु, घर चालवण्यासाठी कोणीतरी नोकरी करणं गरजेचं होतं. संतोषी दुर्गा यांना पाच बहिणी आहेत. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह आणि त्यांच्या लग्नाची काळजी लागून होती. त्यामुळे वडिलांची शवविच्छेदनाची नोकरी संतोषी दुर्गा यांनी पत्कारली. दारू न पिता शवविच्छेदन करण्याच्या अटीवर त्यांनी या कार्याला सुरुवात केली.
हजारोंहून अधिक मृतदेहांचं शवविच्छेदन
संतोषी दुर्गा यांनी २००४ साली पहिलं शवविच्छेदन केलं. या पहिल्या शवविच्छेदनात त्यांनी खूप जुना असलेला आणि कुजलेल्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं होतं. आजपर्यंत त्यांनी हजारांहून अधिक शवविच्छेदन केले आहेत. त्यांचं हे काम पाहून त्यांच्या वडिलांनी कालांतराने दारू सोडली. परंतु, काही वर्षांनी त्यांच्या वडिलांचं निधन झालं, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
हेही वाचा >> कोण आहे मल्लिका श्रीनिवासन? त्यांना भारताची ‘Tractor Queen’ का म्हणतात? जाणून घ्या महिला उद्योजिकेची गोष्ट
मानधन तत्त्वावर करतात काम
संतोषी आता नरहरपूर रुग्णालयात जीवन दीप योजनेंतर्गंत २६०० रुपयांच्या मानधनावर शवविच्छेदन सहाय्यक म्हणून काम करतात. मला आमंत्रण मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. पूर्वजन्मात काही सत्कर्म झाले असावेत, ज्याच्या परिणामी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्याचे भाग्य प्राप्त होत आहे. भेट दिल्यानंतर परिसरातील लोकांच्या समृद्धी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करणार आहे, अशी प्रतिक्रया संतोषी दुर्गा यांनी दिल्याचं वृत्त नवभारतच टाईम्सने दिलं आहे.
चिंधी गोळा करणाऱ्या महिलेलाही मिळालं आमंत्रण
बिदुला बाई देवार या गरीबीबंद जिल्ह्यातील एका चिंध्या गोळा करणाऱ्या ८५ वर्षीय वृद्ध महिला आहेत. त्यांनाही प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रण मिळालं आहे. २०२१ साली त्यांनी राम मंदिर उभारणीसाठी २० रुपयांची रक्कम दिली होती. त्यांचा रोजचा रोजगार ४० रुपये असताना त्यांनी त्यातील २० रुपयांची रक्कम दिल्याने विश्व हिंदू परिषदेला ही रक्कम फार मोलाची आणि मोठी वाटली. त्यामुळे बिदुला बाई देवार यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रण पाठवण्यात आलं आहेत. परंतु, प्रकृती स्वास्थामुळे त्या अयोध्येत कार्यक्रमस्थळी पोहोचू शकणार नाहीत. परंतु, प्रकृती बरी झाल्यानंतर त्यांना अयोध्येत घेऊन जाणार असल्याची प्रतिक्रिया विहिंपचे जिल्हा अध्यक्ष शिशुपाल सिंग राजपूत यांनी सांगितलं.