नीलिमा देशपांडे
लैंगिक आकर्षण, कामेच्छा, उत्तेजना आणि भावनोत्कटता हे स्त्रीच्या लैंगिक जीवनातील महत्त्वाचे पैलू आहेत. तिच्या लैंगिक इच्छा या तिच्यातील पुनरुत्पादक संप्रेरकांवर तसेच आयुष्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यांवर वेगवेगळ्या असू शकतात. स्त्रीच्या आयुष्यातील तारुण्य, गर्भधारणा आणि बाळंतपण, रजोनिवृत्ती आणि वृद्धत्व या सर्व टप्प्यांचा तिच्या शृंगारिक इच्छेवर (intimacy) तसेच लैंगिक संबंधांवर वेगवेगळे परिणाम होतात.
शैला (बदललेले नाव) कामेच्छा गमावून बसलेली एक स्त्री. पतीविषयी तिच्या मनात कोणत्याच लैंगिक भावना तयार होत नव्हत्या. अशा अवस्थेत माझ्या क्लिनिकमध्ये आली. अधिक चौकशी केली असता तिने ती नैराश्यात असल्याचे सांगितले. तिची नोकरी गेली होती, तिचा मुलगा अभ्यासासाठी यूएसएला गेला होता आणि तिच्या मुलीचे नुकतेच लग्न झाले होते. त्यामुळे तिला एकटेपण आले होते. त्यातच ती घरी पूर्णवेळ एकटी असायची आणि आता आपला कुणालाही उपयोग नाही असे, आपण निरुपयोगी असल्याचे विचार कायम तिच्या मनात येत असत. तिची मासिक पाळी वेदनादायक होती आणि गेल्या सहा महिन्यांत तिचे वजन जवळपास १० किलो वाढले होते. तिला स्वत:लाच ती लठ्ठ, अनाकर्षक वाटू लागली होती. अशा निराश मन:स्थितीत आणि दिवसभराच्या कामानंतर रात्रीच्या पतीबरोबरच्या शरीरसंबंधांविषयी तिला इच्छाच उरली नव्हती. अशा प्रकारच्या प्रत्येक प्रकरणात समस्यांच्या वैद्यकीय तपासणीसह, तपशीलवार इतिहास जाणून घेणे आणि नंतर त्याचे मूल्यांकन करणे आवश्यक असते. शैलाची तब्येत बिघडली होती. जेव्हा तब्येत बिघडलेली असते तेव्हा सेक्सचा विचार कोणी करत नाही. शिवाय केवळ ८ ग्रॅम हिमोग्लोबिन असल्याने शैलाला तीव्र अशक्तपणा होता. त्यामुळे शरीर आणि मनाने ती कमजोर झाली होती. तिचे नकारात्मक विचार दूर करण्यासाठी तिचं समुपदेशन केले. तिच्या ॲनिमिया आणि हायपोथायरॉईडीझमवर उपचार केले आणि तिला नोकरीसाठी अर्ज करण्यास सांगितल्याने तिला बरं वाटायला मदत झाली.
हेही वाचा… कामजिज्ञासा : हस्तमैथुनातून लैंगिक इच्छापूर्ती?
नंतर तिच्या पतीसह पुन्हा समुपदेशनाची सत्रे केली. त्यामुळे त्यांच्यातले गैरसमज दूर झाले. त्यामुळे एकमेकांशी पुन्हा जिव्हाळ्याचे आणि लैंगिक संबंध ठेवण्यासाठी ते वेगळे काय करू शकतात हे समजण्यास त्यांना मदत झाली. तिला लवकरच बरे वाटू लागले आणि ते पुन्हा एकमेकांच्या प्रेमात कसे पडू शकले याचे तिला आश्चर्य वाटले.
स्त्रियांपेक्षा पुरुषांना सेक्सची इच्छा जास्त असते असे अनेकदा सांगितले जाते. मात्र ते काटेकोरपणे सत्य नाही. असेही पुरुष असतात ज्यांना स्त्रियांपेक्षा कमी कामेच्छा असते आणि अशाही काही स्त्रिया असतात ज्यांना आयुष्यभर उच्च कामेच्छा असते. जोडीदारांमधील कामेच्छा विसंगती हे नात्यातल्या संघर्षाचे प्रमुख कारण असू शकते.
स्त्रिया कशा प्रकारे आत्मीयता आणि कामेच्छा व्यक्त करतात यात लैंगिक शिक्षण आणि सामाजिक परिस्थितीची मोठी भूमिका आहे. अनेकींना त्यांच्या लैंगिक गरजा आणि प्राधान्यांबद्दल बोलणे कठीण जाते. ठरवून केल्या जात असलेल्या लग्न व्यवस्थेत, ॲरेंज मॅरेज – विवाहाभोवतीच्या सांस्कृतिक नियमांमुळे अनेक स्त्रिया लैंगिकदृष्ट्या आपण एकमेकांना पूरक आहेत की नाही हे समजून न घेता लग्न करतात. यात आणखी एक गोष्ट जोडली जाते, ती म्हणजे की स्त्रीच्या लैंगिक इच्छा व्यक्त करण्याकडे अनेकदा नकारार्थी नजरेने पाहिले जाते. यामुळे लैंगिक इच्छा पूर्ण झाली नाही की निराशा, राग, नैराश्य आणि अखेरीस संपूर्ण कामेच्छा नष्ट होऊ शकते.
(स्त्रीची कामेच्छा कमी होण्यामागची इतर कारणे पुढच्या लेखात -११ऑगस्टला)
( डॉ. नीलिमा देशपांडे, स्त्रीरोगतज्ज्ञ असून सेक्स थेरपीस्ट आहेत. )
तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा. सेक्स थेरपिस्ट डॉ. नीलिमा देशपांडे तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.