नवीन वर्ष अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. कोणत्याही नवीन गोष्टी करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे ते तुम्ही तंदुरुस्त असणं. विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत. ‘वेळ नाही’ हे शब्द खूप घातक आहेत, हे लक्षात घेऊन स्वत:च्या आरोग्यासाठी वेळ काढा. फिट राहा. मस्त राहा.
नवीन वर्षाच्या आगमनाची चाहूल लागताच, या वर्षात आपण प्राधान्यानं कोणती कामं करायची याची चर्चा सुरु होते. बरेचजण बरेच संकल्प करतात. मात्र खूप कमीजण सातत्याने त्याचा पाठपुरावा करून संकल्पाची पूर्तता करण्यात यशस्वी होतात. बऱ्याच जणांचं ‘नव्याचे नऊ दिवस’ असा प्रकार होऊन संकल्प बारगळतो. तुम्ही नवीन वर्षासाठी संकल्प करण्याच्या विचारात असाल तर, क्षणाचाही विलंब न लावता, आपलं आरोग्य सांभाळण्याच्या किंवा आपण ‘फिट’राहाण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल याचा विचार अग्रक्रमाने करा. शारीरिक आणि मानसिक दृष्टीने आपण ‘फिट’असल्याशिवाय जीवनात ठरवलेला कोणताही उद्देश साध्य करता येणार नाही.
स्त्री आणि पुरुष दोघांनाही आपला फिटनेस राखण्याची गरज आहे, हे निर्विवाद असलं तरी स्त्रियांना याबाबतीत सांगण्याची आवश्यकता जास्त आहे, असं मला वाटतं. कारण स्त्रियांना सरासरी ३० वर्ष दरमहा मासिकपाळीचा त्रास सहन करावा लागतो. गर्भधारणा, बाळंतपण आणि स्तन्यपानाच्या अनुभवातून सरासरी दोन वेळेस जावं लागतं. स्त्रियांच्या बाबतीत या जबाबदाऱ्या पेलताना जी शारीरिक आणि मानसिक ‘झीज’ होते ती पुरुषांना सहन करावी लागत नाही. तो निसर्ग नियम आहे. कुटुंबातील इतर सर्व सदस्य, नवरा, सासू-सासरे, मुलं-मुली यांच्याकडे लक्ष देण्यात, स्त्रियांचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होताना दिसतं. स्वतः शारीरिक आणि मानसिक दृष्टीने तंदुरुस्त असल्याशिवाय माणूस ‘दुसऱ्याचं’ फार काळ काही करू शकणार नाही याची जाणीव अशा स्त्रियांना करून देण्याची गरज आहे. ‘सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातील कामं संपतच नाहीत डॉक्टर, व्यायामासाठी वेगळा वेळच काढता येत नाही.’ असं अनेक गृहिणींचं आणि नोकरी-व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचं म्हणणं असतं. त्यांच्या या म्हणण्यात तथ्य नाही असं नाही पण आपल्या तंदुरुस्तीसाठी प्राधान्य देणं आणि इतर कमी महत्वाची कामं वेळ मिळाला तर करणं याची सवय लागली पाहिजे.
हेही वाचा : निसर्गलिपी : कमी खर्चात, जागेत सजणारं कोकोडेमा
आपलं आरोग्य सांभाळायचं म्हणजे नेमकं काय करायचं ? या प्रश्नाचं उत्तर देणं सोपं आहे. दोनच गोष्टी करायच्या. एक आहारावर नियंत्रण आणि दुसरं म्हणजे व्यायाम. दोन्ही गोष्टी महत्वाच्या. पण त्यातल्यात्यात महत्वाचं म्हणजे आहारावर नियंत्रण. आपल्यापैकी बरेचजण गरजेपेक्षा जास्त खातात, नको ते पदार्थ सातत्यानं आणि आवडीनं खातात. जेवण्या-खाण्याच्या बाबतीत आपल्याकडे ‘आग्रह’ नावाचा एक त्रासदायक प्रकार अस्तित्वात आहे. सण-वार साजरा करताना, लग्नकार्यात , वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण गोड पदार्थ, स्वीट-डिश, मिठाई, डेझर्टच्या नावाने एकमेकांना वाढले जातात आणि अर्थातच शरीराला गरज नसताना खाण्यात येतात. पूर्वीच्या तुलनेत आजकाल वाढदिवस, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पार्टी असे प्रकार वाढले आहेत. याप्रसंगी केक कापला जातो. आग्रहपूर्वक एकमेकांना भरवला जातो. या वारंवार साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रसंगानिमित्त कळत-नकळत ‘हेल्दी फूड’ खाण्याचे नियम धाब्यावर बसवले जातात. असं अनावश्यक गोड खाणं खरं पाहिलं तर तातडीनं बंद केलं पाहिजे.
फिटनेसच्या दृष्टीने नवीन वर्षात पुढील गोष्टीसाठी प्राधान्य द्या. दररोज किमान ६ ते ८ तास शांत झोप घ्या. मनाच्या शांतीसाठी दर एक तासाने दोन मिनिटं डोळे मिटून शांत बसणं ठरवणं फार कठीण नाही. एक किंवा दोन सूर्यनमस्कांरानी सुरुवात करून दररोज १२ सूर्यनमस्कार घातल्यास मान-कंबर-खांदे मजबूत राहातील. जेवणात, मोड आलेली कडधान्यं, पालेभाज्या, फळे याचा समावेश दररोज असायला पाहिजे. आरोग्याच्या श्रीमंतीसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येक कृतीस नामस्मरणाची जोड द्या.
हेही वाचा : आयुष्याची घडी विस्कटवणारी वादळवाट…
मुलींनी आपल्या किशोरवयीन काळापासून ‘फिट’ राहाण्याची सवय लावून घेतली पाहिजे. या वयात अनेक मुलींना जंक फूड खाण्याची सवय असते. त्यात शाळा, कोचिंग क्लासेस, सारख्या परीक्षा यामुळे व्यायामाला वेळ नाही, वजन वाढणारच. या कमी वयात आलेला लठ्ठपणा सुरुवातीला पीसीओडी, मासिकपाळी अनियमित होण्यासाठी कारणीभूत ठरतो. लग्नानंतर, गर्भधारणा, बाळंतपणात गुंतागुंत निर्माण होऊ शकते. उतारवयात, बीपी-शुगर-गुडघेदुखी वगैरे सुरु होण्यास वेळ लागत नाही. हे सगळं टाळायचं झाल्यास नवीन वर्षात पुणे येथील स्त्री-रोग तज्ञ डॉ. शिरीष पटवर्धन यांनी सांगितलेला ‘पोट आत, तर रोग बाहेर’ हा मंत्र लक्षात ठेवा.
हेही वाचा : विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?
बऱ्याच स्त्रियांना आपला ‘फिटनेस’ राखण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे याची माहिती असते, परंतु त्यांना त्यातलं सातत्य टिकून ठेवता येत नाही. डॉक्टर सांगतात म्हणून नव्हे तर एक व्रत म्हणून हे करा. आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी, पुन्हा एकदा निर्धार करा. त्यासाठी १ जानेवारी २०२५ सारखा दुसरा मुहूर्त नाही. शुभेच्छा !
( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.)
( सदर समाप्त)
atnurkarkishore@gmail.com