दिल्ली ही देशाची राजधानी. सर्वांगिणदृष्ट्या प्रगतशील शहर म्हणून ओळख असलेल्या या शहरात मात्र महिला सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं चित्र आहे. पण हीच समस्या लक्षात घेऊन आता पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी शहरात १५ महिला पोलीस नियंत्रण कक्षाची (PCR) पथके नेमली आहेत. महिला सुरक्षेसाठी तयार केलेल्या या महिला पोलिसांच्या पीसीआर पथकाविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविद्यालये, मार्केट आणि मॉल्स आदी ठिकाणी महिलांची संख्या जास्त असते. अशा ठिकाणी समाजविघात लोकांवर पाळत ठेवण्याकरता, महिलांना सुरक्षा पुरवण्याकरता पीसीआर पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाचं वैशिष्ट्य म्हणजे वाहनाच्या चालकापासून पथकाचं नेतृत्त्व करण्यापर्यंत सर्व मदार महिलांच्या हाती आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पीसीआर व्हॅनमध्ये एक ड्रायव्हर, एक गनर आणि एक ऑपरेटर असतो. ऑस्कर ४ या वाहनात हवालदार सरिता या ड्रायव्हर, हवालदार मनीषा या गनर आणि मुख्य हवालदार सविता या ऑपरेटर म्हणून काम करतात.या तिन्ही महिला ९ तासाच्या शिफ्टमध्ये काम करतात. त्या सकाळी ९ वाजता कामावर येतात आणि महिलांविरोधातील जास्तीत जास्त गुन्हे थांबवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना ज्या कामासाठी पाठवले जात आहेत, त्याची त्या नीट तपासणी करतात, रेडिओ चॅटरशी बोलतात आणि त्यांचे काम सुरू करतात.

या तिघी सुरुवातीला महिला महाविद्यालयाच्या बाहेर त्यांची व्हॅन उभी करतात. ही व्हॅन गल्ली-बोळातून जाते तेव्हा त्या तेथील संपूर्ण परिसर नीट लक्ष देऊन बघतात. दिवसाच्या शेवटी आयटीओमधील जेव्हा एखाद्या भांडणाच्या प्रकरणाची माहिती त्यांना रेडीओवरुन मिळते तेव्हा या लगेच घटनास्थळी पोहोचतात आणि त्या दोन गटातील वाद मिटवतात. त्या रस्त्यावरील छोट्या मोठ्या संकेतांकडे नीट लक्ष ठेवतात, संशयास्पद वाहने, विचित्र वर्तनाकडे त्यांचं बारीक लक्ष असतं.

हेही वाचा : मी एका शहीद जवानाची आई वीरमाता बोलतेय…

सरिता टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाल्या, “माझी नोकरी म्हणजे काम नाही तर गरजूंनी मारलेली हाक आहे. आम्ही संकटात असलेल्या लोकांना मदत करतो. वादविवाद, भांडण तंटांची तक्रार करणारे कॉल येणे आमच्यासाठी खूप सामान्य गोष्ट आहे. लोकांना समुपदेशन आणि मार्गदर्शन करणे ही आमची जबाबदारी आहे.”

तर ऑपरेटर सविता म्हणाल्या की, “कौटुंबिक हिंसाचारप्रकरणीही आम्हाला कॉल येतात. लोक पैसे प्रॉपर्टीसाठी एकमेकांशी भांडताना दिसतात. अनेकदा आम्ही अशा परिस्थितीत मध्यस्थीची भूमिका घेण्याचा प्रयत्न करतो.”
१६ ऑगस्ट रोजी वजिराबाद स्मशानभूमीजवळ झुडपामध्ये अर्धनग्न अवस्थेत एक महिला सापडल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून व्हॅनला मिळाली. पीसीआर युनिटच्या मुख्य प्रशिक्षक सीमा यादव याबाबत म्हणाल्या की, “सविताच्या व्हॅनने लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या पीडितेला कपडे घातले आणि तिला स्थानिक रुग्णालयात नेण्यापूर्वी तिच्यावर प्राथमिक उपचार सुद्धा केले.”

हेही वाचा : अल्पवयीन मुलींमध्ये आत्महत्यांचे प्रमाण का वाढतेय? कोणत्या गोष्टी असू शकतात कारणीभूत

गेल्या सहा महिन्यांमध्ये, महिला पीसीआर व्हॅनला १६०० हून अधिक कॉल्स आले आहेत. म्हणजेच दिवसाला सरासरी १०-१५ फोन येत असतात. या महिला पोलीस घरापेक्षा जास्त वेळ या वाहनांमध्ये घालवतात. त्यांचे एकमेकांशी खूप चांगले नाते निर्माण झाले आहे. वाहनांमध्ये वेळ घालवताना या सहकारी आणि त्यांच्या कुटुंबांविषयी जाणून घेतात, आयुष्यावर चर्चा करतात आणि एकमेकांच्या समस्या सोडवतात.

आज फक्त दिल्लीमध्ये नाही तर महाराष्ट्रातील अनेक शहरात महिला पीसीआर पथके महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली आहेत. या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे आज शहरात कित्येक मुली सुरक्षित वातावरणात वावरतात आणि सुरक्षित घरी परततात. महिलांसाठी लढणाऱ्या आणि सक्षमपणे रात्रंदिवस त्यांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या या महिला पीसीआर पथकांना खूप मोठा सलाम!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman police control room pcr vans in new delhi working for women centric emergencies and women security know more aboout 15 pcr teams ndj