‘ती’ आणि ‘ती’च्या यशस्वी होण्याच्या खडतर प्रवासाची चर्चा आपण नेहमी ऐकतो. यातून अनेक तरुण मुलींना, स्त्रियांना प्रेरणा मिळते. असा प्रेरणादायी प्रवास अधिकाधिक स्त्रियांना आकाशाला गवसणी घालण्याचे बळ देतो. अशाच एका ‘ती’ची सध्या चर्चा होत आहे. सामान्य घरातून आलेल्या पण असामान्य इच्छाशक्ती असलेल्या ‘ती’ने देशाच्या पंतप्रधानांनाच मेट्रोची सफर घडवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींनी मुंबईत मेट्रो २अ आणि मेट्रो ७ या मार्गिकांचं लोकार्पण केले. यावेळी भाषणातील टिकास्त्र, विरोधकांवर साधलेला निशाणा या राजकीय वर्तुळातील चर्चांसह आणखी एका गोष्टीची सध्या चर्चा होत आहे. ती म्हणजे मोदींनी उदघाटन केलेली मेट्रो चालवणाऱ्या महिला इंजिनिअरची. मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मेट्रोतून प्रवास केला. या मेट्रोचे नेतृत्व तृप्ती शेटे या महिला इंजिनिअर ने केले. तृप्तीने ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना तिच्या भावना व्यक्त केल्या, “पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रवास करत असणारी मेट्रो मी चालवत आहे, याबाबत मी खूप उत्साही आणि आनंदी होते. ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. माझे आई, वडील आणि कुटुंबातील इतर सदस्यांना माझा अभिमान वाटत आहे. ते खूप आनंदी आहेत.”

या प्रसंगी तुला भीती वाटली का किंवा दडपण आले का असे विचारण्यात आल्यावर तृप्ती म्हणाली, “मी याबाबत खूप उत्साही आणि आनंदी होते, पण मला भीती वाटली नाही. मी एक प्रशिक्षित मेट्रो पायलट आहे आणि मला सर्व सहकाऱ्यांचा, व्यवस्थापकांचा पाठिंबा होता.” तृप्ती शेटे मूळची औरंगाबादची, मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. तिने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा आणि नंतर पदवी ग्रहण केली. २०२० मध्ये तीने मेट्रो पायलट होण्यासाठी हैद्राबादमध्ये प्रशिक्षण घेतले. या प्रवासाबाबत तिने सांगितले, “मी २०२० मध्ये सहा महिने हैदराबादमध्ये प्रशिक्षण घेतले. नंतर त्याच वर्षी मुंबईला आले. त्यानंतर मला पुन्हा ट्रेन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर तीन वर्ष मला नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. एका महिलेला आता ९१ पायलट्सच्या गटाकडून ही संधी मिळणे ही मोठी गोष्ट आहे. सर्व कष्टाचे आणि संघर्षाचे फळ मिळाले आहे असे मला वाटते.”

ज्या महिलांना उंच भरारी घेण्याची इच्छा आहे पण परिस्थितीपुढे त्या हतबल आहेत, अशा सर्वांसाठी ही गोष्ट प्रेरणादायी आहे. म्हणतात ना… ‘जहाँ चाह है, वहा राह है’ त्याप्रमाणेच तुम्ही महिला आहात म्हणून तुम्हाला संधी मिळणार नाही असा विचार अजिबात करू नका, कर्तृत्वाच्या जोरावर अशक्य गोष्टीही शक्य करुन दाखवता येतात.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman engineer drive pm narendra modi on his mumbai metro ride who struggled for job for 3 years pns