Poonam Gupta : आज महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. घरकाम सांभाळून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करत आहे.आज आपण अशाच एका महिलेविषयी जाणून घेणार आहोत ज्या समाजातील इतर महिलांसाठी प्रेरणा आहेत, त्या म्हणजे पुनम गुप्ता. पुनम गुप्ता या अनिवासी भारतीय महिला असून यांची ८०० कोटी रुपयांची कंपनी आहे. डीएनए वृत्तस्थळाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
खरं तर हा प्रवास सोपा नव्हता. एक लाखापासून सुरू केलेला व्यवसाय या उद्योजिकीने ८०० कोटीपर्यंत नेला. व्यावसायिक क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या महिलांसाठी उद्योजिका पुनम गुप्ता हे खूप चांगले उदाहरण आहे.
कोण आहेत पुनम गुप्ता?
पुनम गुप्ता यांचा जन्म दिल्ली येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीच्या लेडी इरविन आणि दिल्ली पब्लिक स्कूलमधून झाले. त्यांनी दिल्ली विद्यापिठातून पदवी घेतली त्यानंतर पुढे त्यांनी दिल्ली आणि हॉलँडमध्ये एमबीए केले.
असं म्हणतात लग्नानंतर माणसाचं आयुष्य बदलतं. पुनम गुप्ता यांच्याबरोबर सुद्धा असंच झाले. पुनम गुप्ता यांनी २००२ मध्ये पुनीत गुप्ता यांच्याबरोबर लग्न केले, त्यानंतर त्या स्कॉटलँडला गेल्या. तिथे त्यांनी नोकरी शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना नोकरी मिळत नव्हती. हताश झालेल्या पुनम गुप्ता यांनी व्यवसाय करण्याचे ठरवले. आणि त्यांनी पीजी पेपर (PG Paper Company) नावाची कंपनी सुरू केली. स्कॉटीश सरकारच्या योजनेद्वारे त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाखाचा निधी मिळाला. फक्त एका लाखात त्यांनी ८०० कोटी रुपयांची कंपनी उभारली.
पीजी पेपर कंपनी
सुरुवातीला पुनम वस्तू गोळा करायच्या आणि पुन्हा वापर करण्यायोग्य बनवायच्या. त्यानंतर त्या स्क्रॅप पेपरपासून चांगला गुणवत्तेचा पेपर तयार करत. पीजी पेपर कंपनी जगभरातील ५३ हून अधिक देशांमध्ये आयात-निर्यात करते आणि ही कंपनी युनाइटेड किंगडममधील सर्वात जास्त वेगाने पुढे जाणारी कंपनी मानली जाते.
२००३ मध्ये त्यांनी ही कंपनी सुरू केली. आज या कंपनीला २० वर्षे पूर्ण झाली. त्या सांगतात की खूप अभ्यास केल्यानंतर त्यांना ही कल्पना सुचली. पुनम गुप्ता या त्यांच्या नावावरुनच त्यांनी कंपनीचे नाव पीजी पेपर कंपनी लिमिटेड ठेवले. सुरुवातीला कंपनी युरोप आणि अमेरिकाकडून स्क्रॅप पेपर विकत घ्यायची. आता कंपनी जगातील अनेक देशांकडून स्क्रॅप पेपर विकत घेते आणि त्यापासून चांगल्या गुणवत्तेचे पेपर बनवते आणि हे पेपर दुसऱ्या देशांमध्ये निर्यात केले जातात.